-
CENTRES
Progammes & Centres
Location
गुरुग्रामच्या पूरसंकटाने दाखवून दिले आहे की भारताच्या शहरांनी केवळ दिखाऊ आधुनिकतेपलीकडे जाऊन, पंचमहाभूतांच्या तत्त्वावर आधारित पारंपरिक पर्यावरणीय शहाणपण पुनरुज्जीवित करणे गरजेचे आहे तेव्हाच खरी हवामान-प्रतिरोधक शहरे उभी राहतील.
Image Source: Getty Images
या पावसाळ्यात, गुरुग्रामने पुन्हा एकदा तीव्र पावसाच्या सत्रानंतर मोठ्या प्रमाणावर पूरस्थितीचा अनुभव घेतला. ज्यामुळे रस्त्यांचे नद्यात रूपांतर झाले, कार्यालयीन संकुले जलमग्न बेटांसारखी दिसू लागली, आणि प्रवासी शहर नियोजनातील अपयशाचे बळी ठरले. गोल्फ कोर्स रोडवरील लक्झरी कार पाण्यात बुडालेल्या आणि टेक पार्कच्या परिसरात गुडघाभर पाणी साचलेले हे दृश्य आता दरवर्षीचे झाले आहे, जे गुरुग्रामच्या “जागतिक शहर” बनण्याच्या आकांक्षा आणि त्याच्या नाजूक पायाभूत वास्तवातील विसंगती उघड करते. दोष नेहमी तुंबलेल्या नाल्यांना किंवा अति प्रमाणात झालेल्या बांधकामाला दिला जातो, पण समस्या त्यापेक्षा खोलवर आहे कारण शहर नियोजनाने आपल्या पर्यावरणीय पायावरच दुर्लक्ष केले आहे: भूजलसाठे, नैसर्गिक नाले, ओलिताखालील किंवा दलदलीचा प्रदेश आणि मातीचे प्रकार. या दुर्लक्षातून केवळ गुरुग्रामच नव्हे, तर प्रत्येक भारतीय शहरासाठी शिकवण मिळते. हवामान-प्रतिरोधक शहरीकरण सिंगापूर किंवा दुबईसारख्या ग्लास आणि स्टीलच्या इमारतींची नक्कल करून साध्य होणार नाही, त्यापेक्षा भारताने पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक ज्ञानप्रणाल्यांचा शोध घेणे आवश्यक आहे, ज्या निसर्गाशी संतुलन राखून जगण्याचा मार्ग दाखवतात.
अशाच एका प्रणालीचा आधार म्हणजे पंचमहाभूत तत्त्वज्ञान: निसर्गातील पाच घटकांशी (जल, पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश) सुसंवाद साधून मानव वसाहतींची रचना करण्याचे प्राचीन भारतीय तत्त्व. हा केवळ अध्यात्मिक विचार नसून, हवामान स्मार्ट शहरांसाठी एक व्यवहार्य आराखडा आहे. हे तत्त्व नगररचनाकारांना (अर्बन प्लॅनर्स) योग्य प्रश्न विचारायला प्रवृत्त करते. पाणी हे संसाधन आणि धोका दोन्ही म्हणून आदराने पाहिले जाते का? भूमीचा वापर तिच्या पर्यावरणीय क्षमतेनुसार होतोय का? ऊर्जा शाश्वतपणे निर्माण केली आणि वापरली जाते का? हवा श्वसनासाठी सुरक्षित आहे का? आणि अवकाश म्हणजेच स्पेस समुदायाच्या लवचिकतेसाठी व समावेशनासाठी डिझाइन केले जात आहे का? या तत्त्वांचा गुरुग्रामसारख्या शहरांवर उपयोग केल्यास, आपण हवामान-संकटाच्या काळात शहरी विकासाचा अर्थच नव्याने परिभाषित करू शकतो.
जल: गुरुग्रामसमोरील सर्वात ठळक आव्हान म्हणजे पाणी. ऐतिहासिकदृष्ट्या या शहरात तलाव, ओलिताखालील किंवा दलदलीचा प्रदेश आणि नजफगढ झीलशी जोडलेले नैसर्गिक नाले होते जे मान्सून पावसाचे शोषक म्हणून कार्य करत होते. मात्र, रिअल इस्टेटच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्ताराने या नैसर्गिक संरक्षकांचा नायनाट केला. 2018 मधील जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, गेल्या चार दशकांत गुरुग्रामचे अर्ध्याहून अधिक ब्लू कव्हर नष्ट झाले आहे. त्यात वाढत्या काँक्रीटकरणामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागाच उरलेली नाही परिणामी रस्ते आणि बेसमेंटमध्ये पूर साचतो. पंचमहाभूत तत्त्वज्ञान आपल्याला पाण्याकडे जीवनरेखा आणि धोका दोन्ही रूपात पाहण्यास प्रवृत्त करते. गुरुग्रामने हरवलेले तलाव पुनर्स्थापित करणे, पावसाच्या पाण्याचे नाले पुन्हा जिवंत करणे आणि ब्लू इन्फ्रास्ट्रक्चर जसे की शहरी दलदलीचे प्रदेश, पुनर्भरण तलाव, आणि जैव-नाले शहराच्या मास्टरप्लॅनमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. सिंगापूरचा ABC वॉटर प्रोग्राम दर्शवितो की पावसाच्या पाण्याचे सार्वजनिक मालमत्तेमध्ये रूपांतरित करता येते. गुरुग्राममध्येही उदाहरणे आहेत नागरिकांच्या प्रयत्नांमुळे वझीराबाद तलावाचे पुनरुज्जीवन हे आशादायक मॉडेल आहे. मात्र, जे कमी आहे ते म्हणजे या उपक्रमांचे प्रमाण आणि संस्थात्मिकरण. पुराच्या धोक्यांचे (फ्लड रिस्क) नकाशे आणि जलवाहिनींची माहिती असलेली शहरस्तरीय अर्बन वॉटर अथॉरिटी सर्व संस्थांना एकसंध जलदृष्टीभोवती एकत्र आणू शकते.
पृथ्वी: गुरुग्रामच्या रिअल इस्टेटच्या भरभराटीने जमिनीला जणू एक कोरी पाटी मानले, तिच्या पर्यावरणीय तर्काचा विचारच केला नाही. दिल्ली-एनसीआरची हरित फुफ्फुसे असलेल्या अरवली पर्वतरांगा खाणींनी आणि अतिक्रमणांनी झिजवल्या आहेत, ज्यामुळे पूर, उष्णतेच्या लाटा आणि धुळीच्या वादळांविरुद्धच्या नैसर्गिक संरक्षण प्रणाली कमजोर झाल्या आहेत. भूमीवापरातील बदलांच्या अभ्यासांनुसार 1999 ते 2019 दरम्यान अरवलींच्या वनाच्छादनात 41 टक्क्यांची घट झाली आहे. पंचमहाभूत तत्त्वज्ञान आपल्याला पृथ्वीच्या वाहनक्षमतेचा आदर करून तिच्याशी पुन्हा जोडण्याची शिकवण देते. गुरुग्राम आता नाजूक क्षेत्रांकडे विस्तार करू शकत नाही. त्याऐवजी, शहराने घनदाट किंवा संक्षिप्त स्वरूपाची (कॉम्पॅक्ट) आणि उभ्या विकासाचे (वर्टिकल ग्रोथ) तत्त्व स्वीकारावे, तर अरवलींना नो-गो इकोलॉजिकल झोन म्हणून सुरक्षित करावे. उपनगरातील शेतीक्षेत्रांना पूरासाठी मैदान (फ्लड प्लेन) आणि कार्बन शोषक म्हणून राखले पाहिजे त्यांना पेव्हिंगने कव्हर करणे थांबले पाहिजे. ब्राझीलमधील कुरितिबा शहराने दाखवून दिले आहे की पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांतील विकासावर निर्बंध आणल्यास दीर्घकालीन लवचिकता निर्माण होते. गुरुग्रामनेही सर्वोच्च न्यायालयाच्या अरवली बांधकामावरील बंदीचे कठोर पालन करून आणि विद्यमान शहरी सीमांमध्येच विकासासाठी प्रोत्साहन देऊन हे अनुकरण करणे आवश्यक आहे.
अग्नी: आजच्या काळात ‘अग्नी’ म्हणजे ऊर्जा म्हणजेच शहर स्वतःला कशा प्रकारे ऊर्जित ठेवते हे. गुरुग्राममधील प्रचंड मॉल्स, डेटा सेंटर्स आणि सुरक्षित सोसायट्या यामुळे शहराचा प्रति व्यक्ती ऊर्जावापर भारतातील सर्वाधिक आहे. उष्णतेच्या लाटांच्या काळात वीजेची मागणी प्रचंड वाढते, ज्यामुळे ग्रिडवर ताण येतो आणि जीवाश्म इंधनाचा वापर वाढतो. पंचमहाभूत तत्त्वज्ञानात अग्नी ही नियंत्रित, संयमित आणि संतुलन साधणारी शक्ती आहे जी बेफाम वापरायची नाही. गुरुग्रामने सर्व नव्या इमारतींसाठी रूफटॉप सोलर अनिवार्य करणे, ऊर्जा-कार्यक्षम शीतकरण प्रणालींना प्रोत्साहन देणे आणि महत्त्वाच्या सेवांसाठी मायक्रोग्रिड्स उभारणे यामध्ये नेतृत्व घ्यावे. हरियाणाच्या 2023 मधील सौर धोरणाने 2030 पर्यंत 6 GW चे लक्ष्य ठेवले आहे; राज्याची आर्थिक राजधानी म्हणून गुरुग्राम हे त्याचे प्रायोगिक केंद्र बनू शकते. त्याच वेळी, ऊर्जेतील असमानतेचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. गुरुग्राममधील हजारो अनौपचारिक वस्त्यांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, तर आलिशान टॉवर्स अखंड प्रकाशमान असतात. न्याय्य ऊर्जांतर म्हणजे झोपडपट्ट्यांना स्वच्छ स्वयंपाक इंधन, रूफटॉप सोलर आणि मजबूत वीज ग्रीडसाठी प्राधान्य देणे यामुळेच अग्नी असमतोलाचा नव्हे तर समतोलाचा स्रोत बनेल.
वायू : गुरुग्रामची हवेची गुणवत्ता वर्षभर, विशेषतः हिवाळ्यात, धोकादायक पातळीवर पोहोचते. ज्यामुळे ते जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक बनले आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या 2025 च्या पहिल्या सहामाहीतील अभ्यासानुसार, गुरुग्राममधील PM2.5 चे प्रमाण सरासरी 75 µg/m³ इतके होते जे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल 15 पट जास्त आहे. पंचमहाभूत तत्त्वज्ञान ‘श्वास घेणाऱ्या शहरा’ची मागणी करते. वाहनउत्सर्जन कमी करणे, मास ट्रान्झिट प्रणाली मजबूत करणे, पादचारी-प्रथम रस्ते रचना आणि सायकल मार्गांची उभारणी या गोष्टी तातडीच्या आहेत. दिल्ली-अलवर रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (RRTS) जर गुरुग्राम मेट्रोशी जोडली गेली, तर दररोज हजारो वाहन प्रवास कमी होतील. औद्योगिक क्षेत्रे आणि बांधकाम साइट्ससाठी रिअल टाइम इमिशन्स मॉनिटरिंग बंधनकारक करणेही आवश्यक आहे. कोलंबियातील मेडेलिन शहराने रस्त्यांच्या कडेला ग्रीन कॉरिडॉर्स तयार करून हवा प्रदूषणात घट साधली. हे ‘रेखीय वन’ (लिनिअर फॉरेस्ट) तापमान कमी करतात आणि धूलिकण शोषतात. गुरुग्रामनेही मुख्य रस्त्यांच्या पुनर्वनीकरणाद्वारे आणि कॉर्पोरेट झोनच्या मदतीने शहरी वनीकरण मोहिमा राबवून अशीच दिशा घ्यावी.
आकाश (स्पेस): भौतिक अर्थापलीकडे ‘आकाश’ म्हणजे शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाश, ते किती समावेशक, सुलभ आणि लवचिक आहे याचे प्रतिक. गुरुग्राममध्ये सुरक्षित सोसायट्या आणि विभाजित जीवनशैली ही एक परिचित वस्तुस्थिती आहे, जिथे स्थलांतरित मजूर असुरक्षित वसाहतींमध्ये राहतात तेथे स्वच्छता, आरोग्यसेवा किंवा सुरक्षित निवाऱ्याचा त्यांना अभाव आहे. 2020 च्या कोविड-19 लॉकडाऊनदरम्यान हजारो कामगार रोजगार आणि निवाऱ्याविना अडकले, ज्यामुळे या रचनात्मक असमानतेचे नग्न रूप समोर आले. पंचमहाभूत तत्त्वज्ञान सांगते की अवकाश हे सामायिक आणि न्याय्य असले पाहिजे. गुरुग्रामने परवडणारी भाडे तत्वावर देण्यासाठी घरे उभारण्यासाठी गुंतवणूक करणे, कामगारबहुल भागांतील प्राथमिक आरोग्य सुविधा मजबूत करणे आणि उद्याने, चौक, सांस्कृतिक स्थळे अशा सार्वजनिक स्पेसची निर्मिती करणे आवश्यक आहे. जे समुदायातील लवचिकता आणि एकात्मता वाढवतात. ‘आकाश’ याचा अर्थ डिजिटल अवकाश म्हणजेच डिजिटल स्पेसही आहे, गुरुग्राम स्वतःला तंत्रज्ञानकेंद्र म्हणून मांडत असताना, परवडणाऱ्या ब्रॉडबँडद्वारे आणि ई-शासन प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल दरी कमी करणे अत्यावश्यक आहे. शहर खरोखरच लवचिक तेव्हाच ठरते जेव्हा केवळ श्रीमंत नव्हे तर त्यातील सर्व नागरिक या सुरक्षा जाळ्याचा भाग असतात.
पंचमहाभूतांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, गुरुग्रामचे पूर हे फक्त तुटलेल्या नाल्यांचे परिणाम नाहीत, तर तुटलेल्या शहरी तत्त्वज्ञानाचे द्योतक आहेत. शहर नियोजकांनी भारताच्या पारंपरिक पर्यावरणीय शहाणपणाकडे दुर्लक्ष करून परदेशी शहरी विकासाच्या मॉडेल्सचे अनुकरण केले. पंचमहाभूत तत्त्वज्ञान पाणी, जमीन, ऊर्जा, वायू आणि सामाजिक अवकाश यांची संतुलित आणि एकात्मिक चौकट तयार करून आधुनिक नियोजनाला या पारंपरिक शहाणपणात रुजविण्याचा मार्ग दाखवते.
गुरुग्राममधील ही आपत्ती प्रत्येक भारतीय शहरासाठी इशारा आहे. मुंबईत वारंवार येणारे पूर असोत किंवा बेंगळुरूतील अदृश्य होत चाललेली सरोवरे- नमुना स्पष्ट आहे: हवामान बदलामुळे बेफाम शहरीकरणाने निर्माण केलेल्या असुरक्षितता अधिक तीव्र होत आहेत. 2050 पर्यंत भारतात आणखी सुमारे 40 कोटी लोक शहरी भागांत स्थलांतरित होणार आहेत. निवड स्पष्ट आहे आपण अजूनही अशा शहरांची निर्मिती करणार आहोत का जी प्रत्येक जबर हवामानाच्या घटनेनंतर कोसळतात? की आपण अशा वसाहती उभारणार आहोत ज्या पर्यावरणीय लवचिकता आणि सांस्कृतिक समावेशकतेवर आधारलेल्या आहेत?
गुरुग्रामकडे यासाठी योग्य संधी आहे कारण त्याच्याकडे कॉर्पोरेट शक्ती, तरुण लोकसंख्या आणि राष्ट्रीय दृश्यमानता आहे. जर गुरुग्रामने पंचमहाभूत तत्त्वज्ञान आत्मसात केले, तर ते भारतीय नगररचनेचे नवे आदर्श मॉडेल बनू शकते. असे मॉडेल जे आधुनिक असले तरी मुळाशी जोडलेले, महत्त्वाकांक्षी असले तरी संतुलित, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविष्याच्या हवामान धोक्यांना तोंड देण्यास सक्षम असेल.
अपर्णा रॉय या क्लायमेट चेंज अँड एनर्जी, सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक डिप्लोमसी, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन येथे फेलो आणि लीड आहेत.
पियूष पटेल हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन येथे रिसर्च इंटर्न आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Aparna Roy is a Fellow and Lead Climate Change and Energy at the Centre for New Economic Diplomacy (CNED). Aparna's primary research focus is on ...
Read More +
Piyush Patel was a Research Intern with the Centre for New Economic Diplomacy at the Observer Research Foundation. His research interests lie at the intersection ...
Read More +