-
CENTRES
Progammes & Centres
Location
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने महिलांसाठी ऑनलाइन जिहाद कोर्स सुरू केला आहे. पाकिस्तानातल्या काही संस्था धार्मिक शिक्षणाच्या आडून दशतदवादाला कसे खतपाणी घालत आहेत हेच यावरून उघड होते.
जैश-ए-मोहम्मद (JeM) या पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनेवर संयुक्त राष्ट्राने बंदी आणली आहे. तरीही या संघटनेच्या कारवाया सुरूच आहेत. ‘जैश’ ने तुहफत-उल-मुमिनत (Tuhfat-ul-Mu’minat) या नावाचा एक ऑनलाइन कोर्स ऑक्टोबर 2025 च्या अखेरीस सुरू केला आहे. महिला अनुयायांसाठी एक भेटवस्तू असा या नावाचा अर्थ आहे. विशेषतः महिलांसाठी तयार केलेला हा कोर्स एन्क्रिप्टेड टेलिग्राम ग्रुप्स, जेईएमच्या मीडिया विंग्सशी जोडलेले सोशल मीडिया हँडल आणि मदरशांच्या नेटवर्कद्वारे महिलांपर्यंत पोहोचवला जातो. ‘जिहाद, त्याग आणि नम्रता समजून घेण्याच्या दिशेने अध्यात्मिक प्रवास करण्यासाठी यात महिलांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन यात करण्यात आले आहे. या कोर्सची नोंदणी फी पाकिस्तानी चलनात 500 रुपये म्हणजे भारतीय रुपयांनुसार 150 रुपये होते.
राजधानी दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट झाला. यात जमात-उल-मुमिनातिस या महिला संघटनेचा सहभाग असल्याचा संशय आहे. या शाखेचा भाग असलेल्या डॉ. शाहिना शाहिद भारतात त्यांच्या कारवायांचे नेतृत्व करतात असा त्यांच्यावर आरोप आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी गटाचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर लगेचच ‘जैश’ ने डिजिटल हवालाची पद्धत सुलभ करण्यासाठी आणि त्यांच्या कारवायांना वित्तपुरवठा करण्यासाठी ‘इझीपैसा’ आणि ‘सदापे’ यासारख्या डिजिटल वॉलेटद्वारे देणग्या स्वीकारण्याची घोषणा केली. त्यानंतर काही महिन्यांतच हा ऑनलाइन कोर्स सुरू झाला. जैश 2000 हून अधिक सक्रिय डिजिटल वॉलेट खाती चालवते. यातून दरवर्षी अंदाजे 2.8 ते 3.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची उलाढाल होते. या निधीचा एक महत्त्वाचा भाग शस्त्रे खरेदी करण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांना निधी देण्यासाठी वापरला जातो. काही अंदाजांनुसार 50 टक्के निधी थेट शस्त्रास्त्र खरेदीसाठी जातो. जैश ए मोहम्मद ही संघटना पाकिस्तानी सरकारच्या पाठिंब्याशिवाय FATF तपासणी टाळूच शकत नाही. म्हणजेच पाकिस्तान सरकारची त्यांना फूस आहे.
राजधानी दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट झाला. यात जमात-उल-मुमिनातिस या महिला संघटनेचा सहभाग असल्याचा संशय आहे.
महिलांसाठीचा हा ऑनलाइन कोर्स वैचारिक प्रशिक्षणाचे व्यासपीठ म्हणून आणि जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांसाठी निधी संकलनाचे साधन म्हणून वापरला जातो. जैश-ए-मोहम्मदच्या वरिष्ठ कमांडरच्या महिला नातेवाईक ऑनलाइन मॉड्युलचे नेतृत्व करत आहेत. यात मसूद अझहरच्या बहिणी सादिया अझहर, समीरा अझहर आणि सिया अझहर यांचा समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्लेखोरांपैकी एक असलेल्या उमर फारूकची पत्नी अफरा फारूक हीसुद्धा यात आहे. या कोर्सचा प्रचार जैश-ए-मोहम्मदच्या अंतर्गत टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप नेटवर्क्सद्वारे तसेच ऑनलाइन धार्मिक मंचांद्वारे आधीच गुप्तपणे करण्यात आला आहे.
तुहफत-उल-मुमिनत या ऑनलाइन कोर्सची घोषणा

स्रोत : NDTV online, ऑक्टोबर 2025
या धार्मिकतेच्या आवरणाखाली एक योजनाबद्ध रणनीती आहे. लोकांच्या श्रद्धा, तंत्रज्ञान आणि लैंगिक गटांचा वापर करून आपला वैचारिक प्रभाव वाढवण्याचा जैशचा प्रयत्न आहे. पाकिस्तानचे सरकार एकीकडे आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी निधी मिळवते पण अशा बाबींकडे मात्र दुर्लक्ष करते. पाकिस्तानची फूस आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी निधीचा गैरवापर यामुळे तिथे धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अतिरेकी विचारसरणीचा प्रचार टिकून राहिला आहे. जेईएमचा ऑनलाइन अभ्यासक्रम हा आधुनिक जिहादी चळवळींचे डिजिटायझेशन आणि दहशतवाद रोखण्यात पाकिस्तान सरकारला आलेले अपयश अधोरेखित करतो. पाकिस्तानचे सरकार अशा कारवायांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते हे स्पष्टच आहे.
दक्षिण आशियातील जिहादी चळवळींचा प्रसार एका स्पष्ट मार्गाने झाला आहे. 1990 च्या दशकात मदरशांमध्ये धार्मिक शिकवण दिली जात असे. नंतर दहशतवादी प्रशिक्षण दिले जायचे. आता 2020 च्या दशकात हा दहशतवाद डिजिटल कट्टरतावाद आणि ऑनलाइन प्रचारापर्यंत येऊन पोहोचला आहे. मसूद अझहरने 2000 मध्ये स्थापन केलेली जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरुवातीला माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना एकत्र करत असे. या संघटनेने अल-कलाम सारख्या साप्ताहिक प्रकाशनांपासून ते झर्ब-ए-मोमिन सारख्या ऑनलाइन मासिकांपर्यंत सायबर दहशतवादाचे मोठे जाळे उभे केले.
दक्षिण आशियातील जिहादी चळवळींचा प्रसार एका स्पष्ट मार्गाने झाला आहे. 1990 च्या दशकात मदरशांमध्ये धार्मिक शिकवण दिली जात असे. नंतर दहशतवादी प्रशिक्षण दिले जायचे. आता 2020 च्या दशकात हा दहशतवाद डिजिटल कट्टरतावाद आणि ऑनलाइन प्रचारापर्यंत येऊन पोहोचला आहे.
‘तुहफत-उल-मुमिनत’ची सुरुवात हा एक महत्त्वाचा बदल आहे. आता यात महिला केवळ निष्क्रीय समर्थक राहिलेल्या नाहीत तर त्यांचा वैचारिक सहभाग घेतला जातो आहे. या अभ्यासक्रमात जिहादी विचारसरणी आणि डिजिटल संभाषण एकत्रत केले आहे. यामध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब आणि टेलिग्राम सारखे प्लॅटफॉर्म व्हर्च्युअल मदरसा म्हणून काम करतात. खाजगी ऑनलाइन गटांपर्यंत अभ्यासक्रमाचे साहित्य पोहोचवले जाते. दहशतवाद, शहीद होण्याची प्रेरणा आणि भारतविरोधी भावनांना समर्थन देण्यासाठी कुराणातील वचनांचा वापर करून हे विचार महिलांच्या मनावर बिंबवले जातात. पूर्वी प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लढण्यासाठी उद्युक्त केले जायचे. आता हा डिजिटल जिहाद बौद्धिक आणि घरगुती स्वरूपाचा आहे. महिलांनी जिहादला पाठिंबा द्यावा, सोशल मीडियातून जास्तीत जास्त या विचारांचा प्रचार करावा आणि मुलांचे ‘अध्यात्मिकदृष्ट्या’ संगोपन करावे हा त्यामागचा उद्देश आहे. एकेकाळी असाच प्रचार करून हजारो पाकिस्तानी तरुणांना काश्मीर आणि अफगाणिस्तानात नेण्यात आले होते.
जेईएम आता लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन जिहादचा व्यापक प्रसार करू पाहत आहे. जागतिक स्तरावर इस्लामिक स्टेटमध्ये महिलांची भरती सुरू आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या देवबंदी दहशतवादी गटांनी शांतपणे एक समांतर रचना निर्माण केली आहे. जेईएमची महिला शाखा खातुन-ए-इस्लाम, वैचारिक निष्ठा जोपासण्यासाठी डिझाइन केलेली अनौपचारिक अभ्यास मंडळे, प्रकाशने आणि धार्मिक व्याख्याने अशा प्रकारचे उपक्रम चालवत असते. ऑनलाइन अभ्यासक्रम हा या प्रयत्नांचे एक संघटित रूप आहे. महिलांकडे आता बाह्य घटक म्हणून न पाहता मोठी शक्ती म्हणून पाहिले जात आहे. महिला त्यांचं कौटुंबिक नेटवर्क आणि स्थानिक समुदायांमध्ये अतिरेकी विचारांचा प्रसार करू शकतात, असा याचा उद्देश आहे. त्यांचा प्रभाव दुर्लक्षित असला तरी खोलवर असू शकतो. जैश-ए-मोहम्मदच्या कथनात जाणूनबुजून घराणेशाही आणि श्रद्धांचे मिश्रण केले आहे. महिलांमधली आज्ञाधारकता लक्षात घेता त्यांना श्रद्धेचे पाठ दिले जातात. त्यांच्या मातृत्वाच्या जबाबदारीकडे युद्धभूमी म्हणून पाहिले जाते. यामुळे दहशतवादाचे विचार सर्वत्र पसरतात. तसेच जिहादी विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने जात राहतात.
ऑनलाइन कोर्स तुहफत-उल-मुमिनतची घोषणा

स्रोत: NDTV online, ऑक्टोबर 2025
कोविड- 19 साथीच्या आजारामुळे डिजिटल नेटवर्कचा पसारा वाढला. मौलवींनी YouTube वर प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्यांचे फतवेही zoom वर निघू लागले. JeM चा ऑनलाइन कोर्स हा याच वातावरणाचा परिणाम आहे. यामध्ये जुन्या सैद्धांतिक साहित्याचे नव्या डिजिटल रूपात वितरण केले जाते. दहशतवादी संघटना इंटरनेटच्या रचनेचा कसा वापर करतायत हेच यावरून दिसून येते.
या नवीन अभ्यासक्रमात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म एकत्रित केले आहेत :
- धार्मिक नशीद आणि प्रेरक व्याख्याने असलेल्या प्रमोशनल क्लिपसाठी YouTube आणि Facebook.
- एन्क्रिप्टेड गट चर्चा आणि अभ्यासक्रम साहित्य वितरणासाठी Telegram
- नोंदणी, असाइनमेंट आणि सामूहिक संवादांसाठी WhatsApp
- बंद झालेली शैक्षणिक पोर्टल. महिला या पोर्टलवरची व्याख्याने आणि थेट सत्रे पाहू शकतात.
सोशल मीडियाचा असा अत्याधुनिक वापर इस्लामिक स्टेटच्या अल-खानसा ब्रिगेडच्या पद्धतींचे अनुकरण आहे. इस्लामिक स्टेट मध्येही ऑनलाइन आणि लॉजिस्टिकल जिहादसाठी महिलांना एकत्र करण्यात आले होते. ‘जैश’चा दृष्टिकोन दक्षिण आशियामधल्या वातावरणाशी मिळताजुळता आहे. तो काश्मीरचे भावनिक आकर्षण, भारतविरोधी भावना आणि इस्लामी अस्मितेचे संरक्षण यावर आधारलेला आहे.
डिजिटल तंत्रज्ञानावर चालणारी अर्थव्यवस्था जैश ए मोह्म्मद सारख्या संघटनांनी ओळखली आहे. म्हणूनच ते मल्टीमीडिया सामग्री आणि भावनिक कथन यांचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. हा प्रचार फक्त हिंसेलाच प्रवृत्त करत नाही तर तो मानसिक पातळीवर खोल परिणाम करतो. कट्टरपंथी विचारसरणीतला सहभाग हे नैतिक कर्तव्य आहे असे यात मांडले जाते.
महिलांकडे आता बाह्य घटक म्हणून न पाहता मोठी शक्ती म्हणून पाहिले जात आहे. महिला त्यांचं कौटुंबिक नेटवर्क आणि स्थानिक समुदायांमध्ये अतिरेकी विचारांचा प्रसार करू शकतात, असा याचा उद्देश आहे. त्यांचा प्रभाव दुर्लक्षित असला तरी खोलवर असू शकतो. जैश-ए-मोहम्मदच्या कथनात जाणूनबुजून घराणेशाही आणि श्रद्धांचे मिश्रण केले आहे. महिलांमधली आज्ञाधारकता लक्षात घेता त्यांना श्रद्धेचे पाठ दिले जातात. त्यांच्या मातृत्वाच्या जबाबदारीकडे युद्धभूमी म्हणून पाहिले जाते.
अशा व्हिडिओजमध्ये अत्याधुनिक निर्मिती तंत्रांचा वापर केला जातो. पार्श्वसंगीतात सुरू असलेली नशीद, काश्मीरचे हायडेफिनेशन फोटो आणि भावनिकदृष्ट्या भारलेले कथन असे याचे स्वरूप असते. लोकांच्या मनातला असंतोष आणि धार्मिक ऐक्य जागृत करण्यासाठीच त्याची रचना केलेली असते. त्यावरचे नियंत्रण टाळण्यासाठी असे व्हिडिओ अनेक खात्यांमधून पुन्हापुन्हा अपलोड केले जातात.
जेईएमशी संबंधित Telegram चॅनेल एन्क्रिप्टेड स्वरूपात अभ्यासक्रमाचे साहित्य शेअर करतात. त्याच वेळी एक्स अकाउंट्स मुस्लीम अस्मिता आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित हॅशटॅग वापरून ते आणखी पुढे पोहोचवतात. हे अतिरेकी विचार कसे चांगले आहेत हे दाखवण्यासाठी पुरोगामी कथनांचा हेतुपुरस्सर विपर्यास केला जातो. सक्षमीकरणाच्या बेगडी भाषेत गुंडाळलेला धार्मिक कट्टरतावाद ही लोकांना प्रभावित करण्याची नवी पद्धत आहे.
तुहफत-उल-मुमिनत हा केवळ एक वैचारिक उपक्रम नाही तर ते एक माहिती युद्ध आहे. यामध्ये श्रद्धा आणि कट्टरता, शिक्षण आणि शिकवण यांच्यातील फरक नाहिसा करण्याचाच प्रयत्न आहे.
तुहफत-उल-मुमिनतच्या लाँचमुळे पुन्हा एकदा या गटाचे भारताविरुद्धचे कारस्थान उघड होते. जैश-ए-मोहम्मदच्या आघाडीच्या संघटनांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे अल-रहमत ट्रस्ट. या ट्रस्टची धर्मादाय शाखा पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामध्ये उघडपणे काम करते. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवादी गटाशी जोडलेले असूनही या ट्रस्टला सगळ्या करसवलती मिळतात. सार्वजनिक देणग्याही मिळतात. ही ट्रस्ट धार्मिक कल्याणासाठी काम करते असे दाखवून प्रांतीय अनुदान मिळवते. म्हणजे एक प्रकारे या ट्रस्टला सरकारचे समर्थनच आहे.
याशिवाय ऑनलाइन जिहादी प्रचार, भरती करणाऱ्या जाहिराती आणि देणगी मोहिमा वाढतच आहेत. जेईएमची डिजिटल व्यवस्थाही आहे. यात व्हर्च्युअल क्लासरूम आणि एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. अशा कृत्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.
ऑपरेशन सिंदूर मध्ये जैश-ए-मोहम्मदचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले. हे दहशतवादी पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात स्थलांतरित झाले आहेत. म्हणूनच तुहफत-उल-मुमिनतचा उदय या गटाची लवचिकता दाखवून देतो. भारताला लक्ष्य करण्यासाठी इस्लामच्या शिकवणीचा वापर इथे सातत्याने होतो आहे. जैश-ए-मोहम्मद ने महिलांसाठी सुरू केलेल्या अभ्यासक्रमात जागतिक स्तरावरचा जिहादी धोका दडलेला आहे. हा जिहाद डिजिटल स्वरूपात फोफावतो आहे. पाकिस्तान एकीकडे दहशतवाद रोखण्यासाठीचा निधी मिळवतो तर दुसरीकडे याच कट्टरवादाला खतपाणी घालतो हे लक्षात घ्यायला हवे.
आंतरराष्ट्रीय समुदायाने तुहफत-उल-मुमिनत या उपक्रमाकडे स्वतंत्रपणे न पाहता पाकिस्तानचे दुटप्पी धोरण म्हणून पाहिले पाहिजे. दहशतवादाचा सामना करण्यात पाकिस्तानला अपयश आले आहे. एवढेच नव्हे तर दहशतवादी कारवायांकडे पाकिस्तान जाणूनबुजून दुर्लक्ष करतो आहे. पाकिस्तानला दहशतवादविरोधी निधी किंवा संरक्षण मदत पुरवणाऱ्या पाश्चात्य देशांनी पाकिस्तानमधले धार्मिक शिक्षण आणि एकूणच डिजिटल उपक्रमांच्या ऑडिटची मागणी केली पाहिजे.
युरोपियन युनियन आणि अमेरिका यांचा संयुक्त डिजिटल फॉरेन्सिक कार्यक्रम जेईएमच्या ऑनलाइन मोहिमांचा मागोवा घेऊ शकतो. या सर्व्हरचे मूळ ओळखण्यात आणि संबंधित सोशल मीडिया क्लस्टर्स नष्ट करण्यात या कार्यक्रमाची महत्त्वाची भूमिका आहे. FATF सारख्या बहुपक्षीय यंत्रणांनीही आर्थिक नेटवर्कच्या पलीकडे जाऊन पर्यवेक्षण करण्याची गरज आहे. कारण हे अतिरेकी गट ऑनलाइन सामग्री, देणग्या आणि भरती अभ्यासक्रमांतून पैसे मिळवतात.
त्यामुळे अशा डिजिटल प्लॅटफार्मवर लक्ष्य ठेवून त्यांचा प्रसार रोखणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे जिहादी संदेश महिलांना शिक्षण देण्याऐवजी त्यांचे शोषण आणि फसवणूक करतात हे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. यासाठी सर्वसाधारण भाषणांऐवजी सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत आवाज, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि समुदाय-आधारित संवाद वापरणे अधिक प्रभावी ठरेल.
जैश-ए-मोहम्मदचा तुहफत-उल-मुमिनत हा अभ्यासक्रम केवळ ऑनलाइन धार्मिक अभ्यासक्रम नाही. तो मानसिक आणि डिजिटल युद्धातील एक चलाख प्रयोग आहे. दहशतवादी गट तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिगामी विचारांचा प्रसार करत आहेत हेच यातून दिसून येते.
त्यामुळे जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर काटेकोरपणे देखरेख ठेवली जात नाही आणि पाकिस्तानला यासाठी जबाबदार धरले जात नाही तोपर्यंत हा डिजिटल जिहाद फोफावतच राहील. सध्याच्या काळात सोशल मीडिया हाच एक नवीन मदरसा बनला आहे. वेगवेगळे हॅशटॅग वापरून पसरवला जाणारा जिहाद श्रद्धा आणि कट्टरता यांच्यातली रेषा आणखी धूसर करतो. दहशतवादाचा सामना केवळ बळाचा वापर करून करता येत नाही तर तो सत्य, पारदर्शकता आणि डिजिटल दक्षतेने लढला पाहिजे हे जगाने ओळखण्याची गरज आहे.
सौम्या अवस्थी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीच्या फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr Soumya Awasthi is Fellow, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation. Her work focuses on the intersection of technology and national ...
Read More +