Author : Shoba Suri

Expert Speak Health Express
Published on Dec 10, 2025 Updated 11 Hours ago

फिनटेकमुळे शेतकरी कर्ज कसे मिळवतात, जोखीम कशी व्यवस्थापित करतात आणि बाजारपेठांशी कसे जोडले जातात यामध्ये आमूलाग्र बदल होत असून, अधिक समावेशक आणि शाश्वत अन्नभविष्य घडण्यास मदत होत आहे.

फिनटेक आणि शेती: अन्नसुरक्षेच्या नव्या भविष्याची पायाभरणी

    हवामान बदल, प्रणालीगत अकार्यक्षमता, आर्थिकदृष्ट्या वगळणे आणि पौष्टिक अन्नापर्यंतच्या प्रवेशातील वाढती असमानता हे सर्व घटक एकत्र येऊन बहुआयामी संकट निर्माण करत आहेत, जे पृथ्वीच्या तसेच मानवी आरोग्याला धोका निर्माण करते. आज कृषी क्षेत्रातून अन्न प्रणालीतील सुमारे 39 टक्के उत्सर्जन होते, तर भूमी-वापरातील बदलांमुळे 32 टक्के आणि पुरवठा साखळीतील क्रियाकलापांमुळे 29 टक्के उत्सर्जन होते. ही परिस्थिती तशीच राहिल्यास, 2050 पर्यंत हे उत्सर्जन 30 गिगाटन CO₂ समतुल्यापर्यंत वाढू शकते जे सध्याच्या पातळीपेक्षा तब्बल 67 टक्के अधिक आहे. त्याच वेळी, हवामान बदलामुळे 1961 पासून जागतिक कृषी उत्पादकता आधीच 21 टक्क्यांनी घटली आहे, जणू संपूर्ण एक दशकाचा विकास गमावल्यासारखे आहे. हे परिणाम सर्वत्र समान नाहीत. जगातील सर्वाधिक असुरक्षित समुदाय असलेल्या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये उत्पादकतेतील घट 40 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, ज्यामुळे आफ्रिका, मध्य अमेरिका, दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेत उपासमारीचा धोका अधिक तीव्र होत आहे. ही आव्हाने नवीन नसली, तरी त्यांची तीव्रता आणि परस्परसंबंध नव्या उपाययोजनांची गरज अधोरेखित करतात. अशा उपायांपैकी एक महत्त्वाची शक्यता म्हणजे फिनटेक, आर्थिक प्रवेश, जोखीम व्यवस्थापन आणि मूल्य साखळी एकात्मतेला नव्याने आकार देणाऱ्या डिजिटल साधनांचे उदयोन्मुख परिसंस्थान. हवामान असुरक्षितता आणि अन्न असुरक्षेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवण्याची क्षमता फिनटेकमध्ये प्रचंड आहे. 

    मात्र, अन्न प्रणालींमधील प्रणालीगत अकार्यक्षमता अजूनही मोठ्या प्रमाणावर संसाधनांची नासाडी करत आहेत, आणि त्यातील सर्वात ठळक समस्या म्हणजे अन्नाची हानी आणि अपव्यय (फूड लॉस अँड वेस्ट – FLW). जागतिक स्तरावर उत्पादित होणाऱ्या एकूण अन्नापैकी सुमारे एकतृतीयांश (1.3 अब्ज टन) अन्न व्यर्थ होते किंवा वाया जाते. याचा आर्थिक तोटा दरवर्षी जवळपास 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतका आहे, तर पर्यावरणीय किंमत त्याहूनही अधिक असून जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या 8-10 टक्के इतकी आहे. ही विसंगती ठळक आहे: जगात सर्वांसाठी पुरेसे अन्न उत्पादन होते; तरीही दररोज रात्री 828 दशलक्षांहून अधिक लोक उपाशी झोपतात, आणि प्रत्येक तिसरा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कुपोषणाला सामोरा जातो. उत्पन्नाच्या पातळीनुसार या पद्धतींमध्ये मोठा फरक दिसून येतो. विकसनशील देशांमध्ये काढणीनंतर जवळपास 13 टक्के अन्नाची हानी होते, तर श्रीमंत अर्थव्यवस्थांमध्ये ग्राहकांकडून होणारा अपव्यय अधिक प्रमाणात आढळतो. 

    सर्वांपर्यंत अन्न पोहचणे किंवा अन्नापर्यंतचा प्रवेश हा जागतिक अन्न प्रणालीतील असमानतेचा एक प्रमुख निर्देशांक राहिला आहे. आज 2.8 अब्जांहून अधिक लोकांना आरोग्यदायी आहार परवडत नाही. पुरेश्या कॅलरी मिळत असतानाही सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे असणारी ‘लपलेली भूक’ (हिडन हंगर) अब्जावधी लोकांना प्रभावित करते विशेषतः उप-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये. त्याच वेळी, लठ्ठपणा आणि आहाराशी संबंधित असंसर्गजन्य (नॉन-कम्युनिकेबल) आजार दरवर्षी सुमारे 50 लाख मृत्यूंना कारणीभूत ठरतात, ज्यातून अपोषण आणि अतिपोषण अशी दुहेरी समस्या स्पष्ट होते. ही असमानता लैंगिक स्वरूपाचीही आहे. जमीन, कर्ज आणि श्रमांशी संबंधित प्रणालीगत अडथळ्यांमुळे महिला लघुशेतकरी सातत्याने पुरुष शेतकऱ्यांपेक्षा कमी उत्पादन करतात. महामारीपासून ते संघर्षांपर्यंतच्या व्यापक आर्थिक धक्क्यांनी अन्न मिळवणे आणखी कमकुवत झाले असून, अंदाजे 15 कोटी अतिरिक्त लोक गरिबीत ढकलले गेले आहेत. या सर्व घटकांमुळे SDG 2 (शून्य भूक) साध्य करण्याच्या जागतिक प्रगतीला मोठा फटका बसला असून, परिवर्तनकारी बदलांची नितांत गरज अधोरेखित होते.

    फिनटेकमध्ये मोबाईल पेमेंट्स, डिजिटल वॉलेट्सपासून ते ब्लॉकचेन आणि स्वयंचलित क्रेडिट जोखीम मूल्यांकनापर्यंत विविध डिजिटल आर्थिक साधनांचा समावेश होतो. कृषी क्षेत्रात, जिथे 84 टक्के शेतजमिनीवर अल्पभूधारक शेतकरी शेती करतात, तिथे ही साधने वित्तपुरवठा, जोखीम-वाटप आणि बाजारप्रवेशातील दीर्घकालीन तुटी भरून काढतात, ज्या पारंपरिक बँकिंग मॉडेल्सना सोडवता येत नाहीत. स्मार्टफोनच्या किमती घटणे, जैवमेट्रिक प्रमाणीकरण आणि सुलभ डिजिटल पेमेंट्स यांमुळे मोबाईल बँकिंग हे सर्वाधिक परिवर्तनकारी ठरले आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सेवा मिळाल्या, थेट देयके स्वीकारता आली आणि खरेदीदारांशी थेट जोडले जाणे शक्य झाले. डिजिटल वॉलेट्स या फायद्यांना पुढे नेत सुरक्षित व्यवहार, कर्ज व विम्याचे एकत्रीकरण आणि शोषण करणाऱ्या मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करतात. तरीही, कमी डिजिटल साक्षरता, दुर्बल नियामक संरक्षण आणि अपुरी दूरसंचार पायाभूत सुविधा यांसारखी आव्हाने या साधनांचा स्वीकार मर्यादित ठेवतात. 

    इन्शुरटेक (InsurTech) सारखी साधने कृषी वित्तातील दीर्घकालीन समस्यांवर उपाय करत असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विमा अधिक सुलभ आणि परवडणारा बनवत आहेत. मोबाईल-आधारित, निर्देशांक-संलग्न (index-linked) आणि डेटा-चालित विमा मॉडेल्समुळे कार्यकारी खर्च कमी होतो आणि भरपाई जलद मिळते. तरीही मोठी दरी कायम आहे, जगातील 268 दशलक्ष अल्पभूधारक शेतकऱ्यांपैकी केवळ 19 टक्के शेतकरीच विमा संरक्षित आहेत. कमी स्वीकार, प्रणालीगत जोखीम, अविश्वसनीय डेटा आणि दुर्बल नियामक चौकटी हे प्रमुख अडथळे आहेत. आणखी एक उदयोन्मुख साधन म्हणजे पीअर-टू-पीअर कर्जपुरवठा (Peer-to-Peer lending), जो सामाजिक आणि पर्यावरणीय परिणामांसोबत आर्थिक परतावा शोधणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांना शेतकऱ्यांशी जोडतो. मात्र, गुंतवणूकदारांचे नुकसान टाळण्यासाठी या प्लॅटफॉर्म्सना उच्च प्रतिष्ठात्मक जोखीम हाताळावी लागते आणि कठोर गुणवत्ता मानके सुनिश्चित करावी लागतात. ब्लॉकचेन, बिग डेटा विश्लेषण आणि AI-आधारित क्रेडिट स्कोअरिंगसारखी प्रगत तंत्रज्ञाने मूल्य साखळीतील पारदर्शकता, जमीन नोंद व्यवस्थापन आणि जोखीम मूल्यांकनात आमूलाग्र बदल घडवत आहेत. तथापि, या नवकल्पनांमुळे डेटा गोपनीयता, गैरवापर आणि असमान नियामक देखरेखीबाबतही गंभीर चिंता निर्माण होत आहेत.

    फिनटेकशी निकटतेने जोडलेले अ‍ॅग्रीटेक (Agritech) अचूक शेती (प्रिसीजन फार्मिंग), प्रत्यक्ष वेळेतील निरीक्षण (रिअल टाइम मॉनिटरिंग) आणि निर्णय-सहाय्य प्रणालींमधून शेतीच्या कार्यपद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्स आर्थिक आणि गैर-आर्थिक सेवा एकत्रित करत असून, शेतकऱ्यांना एकाच इंटरफेसद्वारे शेतीसाठी लागणारी साधने, कर्ज, विमा, विश्लेषणात्मक माहिती आणि बाजारपेठांपर्यंत पोहोच मिळवून देत आहेत. इनपुट खरेदीपासून उत्पादन, साठवण आणि विपणनापर्यंत संपूर्ण कृषी-अन्न साखळीत फिनटेक महत्त्वाच्या अडथळ्यांवर उपाय करत आहे.

    तथापि, या साधनांनंतरही काही अडथळे कायम आहेत. डिजिटल दरी, ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीची कमतरता, स्मार्टफोनपर्यंत मर्यादित प्रवेश आणि कमी डिजिटल साक्षरता. डेटा प्रशासनाच्या (डेटा गव्हर्नन्स) चौकटी अजूनही अपुऱ्या असून, त्यामुळे शेतकरी गोपनीयतेच्या जोखमींना आणि सायबर धोक्यांना सामोरे जात आहेत. यासोबतच, हंगामी उत्पन्न, अनियमित रोख प्रवाह आणि मर्यादित तारण यांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी शेतकऱ्यांसाठी डिजिटल आर्थिक साधने स्वीकारणे कठीण बनवतात. संशोधनानुसार, हवामान आणि शाश्वततेच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशी अन्न प्रणालींची रूपांतरे साध्य करण्यासाठी दरवर्षी सुमारे 350 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक आहे, ज्यावर 15 पट परतावा मिळू शकतो. त्यामुळे फिनटेक आणि कृषी क्षेत्राचे एकत्रीकरण हे या वित्तीय तुटीला भरून काढण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी, लवचिकता मजबूत करण्यासाठी आणि अधिक समतोल अन्न प्रणाली उभारण्यासाठी सर्वाधिक प्रभावी साधनांपैकी एक ठरते. पुढील मोठे आव्हान म्हणजे ही डिजिटल क्रांती सर्वसमावेशक, टिकाऊ आणि शेतकरी तसेच पर्यावरण दोघांचेही संरक्षण करणाऱ्या सुयोग्य शासन चौकटीत राबवली जावी, याची खात्री करणे.


    शोभा सुरी ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मध्ये हेल्थ इनिशिएटिव्हच्या सिनियर फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.