-
CENTRES
Progammes & Centres
Location
फेमटेक हे तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांच्या आरोग्यावर केंद्रित नाविन्यपूर्ण कल्पनांची क्षमता आणि त्याचबरोबर महिलांना निधी, संशोधन आणि धोरणात्मक पाठबळ मिळण्यात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव करून देतं.
Image Source: Getty
हा लेख ‘नेशन्स, नेटवर्क्स, नरेटिव्हज: वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे 2025’ या लेख मालिकेचा भाग आहे.
“फेमटेक” हा शब्द 2016 मध्ये उद्योजिका आयडा टिन यांनी तयार केला. त्यामागची त्यांची मुख्य कल्पना म्हणजे तंत्रज्ञानाच्या जगात महिलांच्या आरोग्यविषयी खुल्या आणि नियमित चर्चा सुरू करणं. हा शब्द आरोग्य-तंत्रज्ञान क्षेत्रातील अशा व्यवसायांना एकत्र आणतो, जे विविध आरोग्यविषयांवर लक्ष केंद्रित करतात हे फक्त सिसजेंडर महिलांपुरते मर्यादित नसून, लिंग-अनुरूप नसलेले (gender nonconforming) किंवा लैंगिक अल्पसंख्याक महिलांचाही समावेश करतात. फेमटेकद्वारे मातृत्व आरोग्य, मासिक पाळी, वंध्यत्व, रजोनिवृत्ती आणि गर्भनिरोधक यासारख्या समस्यांवर उपाय दिले जातात. सुरुवातीला या क्षेत्राचा फोकस मासिक पाळी आणि वंध्यत्वावर होता, पण आता यात फिटनेस, मानसिक आरोग्य, लैंगिक कल्याण आणि महिला अधिक प्रमाणात प्रभावित होणाऱ्या सामान्य आजारांवरही काम सुरू आहे. जसं की ऑस्टिओपोरोसिस किंवा हृदयरोग.
सुरुवातीला या क्षेत्राचा फोकस मासिक पाळी आणि वंध्यत्वावर होता, पण आता यात फिटनेस, मानसिक आरोग्य, लैंगिक कल्याण आणि महिला अधिक प्रमाणात प्रभावित होणाऱ्या सामान्य आजारांवरही काम सुरू आहे.
वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे २०२५ मध्ये ‘डिजिटल परिवर्तनात लिंग समानता’ हा मुख्य विषय आहे. याच्या पार्श्वभूमीवर फेमटेक हे क्षेत्र महिलांच्या आरोग्यविषयक गरजांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या डिजिटल उपाययोजनांची एक महत्त्वाची, पण दुर्लक्षित बाजू मांडतं. वैयक्तिक आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा देण्याच्या फेमटेकच्या क्षमतेमुळे लाखो महिलांना सक्षम करता येऊ शकतं. पण त्याच वेळी, या क्षेत्राला निधी मिळण्यात लिंगभेद, कायदेशीर अडथळे आणि सामाजिक रूढींचा मोठा अडथळा येतो. पुढील भागांमध्ये हे मुद्दे अधिक स्पष्टपणे पाहता येतील.
कधी काळी आरोग्यसेवेतील एक उपशाखा समजली जाणारी फेमटेक आता एक जागतिक स्तरावर मान्यता मिळवलेलं महत्त्वाच क्षेत्र बनलं आहे. तंत्रज्ञानातील सततच्या प्रगतीमुळे आणि वैयक्तिक आरोग्यसेवांबद्दल जागरूकतेमुळे, महिलांसाठी खास उपायांची मागणी वाढली आहे. आता फेमटेक फक्त पाळीच्या ट्रॅकिंगपुरती मर्यादित न राहता, वंध्यत्व उपचार, मातृत्व सेवा, रजोनिवृत्तीची काळजी आणि दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनापर्यंत विस्तारली आहे. वापरता येणारी उपकरणं (wearables), मोबाइल अॅप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निदान (AI diagnostics) यांच्या वापरामुळे फेमटेकचं क्षेत्र अधिक वेगाने वाढत आहे.
जागतिक स्तरावर या क्षेत्रात दुपटीने वाढ होण्याचा अंदाज आहे. भारतामध्ये तर 2023 ते 2030 दरम्यान या क्षेत्राचा आकार तीनपट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे, जी देशांतर्गत वाढती गरज दर्शवते. अहवालानुसार, महिला त्यांच्या आरोग्यासाठी डिजिटल साधनं वापरण्याची शक्यता पुरुषांपेक्षा ७५ टक्के जास्त आहे, त्यामुळे फेमटेक हे बाजार क्षेत्र प्रचंड संधी असलेलं मानलं जातं.
फेमटेक फक्त पाळीच्या ट्रॅकिंगपुरती मर्यादित न राहता, वंध्यत्व उपचार, मातृत्व सेवा, रजोनिवृत्तीची काळजी आणि दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनापर्यंत विस्तारली आहे.
मात्र या प्रगतीच्या पार्श्वभूमीवरही, फेमटेकला अजूनही एकूण हेल्थटेक गुंतवणुकीचा फारच छोटा वाटा मिळतो, ज्यामुळे संशोधन व निधी वाटपातील लिंगभेद स्पष्ट होतो. फेमटेक क्षेत्राला फक्त १-२ टक्के आरोग्य-तंत्रज्ञानातील गुंतवणूक मिळते. इंपीरियल कॉलेज लंडनच्या अहवालानुसार, आजही गर्भधारण, प्रसूती आणि महिलांच्या पुनरुत्पादक आरोग्यासाठी केवळ २ टक्क्यांपेक्षा कमी संशोधन निधी वापरला जातो.
फेमटेक महिलांना आरोग्यसेवा मिळवण्याचा आणि अनुभवण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलण्याचं वचन देतं, पण लिंग-समानतेच्या वास्तवामुळे या क्षेत्राची वाढ अजूनही मर्यादित राहते आहे. प्रत्येक नावीन्यपूर्ण कल्पनेमागे काही मूलभूत अडथळे असतात, जे महिलांना त्यांच्या कल्पना ऐकून घेतल्या जाण्यात, निधी मिळवण्यात आणि तंत्रज्ञान व वैद्यकीय क्षेत्रात गंभीरपणे घेतलं जाण्यात येणाऱ्या अडचणी प्रतिबिंबित करतात:
१) तंत्रज्ञान क्षेत्रात वाढता लिंगभेद (Gender Disparity)
जागतिक बँकेच्या अहवालानुसार, तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये महिलांचं प्रमाण एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात महिलांचं प्रमाण घसरलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर, फक्त ३२ टक्के महिलाचं वरिष्ठ व्यवस्थापनाच्या पदांवर आहेत. महिलांचं निर्णय घेणाऱ्या पदांवर असणं अत्यंत कमी असल्यामुळे, फेमटेकसारख्या उत्पादनांचं विकास व प्राधान्य ठरवताना त्याचा मोठा परिणाम होतो.
२) निधी मिळण्यात लिंग भेदभाव
फेमटेकचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊनही, निधी वाटपामध्ये अजूनही खोलवर रुजलेला लिंगभेद दिसतो. महिला संस्थापकांना अनेकदा स्टार्टअपच्या जगात आपलं स्थान निर्माण करताना खूप संघर्ष करावा लागतो. भारतासह जागतिक स्तरावर अनेक फेमटेक कंपन्या महिलांनी स्थापन केलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या स्वतःच्या आरोग्यविषयक अनुभवातून प्रेरित झालेल्या असतात. व्हेंचर कॅपिटल (VC) निधीमध्येही स्पष्ट लिंगभेद आहे. पुरुष संस्थापकांना निधी मिळण्याची शक्यता महिला-संस्थापकांच्या तुलनेत चारपट जास्त असते. महिला संस्थापकांकडे तांत्रिक ज्ञान कमी आहे, त्या व्यवसाय चालवू शकणार नाहीत आणि जोखीम जास्त आहे, अशा समजुती व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदारांमध्ये असतात.
३) महिला-नेतृत्व असलेल्या फेमटेक स्टार्टअपसाठी कमी निधी
ज्या महिला नेतृत्व असलेल्या फेमटेक स्टार्टअपना निधी मिळतो, त्यांनाही पुरुष नेतृत्व असलेल्या कंपन्यांच्या तुलनेत कमी भांडवल मिळतं. अलीकडील विश्लेषणानुसार, 2010 पासून महिला-संस्थापक असलेल्या फेमटेक कंपन्यांनी प्रति व्यवहार सरासरी 23 टक्क्यांनी कमी निधी उभा केला. केवळ महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअपना फेमटेक क्षेत्रातील 28 टक्के गुंतवणूक मिळाली, तर पुरुष संस्थापकांच्या कंपन्यांना 38 टक्के वाटा गेला.
अलीकडील विश्लेषणानुसार, 2010 पासून महिला-संस्थापक असलेल्या फेमटेक कंपन्यांनी प्रति व्यवहार सरासरी 23 टक्क्यांनी कमी निधी उभा केला. केवळ महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअपना फेमटेक क्षेत्रातील 28 टक्के गुंतवणूक मिळाली, तर पुरुष संस्थापकांच्या कंपन्यांना 38 टक्के वाटा गेला.
हे आकडे केवळ तपशील नाहीत तर हेच आकडे ठरवतात की कोणती उत्पादने विकसित होणार, ती कोणासाठी असतील आणि त्यांचा विस्तार किती होईल. मासिक पाळी किंवा वंध्यत्वासारख्या वैयक्तिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील विषयांवर काम करणाऱ्या महिला संस्थापकांना, गुंतवणूकदारांकडून समज आणि सहानुभूती मिळत नाही, ही एक मोठी समस्या आहे.
४) हेल्थ आणि टेक रिसर्चमधील जेंडर डेटा गॅप्स
वैद्यकीय संशोधनाने अनेक वर्षांपासून पुरुषांवर केंद्रित संशोधन केल्यामुळे, महिलांच्या आरोग्यविषयक माहितीचा मोठा अभाव आहे. यामुळे अनेक रोगांबाबतची माहिती आणि औषधांचे परिणाम पुरुषांवर आधारित असतात आणि नंतर महिलांवर तशीच लागू केली जातात. विशेषतः पुनरुत्पादक आरोग्य, रजोनिवृत्ती किंवा हार्मोनल तक्रारींबाबत महिलांवर केंद्रित क्लिनिकल चाचण्या फारच कमी झाल्या आहेत. यामुळे फेमटेक स्टार्टअपना डेटा आधारित उत्पादने तयार करणं किंवा त्यांच्या परिणामकारकतेचा पुरावा देणं कठीण जातं. याचा परिणाम फक्त उत्पादनांवरच नाही, तर नियमांनुसार पालन आणि राष्ट्रीय आरोग्य प्रणालीत समावेश होण्यावरही होतो.
५) क्लचरल स्टिग्मा आणि सोसायटल टॅबू
फेमटेकसमोरील सर्वात वेगळा अडथळा म्हणजे महिलांच्या शरीराविषयी असलेल्या सांस्कृतिक मौनाला तोडणं. मासिक पाळी, वंध्यत्व, गर्भनिरोधक उपाय यासारख्या विषयांना सामाजिक संकोचाने लपवलं गेलं आहे आणि त्याचा परिणाम व्यवसायावरही होतो.
उदाहरण म्हणून, २०२५ मध्ये युरोपमधील सहा फेमटेक स्टार्टअप्सनी डिजिटल सेन्सॉरशिपविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी दाखवले की महिला आरोग्याविषयीची जाहिरात किंवा सोशल मीडिया पोस्ट्स केवळ वैद्यकीय शब्द वापरल्यामुळे "शॅडोबॅन" केल्या गेल्या किंवा काढून टाकल्या गेल्या. याउलट पुरुषांवरील उत्पादने (उदा. इरेक्टाइल डिसफंक्शन मेडिकेशन) सहजपणे प्रसिद्ध केल्या गेल्या. या सेन्सॉरशिपमुळे फेमटेक व्यवसायांना मोठं नुकसान होतं. जाहिराती रोखल्या गेल्यामुळे कमाई कमी होते आणि गुंतवणूक मिळवणं अवघड होतं.
मासिक पाळी, वंध्यत्व, गर्भनिरोधक उपाय यासारख्या विषयांना सामाजिक संकोचाने लपवलं गेलं आहे आणि त्याचा परिणाम व्यवसायावरही होतो.
या सर्व अडचणी एकत्रित पाहता असं लक्षात येतं की, फेमटेकमध्ये नाविन्य आहे, पण त्यासाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था मात्र नाही. त्यामुळे आता हे विचारणं गरजेचं आहे की, महिला-केंद्रित आरोग्य तंत्रज्ञानासाठी समर्थ धोरणात्मक पर्यावरण कसं असावं?
जरी ग्राहकांची गरज आणि सामाजिक गरज वाढत असली, तरीही 'फेमटेक' (महिलांच्या आरोग्याशी संबंधित तंत्रज्ञान) अजूनही आपल्या संस्थात्मक धोरणांत फारशी दिसून येत नाही. भारतातील सध्याच्या डिजिटल हेल्थ पॉलिसी आणि स्टार्टअपसाठी असलेल्या मदतीच्या योजना जसे की स्टार्टअप इंडिया आणि नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन, अजूनही फेमटेकला स्वतंत्र आणि महत्त्वाचा क्षेत्र म्हणून मान्यता देत नाहीत. ही अनुपस्थिती निष्पक्ष नाही यातून हे सूचित होते की फेमटेकच्या गरजांकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. याचा थेट परिणाम निधी वाटपावर, कोणती नवकल्पना मोठ्या प्रमाणावर पोचते यावर, आणि कोणाला महत्त्वपूर्ण उपाययोजना तयार करण्याची संधी मिळते यावर होतो.
मी या क्षेत्रात एक संशोधक म्हणून काम करत असल्यामुळे, मला हा दुवा अधिक ठळकपणे जाणवतो कारण संस्थापक आणि वापरकर्ते दोघांमध्येही या क्षेत्रात प्रगती करण्याची तीव्र इच्छा आहे. पण सध्याच्या धोरणांत, जरी त्यांचा हेतू सकारात्मक असला तरी, ते बहुधा सर्वसामान्य किंवा लिंग-निरपेक्ष पद्धतीने राबवले जातात. त्यामुळे मासिक पाळी, रजोनिवृत्ती किंवा प्रजनन क्षमता यांसारख्या लाजरवाण्या किंवा लिंग-विशिष्ट आरोग्य प्रश्नांवर काम करणाऱ्यांच्या गरजा त्या धोरणांमध्ये पुरेशा प्रमाणात सामावल्या जात नाहीत. हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत कारण हे अर्ध्या लोकसंख्येच्या आरोग्याशी, त्यांच्या स्वायत्ततेशी, आणि डिजिटल समावेशन व सार्वजनिक आरोग्य समतेच्या मोठ्या उद्दिष्टांशी थेट संबंधित आहेत.
आपण जेव्हा डिजिटल परिवर्तनात लैंगिक समानतेबद्दल चर्चा करतो, तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला हवा तो म्हणजे आपण अशा नवकल्पनांना जागा देतो आहोत का, ज्या महिलांच्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या गरजांशी जोडलेल्या आहेत? प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणावर धोरण बदलण्याची गरज नसते तर कधी कधी, योग्य ठिकाणी विचारपूर्वक आणि स्पष्ट पाठिंबा देणे हेच पुरेसे असते.
तनुषा त्यागी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील ‘सेंटर फॉर डिजिटल सोसायटीज’ येथे रिसर्च असिस्टंट आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Tanusha Tyagi is a research assistant with the Centre for Digital Societies at ORF. Her research focuses on issues of emerging technologies, data protection and ...
Read More +