-
CENTRES
Progammes & Centres
Location
भारतीय शिक्षण व्यवस्था अजूनही अनेक खोल आणि सतत चालू राहिलेल्या अडचणींना सामोरे जाते आहे. मोठ्या वर्गसंख्या, चांगल्या शिक्षकांची कमतरता (विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात), प्रचंड प्रशासकीय भार आणि विविध भाषांमुळे निर्माण होणारे आव्हान. अलीकडील संसद स्थायी समितीच्या अहवालानुसार, समग्र शिक्षा अभियान (SSA) अंतर्गत निधी मिळणाऱ्या शाळांमध्येच 10 लाख शिक्षक पदे रिक्त आहेत. यापैकी सुमारे 7.5 लाख रिक्त पदे प्राथमिक आणि पूर्व-प्राथमिक स्तरांवर आहेत. सर्व राज्यातील सरकारी शाळांचा विचार केल्यास ही स्थिती आणखी गंभीर असू शकते. उदाहरणार्थ, कर्नाटकमध्ये सध्या 55,000 शिक्षक पदे रिक्त आहेत, आणि एप्रिल 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात निवृत्ती झाल्यानंतर ही संख्या जवळपास 1,00,000 पर्यंत पोहोचू शकते.
UDISE+ च्या आकडेवारीनुसार, सुमारे 7 टक्के सरकारी शाळा एकाच शिक्षकावर चालतात. काही राज्यांमध्ये ही परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. जसे की झारखंडमध्ये 30.9 टक्के प्राथमिक शाळा एक-शिक्षक शाळा आहेत, ज्यांपैकी काही शाळांमध्ये विविध इयत्तांचे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. याशिवाय, शिक्षकांचा मोठा वेळ गैर-शैक्षणिक कामांमध्ये जातो. कागदपत्रे भरणे, डेटा अपलोड करणे, विविध सरकारी योजना, निवडणूक कर्तव्ये यामुळे वास्तविक अध्यापनाचे तास कमी होतात. फक्त मध्यान्ह भोजन योजनेशी संबंधित कामेच दररोज शिक्षकांच्या 2.5 ते 3 तासांपर्यंत वेळ घेतात. एकूण पाहता, शिक्षक आपला 33.9% वेळ मुख्य शैक्षणिक कामांवर (पाठयोजना, remedial teaching, मूल्यमापन, तपासणी, खेळ आणि सहशालेय उपक्रम), 21.6% वेळ प्रत्यक्ष अध्यापनात, तर उर्वरित 40–45% वेळ गैर-शैक्षणिक कामांमध्ये खर्च करतात. ही परिस्थिती शिक्षणाच्या गुणवत्तेला थेट धक्का देणारी आहे.
AI साधने प्रशासकीय कामांचा ताण कमी करू शकतात, बहुवर्गीय वर्ग व्यवस्थित हाताळण्यास मदत करू शकतात, विद्यार्थ्यांना वैयक्तिक शिकण्याचा अभिप्राय देऊ शकतात, शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीसाठी उपयुक्त ठरू शकतात आणि शिक्षकांची स्वायत्तता जपू शकतात.
सध्याच्या अत्यंत ताणलेल्या परिस्थितीत, ज्यात जवळच्या काळात कोणताही जलद बदल संभवत नाही. शिक्षणातील मुख्य प्रश्न असा आहे, शिक्षकांवरील ताण कसा कमी करायचा? त्यांचा वेळ कसा वाचवायचा? अध्यापनाची गुणवत्ता कशी टिकवायची? आणि शिक्षणातील समानता कशी राखायची? यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI). योग्यपणे तयार आणि वापरल्यास, AI शिक्षकांसाठी एक मजबूत सहकारी साधन ठरू शकते.
AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आता भारताच्या शिक्षण धोरणाचा महत्त्वाचा भाग बनत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 मध्ये तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाला स्पष्ट महत्त्व दिले आहे. मूलभूत शिक्षण सुधारण्यासाठी तयार केलेल्या ‘निपुण भारत’ कार्यक्रमाने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि remedial support देण्यासाठी AI चा वापर सुरू केला आहे. राज्य सरकारेही IBM, Intel यांसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांसोबत शिक्षकांना कौशल्यवृद्धी देण्यासाठी काम करत आहेत. 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठी AI Centre of Excellence तयार करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली, यातून दीर्घकालीन दृष्टीकोन दिसून येतो.
तसेच अभ्यासांनुसार भारतातील शिक्षक डिजिटल साधनांचा वापर अधिकाधिक शिकत आहेत. उदाहरणार्थ, केरळ आणि महाराष्ट्रात अनुक्रमे 87% आणि 75% शिक्षक ICT आधारित अध्यापनात प्रशिक्षित आहेत. बिहार, झारखंड आणि ओडिशा यांसारख्या राज्यांमध्ये डिजिटल प्रशिक्षण कमी असले तरी, दुर्गम आणि आदिवासी भागातील तरुण शिक्षक मल्टिमीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यात सफाईदार असल्याचे दिसते. म्हणूनच, प्री-सर्व्हिस प्रशिक्षणाने ज्या क्षेत्रांत कौशल्य कमी आहे तिथे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, जसे की सहयोगी शिक्षण सुलभ करण्यासाठी AI साधनांचा वापर, तांत्रिक समस्या सोडवणे, सुरक्षा आणि डेटा व्यवस्थापन शिकवणे इत्यादी.
कंत्राटी उपायांवर किंवा छोटी-मोठी सुधारणा करण्यापेक्षा, AI शिक्षकांना व्यापक आणि दीर्घकालीन मदत देऊ शकते. AI रोजच्या प्रशासकीय कामांचे स्वयंचलन करू शकते, वर्गात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवू शकते आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार वैयक्तिक शिकवणी सहाय्य देऊ शकते. यामुळे शिक्षकांचा भार कमी होतो आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढते.
त्यामुळे, प्रशिक्षणातून येणाऱ्या नवीन शिक्षकांमध्ये डिजिटल कौशल्ये वाढत असताना आणि AI शिक्षण धोरणाचा महत्त्वाचा भाग बनत असताना, शिक्षणातील अनेक परस्पर-जोडलेल्या समस्या सोडवण्यासाठी AI एक मोठी संधी निर्माण करते. तात्पुरत्या प्रशासकीय उपायांपेक्षा किंवा कंत्राटी कामगारांवर अवलंबून राहण्यापेक्षा, AI अशी साधने देते जी शिक्षकांना सर्वांगीण मदत करतात. नियमित कामे आपोआप करणे, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे आणि प्रत्येक वर्गाच्या गरजेनुसार वैयक्तिक सहाय्य देणे.
काही उदाहरणे आधीच या क्षमतेचे परिणाम दाखवत आहेत:
शिक्षा कोपायलट (कर्नाटक):
या साधनामुळे शिक्षकांचा धडा तयार करण्याचा वेळ 40 मिनिटांवरून सुमारे 10 मिनिटांवर आला, म्हणजे 70–80% वेळ सध्या शिक्षकांचा वाचतोय.
सहायक (Sahayak):
बहुवर्गीय वर्ग हाताळणाऱ्या शिक्षकांसाठी AI आधारित सहाय्यक. हे साधन अभ्यासक्रम समजते, वेगवेगळ्या इयत्तांसाठी वेगवेगळे कार्यपत्रक तयार करते, कथा आणि क्रियाकलाप बनवते, आणि हिंदी, मराठी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये काम करू शकते.
टीचमिंट (Teachmint) :
AI-आधारित वर्ग व्यवस्थापन व्यासपीठ यामध्ये स्वयंचलित उपस्थिती, गृहपाठ ट्रॅकिंग, विद्यार्थी प्रगती विश्लेषण इ. सेवा देते. मोबाइलवर सहज वापरता येत असल्याने ग्रामीण भागात याचा मोठा उपयोग होतो.
PrepAI:
विद्यार्थ्यांच्या पातळीला अनुरूप चाचण्या तयार करते, वैयक्तिक अभिप्राय देते आणि गुणांकनाची प्रक्रिया जलद करते, त्यामुळे शिक्षक अधिक वेळ प्रत्यक्ष शिकविण्यास देऊ शकतात.
ही साधने नवीन असली तरी त्यांचा परिणाम शाळांमध्ये स्पष्टपणे दिसतो आहे. AI मदतीने धडे तयार करणे, चाचण्या तपासणे आणि वर्ग व्यवस्थापन यावर लागणारा वेळ कमी होतो, आणि तो वेळ शिक्षक विद्यार्थी संवाद, मार्गदर्शन आणि शिकवणी गुणवत्तेसाठी वापरू शकतात. मॅकिन्सेच्या एका अभ्यासानुसार, तंत्रज्ञानामुळे शिक्षकांचा 20–30% वेळ वाचू शकतो, जो थेट अध्यापनासाठी वापरता येतो.

Source: McKinsey, 2020
या घडामोडींवरून पुढील महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की, शिक्षकांसाठी सहाय्यक प्रणाली म्हणून AI चा मोठ्या प्रमाणावर आणि संस्थात्मक पातळीवर विस्तार कसा करायचा. त्यामुळे धोरणे फक्त पायलट प्रकल्पांपुरती मर्यादित न राहता, टिकाऊ, नैतिक आणि स्थानिक परिस्थितीला समजून घेणाऱ्या पद्धतीने AI स्वीकृतीबाबत स्पष्ट धोरणे तयार करणे आवश्यक आहे. यासाठी AI साधने अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या निकषांशी सुसंगत असणे, मागास आणि दुर्गम भागातील शिक्षकांच्या डिजिटल कौशल्यांना सक्षम करणे, बहुभाषिक आणि बहुवर्गीय अनुकूलता सुनिश्चित करणे, तसेच डेटा गोपनीयता आणि पारदर्शी अल्गोरिदमसाठी कठोर सुरक्षा उपायांचा समावेश करणे आवश्यक आहे.
अशा प्रयत्नांमुळे AI हा फक्त एक प्रयोग न राहता, शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनू शकतो. ज्यामुळे शिक्षकांचा वेळ वाचेल आणि ते प्रत्यक्ष अध्यापन, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि समान शैक्षणिक परिणामांवर लक्ष केंद्रीत करू शकतील.
शिक्षकांच्या अनुभवांनुसार, AI च्या मदतीने धड्याची तयारी, चाचण्या आणि वर्ग व्यवस्थापन यात मोठी वेळ बचत होते, आणि तो वेळ थेट शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी वापरता येतो.
AI ची क्षमता प्रत्यक्ष वर्गात परिणाम देण्यासाठी, धोरणकर्त्यांनी ठोस आणि शिक्षक-केंद्रित निर्णय घ्यायला हवेत. खालील सूचना शिक्षकांचा कामाचा ताण कमी करण्यासाठी, अध्यापनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी समतोल शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी AI कसा वापरावा यासाठी दिशा दाखवतात. धोरणांनी अशा AI साधनांना प्राधान्य द्यावे जे शिक्षकांना थेट मदत करतील आणि वर्गातील वास्तविक परिस्थिती, बहुवर्गीय वर्गरचना आणि भाषिक विविधता लक्षात घेतील.
1) राज्यांनी स्पष्ट निकषांसह मंजुरी प्रक्रिया तयार करावी, ज्यामुळे शाळांना स्थानिक गरजांशी सुसंगत आणि प्रभावी AI साधने निवडता येतील. SCERT च्या माध्यमातून वापराचे आकडे, पायलटची गुणवत्ता आणि शिक्षक/विद्यार्थ्यांचे अनुभव यांचे रिअल-टाइम मूल्यांकन करणारी केंद्रीकृत मॉनिटरिंग व्यवस्था तयार केली जाऊ शकते.
2) AI-सहाय्यित धडा नियोजन, चाचणी डिझाईन, सहयोगी शिक्षण, सायबर सुरक्षा आणि तांत्रिक समस्या हाताळणी यांसाठी शिक्षकांचे लक्ष्यित कौशल्यवर्धन आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये AI चा जबाबदार वापर आणि त्याविषयी विचारपूर्ण समज विकसित करण्याची गरज आहे.
3) सहायक आणि टीचमिंट सारख्या साधनांनी दाखवून दिले आहे की अनुकूलनक्षम AI प्लॅटफॉर्म विद्यार्थी विविधतेशी जुळवून घेऊ शकतात. त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागांतील शाळांसह सर्व विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिकृत शिक्षण देणाऱ्या बहुभाषिक AI साधनांच्या विकासाला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.
4) AI च्या मदतीने प्रशासकीय कामे सुटसुटीत केली पाहिजेत. उदाहरणार्थ, डिजिटल उपस्थिती नोंद, शाळा व्यवस्थापनासाठी स्वयंचलित अहवाल, पालक संवाद, मध्यान्ह भोजन रेकॉर्ड, स्वच्छता निरीक्षण, सर्वेक्षण सादरीकरण यामुळे मोहिमा आणि तपासण्यांच्या वेळी शिक्षकांचा वेळ वाचेल.
5) AI चा वापर करताना नैतिक नियम, गोपनीयता सुरक्षा आणि स्पष्ट जबाबदारी मार्गदर्शक तत्त्वे अनिवार्य असली पाहिजेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी कठोर सुरक्षा उपाय असावेत.
6) AI चा अध्यापन, विद्यार्थ्यांचे शिकणे आणि समता यावर खरा परिणाम काय आहे हे मोजण्यासाठी काटेकोर मूल्यमापन आवश्यक आहे. प्रभावी मॉडेल्स विस्तारित करावेत, आणि जे उपयुक्त नाहीत त्यांचे सुधार किंवा बंद करून अनुभवातून शिकणे आवश्यक आहे.
7) सरकारने फक्त खरेदी-आधारित संबंधांवर अवलंबून न राहता, तंत्रज्ञान कंपन्या, एडटेक स्टार्टअप्स आणि स्वयंसेवी संस्थांसोबत सह-निर्मिती आणि उत्तरदायित्व-आधारित भागीदारीची रचना करावी. उपायांची उभारणी वर्गात शिक्षकांसोबत प्रत्यक्ष सहकार्याने व्हावी, आणि विशेषतः संसाधन-वंचित शाळांसाठी खर्च-प्रभावी उपायांना प्राधान्य द्यावे.
शिक्षकांसाठी अभिप्राय देण्याचे अधिकृत माध्यम असावे, ज्यामुळे उपाय वर्गातील बदलांना अनुरूप विकसित होऊ शकतील. सुयोग्य, विस्तारक्षम आणि नैतिक AI शिक्षणाला डिजिटल युगातही मानवकेंद्रित ठेवू शकतो, समता आणि उत्कृष्टता वाढवू शकतो. वेळ वाचवून आणि क्षमता वाढवून, AI प्रत्येक शिक्षकाला सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू देतो ते म्हणजे अध्यापन आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन.
अर्पन तुलसियान ह्या ओआरएफच्या सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक डिप्लोमसी (सीएनईडी) च्या सिनियर फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Arpan Tulsyan is a Senior Fellow at ORF’s Centre for New Economic Diplomacy (CNED). With 16 years of experience in development research and policy advocacy, Arpan ...
Read More +