Expert Speak Health Express
Published on Dec 27, 2025 Updated 0 Hours ago
जागतिक आरोग्याचा अलार्म: 2026 च्या नव्या आव्हानांना तयार आहात का?

Image Source: Getty Images

2025 मध्ये जागतिक आरोग्याने अत्यंत अस्थिर असा प्रवास अनुभवला ज्यात अमेरिकेची जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) अपेक्षित माघार, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) चे विघटन, तसेच जागतिक आरोग्य सभेत महत्त्वाच्या बहुपक्षीय आरोग्य करारांचा स्वीकार यांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्यासमोरील काही ठळक आव्हाने समोर आली असून, ती 2026 मध्ये अधिक ठसठशीतपणे पुढे येण्याची शक्यता आहे. हा लेख 2026 मध्ये जागतिक आरोग्यासमोरील तीन संभाव्य आव्हाने स्पष्ट करतो:
लसींबाबतच्या धोरणात्मक बदलांमुळे वाढणारे लसीकरणाने टाळता येणारे आजार, जागतिक आरोग्य उपक्रमांतील अमेरिकेची बदलती भूमिका आणि त्याचा बहुपक्षीय प्रयत्नांवर होणारा परिणाम, तसेच जागतिक स्थूलता (ओबेसिटी) संकटावर उपाय म्हणून औषधाधारित हस्तक्षेपांचे वाढते महत्त्व.

लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारांमध्ये वाढ

प्रथम, अमेरिकेतील साउथ कॅरोलिना राज्यात गोवर (measles) रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे, जी कोविड-19 महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्याशी साधर्म्य दर्शवते. दूरस्थ म्हणजेच रिमोट शिक्षण, विलगीकरण (क्वारंटाईन) आणि क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असलेली रुग्णालये हे सर्व वेगाने वाढणाऱ्या गोवर साथीचा सामना करणाऱ्या प्रदेशाचे चित्र उभे करतात. सध्या 126 जणांना गोवरची लागण झाली असून, त्यापैकी 119 जणांचे लसीकरण झालेले नव्हते. ही अमेरिकेतील यंदाची दुसरी मोठी साथ आहे; पहिली साथ याच वर्षाच्या सुरुवातीला टेक्सासमध्ये उद्भवली होती, जी नंतर मेक्सिकोच्या उत्तरेकडील भागांपर्यंत पसरली. लसविरोधी चळवळीचा प्रभाव, तसेच व्यापक चुकीची माहिती आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचार मोहिमांमुळे लसींबाबत संकोच वाढत आहे. परिणामी, पुढील वर्षी अमेरिका आपला ‘गोवरमुक्त’ दर्जा गमावण्याची दाट शक्यता आहे.

जागतिक स्तरावर लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारांचे ओझे वाढत चालले आहे. 2025 मध्ये जपान, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया येथे डांग्या खोकला (whooping cough) आणि गोवर (measles) यांचे मोठे उद्रेक नोंदवले गेले. कोविड-19 मुळे नियमित लसीकरण वेळापत्रकात आलेल्या व्यत्ययांचा विशेषतः कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील (LMICs) आरोग्य व्यवस्थांवर गंभीर परिणाम झाला. उच्च उत्पन्न देशांमध्ये लसींबाबतचा संकोच हा अविश्वास, राजकीय ध्रुवीकरण आणि पुराव्यावर आधारित संशोधनाविषयीच्या विरोधातून निर्माण झाला. अलीकडेच, अमेरिकेचे आरोग्य व मानवी सेवा मंत्री रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी लसी आणि ऑटिझमच्या विकासामध्ये मजबूत संबंध असल्याचे सूचित करणारी विधाने केल्यामुळे लसीकरणाचा स्वीकार आणखी कमी झाला आहे. त्यानंतर, अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने आपल्या संकेतस्थळावर अद्ययावत माहिती देत, लसी आणि ऑटिझम यांचा संबंध नाही हा निष्कर्ष पुराव्यावर आधारित नाही, तसेच अशा संभाव्य संबंधांवरील संशोधनाकडे आरोग्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा केला. अशा विधानांमुळे लसींच्या सुरक्षिततेबाबत शंका निर्माण झाल्या असल्या, तरी WHO च्या तज्ज्ञ समितीने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की लसी आणि ऑटिझम यांच्यात कोणताही संबंध असल्याचा पुरावा उपलब्ध नाही.

अमेरिकेच्या CDC च्या सल्लागार समितीने नियमित बाललसीकरण वेळापत्रकात बदल सुचवले असून, मंप्स, गोवर, रुबेला आणि चिकनपॉक्स (MMRV) यांची संयुक्त लस मर्यादित करण्याची आणि त्याऐवजी या आजारांविरोधात स्वतंत्र लसी देण्याची शिफारस केली आहे. MMRV संयुक्त लसीकरणामुळे दर 3000 पैकी एका प्रकरणात तापामुळे झटके (febrile seizures) येऊ शकतात, या चिंतेचा हवाला देत ही शिफारस करण्यात आली आहे. मात्र, या बदलामुळे लसीकरणाचे पालन कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, आईची चाचणी निगेटिव्ह आल्यास नवजात बाळांना हिपॅटायटिस बी लस देण्याची शिफारस समितीने मागे घेतली आहे.

एकत्रितपणे पाहता, सोशल मीडियामुळे वेगाने पसरत असलेल्या लसींच्या सुरक्षिततेविषयीच्या चुकीच्या माहितीनंतर लसीकरणाचा दर घटत चालला आहे, आणि ही प्रवृत्ती 2026 पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ज्याचा जागतिक आरोग्य सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळे लसींचे, विशेषतः बाललसीकरणाचे, फायदे जनतेपर्यंत स्पष्टपणे पोहोचवणे, चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या माहिती मोहिमांना आळा घालणे, आणि सार्वजनिक विश्वास निर्माण करण्यासाठी पुराव्यावर आधारित वैज्ञानिक संशोधन टिकवून ठेवणे ही जबाबदारी वैज्ञानिक आणि वैद्यकीय समुदायावर असेल.

हे सर्व अशा वेळी घडत आहे, जेव्हा अमेरिका लस आघाडी ‘गावी’ नामक वॅक्सिन अलायन्स (Gavi, the Vaccine Alliance) साठीचा आपला निधी कमी करत आहे. जरी अमेरिका हा गावीचा सर्वात महत्त्वाची देणगीदार देशांपैकी एक असली तरी. कमी व मध्यम उत्पन्न देशांमध्ये (LMICs) लसीकरण उपक्रमांना पाठबळ देणे आणि लस सेवांपर्यंत समतोल प्रवेश सुनिश्चित करणे या दृष्टीने गावीची भूमिका जागतिक आरोग्य सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. जून 2025 मध्ये झालेल्या गावीच्या प्रतिज्ञा शिखर परिषदेत संस्थेला आपल्या प्रारंभीच्या 11 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले नाही. याचा थेट परिणाम लसींच्या जागतिक साठवणुकीवर, साथीच्या उद्रेकांना दिल्या जाणाऱ्या जलद प्रतिसादावर, तसेच प्रादेशिक लस उत्पादन क्षमता बळकट करण्याच्या प्रयत्नांवर होण्याची शक्यता आहे. लसींबाबत वाढणाऱ्या संकोचासोबत ही घडामोड एकत्रितपणे जगभर दूरगामी परिणाम घडवून आणेल आणि लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारांवरील जागतिक आरोग्य प्रतिसाद कमकुवत करेल.

गुंतागुंतीच्या जागतिक आरोग्य वाटाघाटी

ही आव्हाने लसीकरण कार्यक्रम टिकवून ठेवण्यातील अडचणी अधोरेखित करत असतानाच, आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांमध्ये (इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन्स) करण्यात आलेल्या दुरुस्त्या आणि महामारी कराराच्या (पँडेमिक अग्रीमेंट) स्वीकारामुळे जागतिक आरोग्य चौकट नव्याने सक्रीय झाली आहे. या करारातील एक महत्त्वाचा घटक PABS (पॅथोजन असोसिएटेड बेनिफिट शेअरिंग) यंत्रणा परिशिष्टात ठेवण्यात आली असून सध्या त्यावर वाटाघाटी सुरू आहेत. आतापर्यंतच्या चर्चांमध्ये प्रामुख्याने महामारीची क्षमता असलेल्या रोगजंतूंविषयीची जनुकीय अनुक्रमणिका माहिती (जेनेटिक सिक्वेन्स इन्फॉर्मेशन) आणि संबंधित डेटापर्यंत समतोल व न्याय्य प्रवेश, तसेच वैद्यकीय प्रतिबंधक साधनांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. तथापि, हा करार प्रभावी ठरायचा असेल तर त्याला इतरही अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि त्यावर उपाययोजना कराव्या लागतील.

विकसनशील देश PABS (पॅथोजन असोसिएटेड बेनिफिट शेअरिंग) यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित व्हावी यासाठी रोगजंतूविषयक माहिती प्राप्त करणाऱ्यांवर करारात्मक बंधने घालण्याची मागणी करत आहेत. PABS संदर्भातील आंतर-सरकारी कार्यगट (इंटरगव्हर्नमेंटल वर्किंग ग्रूप – IGWG) जानेवारी 2026 मध्ये पुन्हा वाटाघाटी सुरू करणार आहे. दरम्यान, सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेने ‘अमेरिका फर्स्ट ग्लोबल हेल्थ स्ट्रॅटेजी’ जाहीर केली. जरी अमेरिकेने महामारी करार स्वीकारलेला नसला, तरी तिने वैयक्तिक देशांशी जागतिक आरोग्य उपक्रमांबाबत स्वतंत्रपणे वाटाघाटी सुरू केल्या आहेत. केनिया आणि रवांडा यांच्याशी द्विपक्षीय करार केला ज्यात पॅथोजन शेअरिंग करारांचाही समावेश आहे. असे करार आधीच सुरू करण्यात आले आहेत. अशा द्विपक्षीय व्यवस्था PABS वाटाघाटींच्या भविष्यातील दिशेला आकार देऊ शकतात.

वजन कमी करणाऱ्या औषधांची भरभराट

शेवटी, 2026 मध्ये असंसर्गजन्य आजारांवर विशेषतः जागतिक स्थूलता (ओबेसिटी) संकटावर उपाय म्हणून औषधांचा व्यापक वापर वाढताना दिसण्याची शक्यता आहे. सेमाग्लुटाइड [ग्लूकागॉनसदृश पेप्टाइड-1 (GLP-1) रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट] या औषधाचे पेटंट कालबाह्य होण्याच्या जवळ आहे, आणि ओझेम्पिक व वेगोव्ही (सेमाग्लुटाइडची ब्रँड नावे) यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. भारतासह अनेक देशांतील वजन कमी करण्याच्या बाजारपेठा वेगाने विस्तारण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, येथे सावधगिरी आवश्यक आहे. पूरक औषध मंजुरींमध्ये अनेकदा दीर्घकालीन परिणामांबाबत आणि औषधांच्या कार्यपद्धतींबाबत (मॉलेक्युलर मेकॅनिसम्स) पूर्ण स्पष्टता नसते, तसेच लाभ टिकवून ठेवण्यासाठी दीर्घकाळ औषधांवर अवलंबून राहावे लागू शकते. या उपचारांचा उच्च आर्थिक भार आणि स्थूलतेचे गुंतागुंतीचे स्वरूप या औषधांच्या भूमिकेला अधिक क्लिष्ट बनवते. जागतिक स्थूलता संकटावर उपाय म्हणून औषधे प्रथमोपचार म्हणून वापरावीत की नाही, यावर वैद्यकीय तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ञांमध्ये मतभेद आहेत. या औषधांचा व्यापक स्वीकार आरोग्य असमानता अधिक तीव्र करू शकतो कारण संपन्न वर्गाला या अत्याधुनिक उपचारांपर्यंत सहज प्रवेश मिळू शकतो, तर कमी उत्पन्न गटांसाठी तो मर्यादितच राहण्याची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त, औषधांपर्यंतच्या प्रवेशासंदर्भातील नैतिक प्रश्नांवरही गांभीर्याने विचार करणे आवश्यक ठरेल. वैद्यकीयदृष्ट्या वजन कमी करणाऱ्या औषधांची आवश्यकता असलेल्या रुग्णांमध्ये आणि केवळ सौंदर्यात्मक कारणांसाठी ही औषधे वापरणाऱ्यांमध्ये स्पष्ट फरक करणे महत्त्वाचे ठरेल, कारण याचा थेट परिणाम औषधांच्या उपलब्धतेवर होईल. ही बाब आधीच चिंतेचा विषय ठरत असून, वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून बनावट औषधांचे उत्पादनही सुरू झाले आहे. पेटंट कालबाह्य होण्याच्या पार्श्वभूमीवर, 2026 मध्ये स्थूलतेवर ‘जलद उपाय’ म्हणून औषधाधारित हस्तक्षेप योग्य आहेत का, तसेच त्यांच्या वापरावर अधिक काटेकोर देखरेख असावी का आणि स्थूलतेच्या मूळ कारणांवर उपाय करण्यासाठी औषधांपलीकडे जाणारे प्रयत्न आवश्यक आहेत का यावर व्यापक धोरणात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे.

पुढील वाटचाल

जागतिक आरोग्य 2026 मध्ये प्रवेश करत असताना, उदयोन्मुख बहुपक्षीय व्यवस्थेतील कमकुवतपणाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, विशेषतः वाढत्या राजकीयकरणामुळे आणि बाजारकेंद्री दृष्टिकोनामुळे. लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारांचा पुनरुच्चार हा विज्ञान आणि वैद्यकशास्त्रावरील विश्वासाच्या झीजेचे द्योतक आहे, तर जागतिक आरोग्यात अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेला सामोरे जाण्यासाठी सामूहिक कृतीची गरज भासेल. स्थूलतेच्या संकटावर उपाय म्हणून औषधाधारित हस्तक्षेपांचा झपाट्याने वाढणारा वापर, आरोग्यसेवांमधील प्रवेशातील असमानता अधिक तीव्र होण्याचा धोका दर्शवतो, तसेच जीवनशैलीत बदल घडवणाऱ्या आरोग्य उपायांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण करतो. एकत्रितपणे पाहता, 2026 हे विज्ञानावरील विश्वास पुनर्स्थापित करण्याची, नवोन्मेष आणि समतोल आरोग्य परिणाम यांच्यात योग्य समतोल साधण्याची एक महत्त्वाची संधी देत आहे.


लक्ष्मी रामकृष्णन ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक डिप्लोमसीमध्ये असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.