-
CENTRES
Progammes & Centres
Location
हवामान बदलामुळे मानसिक आरोग्यावर चोरपावलाने संकट येते. मानसिक आघात व पर्यावरणीय चिंतेपासून ते वाढती आक्रमकता आणि असमानतेपर्यंत या संकटाची व्याप्ती असते. त्यावर त्वरित धोरणात्मक कृती करणे आवश्यक आहे.
Image Source: Getty Images
सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीनंतर ग्लेशियल लेकला आलेला पूर हा हवामान बदलामुळे हिमनदी वितळल्याने आला होता. अलीकडील काळातील सर्वांत मोठ्या आपत्तींपैकी एक असलेल्या या नैसर्गिक आपत्तीत सात हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले. बचावलेली मुले व प्रौढांमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD), अस्वस्थता आणि पॅनिक ॲटॅक असे त्रास नोंदवण्यात आले आहेत. बाधित भागात आरोग्यसेवा पुरवण्याकडे लक्ष दिले जात असले, तरी आपत्ती व्यवस्थापन योजनांमध्ये (DMPs) पीडितांसाठी समुपदेशन आणि मानसोपचार मदतीसंबंधात कोणतेही उल्लेख आढळत नाहीत. विश्वासार्ह माहितीच्या अभावामुळे बचावलेल्यांचे पुनर्वसन व पुनर्बांधणी करण्याची क्षमता निश्चित करणे कठीण झाले आहे.
जागतिक सरासरी तापमानात दर वर्षी वाढ होत आहे. 2024 हे वर्ष सर्वांत उष्ण असलेले विक्रमी वर्ष ठरले. कारण दर महिन्यात 1.5 अंश सेल्सियस तापमानवाढीची मर्यादा ओलांडली गेली. हवामान बदल, पायाभूत सुविधा, शेती आणि मानवी आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून आले; परंतु हवामानविषयक आपत्तींचा सर्वांत दुर्लक्षित परिणाम म्हणजे आपले मानसिक आरोग्य मानले जात आहे. जागतिक स्तरावरील आजारांमधील मानसिक विकारांचा वाटा 6.54 टक्के आहे. स्रोतांची असुरक्षितता, विस्थापन आणि पर्यावरणीय चिंता यांच्याशी संबंधित ताणतणाव वाढत असल्याने या विकारांचा वाटाही वाढत आहे, यावर एकमत होत आहे. साथरोगासंबंधीच्या विविध प्रकारच्या अभ्यासांमधून हवामान बदलाचे वैविध्यपूर्ण पैलू आणि मानसिक आरोग्याच्या परिणामांमधील संबंध जोडण्याचा प्रयत्न केला असला, तरी या घटनांच्या प्रक्रियेचा अभ्यास अद्याप करण्यात आलेला नाही. पद्धतशीर माहिती संकलनाचा अभाव असल्याने या संकटाच्या तीव्रतेकडे दुर्लक्ष होते.
हिंद महासागरात 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीतून बचावलेल्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात 27.2 टक्के लोकांमध्ये नैराश्य व चिंता आणि 79.7 टक्के लोकांच्या मनावर सौम्य ते गंभीर प्रकारचा तणाव असल्याचे दिसून आले.
मात्र वाढत्या तापमानाचा विस्थापित समूहांच्या पुनर्वसनावर, गुन्हेगारी वर्तनावर, आकलनशक्तीवर आणि उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. या संदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा हवामान बदल आणि मानसिक आरोग्यावरील राष्ट्रीय कृती आराखडा (NPCCMH) हे एक प्रशंसनीय पाऊल आहे. यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यापक आराखडा तयार झाला आहे. तरीही स्थानिक धोरणात्मक गोष्टींमध्ये या आराखड्याचा समावेश करणे अद्याप बाकी आहे.
हवामान बदलामुळे जगभरात टोकाच्या घटनांची वारंवारिता आणि तीव्रता वाढली आहे. अशा आपत्तींनंतर अन्न व पाण्याची असुरक्षितता, बेरोजगारी आणि बेघरपणा वाढतो. त्यामुळे विस्थापित समुदायांमध्ये विविध मानसिक विकार उद्भवू शकतात. अशा विकारांचे प्रमाण नैसर्गिक आपत्तींमध्ये होणाऱ्या शारीरिक दुखापतींपेक्षा 40 टक्के अधिक असते.
हिंद महासागरात 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीतून बचावलेल्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात 27.2 टक्के लोकांमध्ये नैराश्य व चिंता आणि 79.7 टक्के लोकांच्या मनावर सौम्य ते गंभीर प्रकारचा तणाव असल्याचे दिसून आले. पूर आणि भूस्खलनाच्या आपत्तींमधून बचावलेल्यांमध्ये निद्राविकारांचे प्रमाण आणि अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले. नैसर्गिक आपत्तींचा परिणाम गर्भातील बाळांवरही होऊ शकतो आणि त्यांना ADHD आणि ऑटिझमसारख्या न्यूरोडेव्हलपमेंटल आजारांचा धोकाही वाढू शकतो. एवढेच नव्हे, तर नैसर्गिक आपत्तींमुळे मानसिक विकार वाढतात, असे नव्हे, तर प्रतिकूल हवामानही हे प्रमाण वाढवू शकते. कारण तापमानातील वाढीमुळे दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ शकतो.
तापमान व वर्तनाच्या परिणामांचा संबंध असतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे. तापमानामुळे रक्तप्रवाह आणि सेरोटोनिनची पातळी बदलू शकते; तसेच आपल्या झोपेवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. उच्च तापमानामुळे चिडचिडेपणा, मानसिक स्थितीत सातत्याने बदल आणि आक्रमक वर्तनही वाढते, असे दिसून आले आहे. या स्थितीस ‘टेम्परेचर ॲग्रेशन हायपोथिसिस’ असे संबोधतात. येल स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटच्या मेटा विश्लेषणानुसार, या प्रक्रियेमुळे आशियातील काही भागांमध्ये सरासरी तापमानातील वाढीमुळे खून व लैंगिक गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली, असे स्पष्ट झाले आहे. वार्षिक सरासरी तापमानात एक अंश सेल्सियस वाढ झाली, तरी दक्षिण आशियामध्ये महिलांसंबंधीच्या हिंसाचाराचे प्रमाण 4.49 टक्क्यांनी वाढल्याचे आढळून आले. वाढते काँक्रिटीकरण, वाहनांचे प्रदूषण आणि वातानुकूलन यांमुळे महानगरांचे शहरी उष्ण बेटांमध्ये (UHIs) रूपांतर होत असल्याने हा प्रवाह तीव्रतेने दिसून आला. सिडनीच्या अर्बन हिट मॅपिंग मॉडेलच्या निष्कर्षानुसार, UHIs मधील पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने आणि हरितपट्ट्यांचे प्रमाण कमी झाल्याने हिंसक प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मध्यम तापमानाच्या तुलनेत विद्यार्थी उच्च तापमानात संज्ञानात्मक कार्ये अधिक मंदगतीने करतात, असे हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासातून दिसून आले आहे.
उच्च तापमानामुळे आक्रमकतेत वाढ होते आणि या वाढीचा परिणाम आपल्या ऑनलाइन वर्तनावरही होतो. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात अमेरिकेतील स्थानिक सरासरी तापमानाचा संबंध द्वेषयुक्त ट्वीट्सशी जोडण्यात आला आहे. तापमानाचे प्रमाण मध्यम श्रेणीकडून तीव्र उष्ण हवामानाकडे गेल्यावर ऑनलाइन द्वेषपूर्ण वक्तव्यांमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले. डिजिटल मीडिया हा तरुणांमध्ये सामाजिक संवादाचा प्राथमिक स्रोत बनला आहे. त्यामुळे तीव्र तापमानामुळे निर्माण झालेल्या टोकाच्या वर्तनांमुळे ऑनलाइन छळाचे प्रमाण वाढू शकते; तसेच एकटेपणा, नैराश्य आणि स्वतःलाच इजा करणे अशा भावनांमध्ये वाढ होऊ शकते.
वाढत्या तापमानाचे परिणाम आपल्या वर्तनात बदल करण्यापलीकडे जातात आणि ते आपल्या मेंदूच्या संज्ञानात्मक कार्यामध्ये अडथळा आणू शकतात. कार्बन डायऑक्साइडसारख्या हरितगृहातील वायूंचे वाढलेले प्रमाण आपल्या सारासार बुद्धीच्या, समस्या सोडवण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणू शकते. कारण ते शरीरातील न्यूरोट्रान्समिशन कार्यामध्ये अडथळे आणू शकतात. मध्यम तापमानाच्या तुलनेत विद्यार्थी उच्च तापमानात संज्ञानात्मक कार्ये अधिक मंदगतीने करतात, असे हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासातून दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी केलेल्या नियंत्रित सर्वेक्षणात हरितगृहातील वायू मानल्या जाणाऱ्या काही ‘व्होलाटाइल ऑरगॅनिक कम्पाउंड्स’ असलेल्या जागेत काम करणाऱ्यांच्या समकक्षांपेक्षा संज्ञानात्मक चाचण्यांमध्ये 61 टक्के अधिक गुण मिळाले. यामुळे कामाच्या जागेवर परिणाम होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अंदाजानुसार, वाढत्या तापमानाच्या ताणामुळे 2030 पर्यंत कामगार उत्पादकतेचे 2400 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते.
मानसिक आरोग्यावरील परिणामांचा गरीब, उपेक्षित आणि असुरक्षित समुदायांवर विषम परिणाम होईल. नैसर्गिक आपत्तींमध्ये बचावलेल्या अल्प उत्पन्न गटातील लोकांमध्ये नैराश्य व चिंता यांचे प्रमाण अधिक आहे, असे सर्वेक्षणातून दिसून आले. पर्वतीय, किनारपट्टीवरील आणि द्विप प्रदेशात राहणाऱ्या समुदायांना विस्थापनामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय चिंतेचा धोका अधिक असेल.
नैसर्गिक आपत्तींमध्ये बचावलेल्या अल्प उत्पन्न गटातील लोकांमध्ये नैराश्य व चिंता यांचे प्रमाण अधिक आहे, असे सर्वेक्षणातून दिसून आले.
त्याचप्रमाणे शहरे, झोपडपट्ट्या व मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असलेल्या अनियमित वसाहतींच्या तुलनेत हिरवाई असलेली निवासस्थानाची ठिकाणे आणि वातानुकूलित सुविधा असलेल्या ठिकाणांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न कमी असतील. या असमानतेत आणखी वाढ होईल. कारण नंतरचे रहिवासी सामान्यतः शेती आणि बांधकाम यांसारख्या क्षेत्रांत अनौपचारिकरीत्या काम करतात. त्यांवर वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम होईल. शाळा आणि कामाच्या ठिकाणीही असाच कल दिसून येईल. या प्रकारे जागतिक तापमानवाढीचा मानसिक आरोग्यावरील परिणाम वाढत्या उत्पन्न आणि आर्थिक असमानतेचे कारण बनेल.
धोरणात्मक साधनांची रचना करण्यातील एक प्रमुख अडथळा म्हणजे सातत्यपूर्ण डेटाचा अभाव. आपत्ती व्यवस्थापन चक्रात बाधित समुदायांच्या मानसिक-सामाजिक जोखीम प्रोफाइलिंगसाठी NDMA ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत; परंतु आवश्यक डेटा संकलनासाठी राज्य अथवा जिल्हा DMP मध्ये SOP चा अभाव आहे. या संदर्भात, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात आघाडीवर असलेल्या जपानने डिझास्टर मेंटल हेल्थ केअर सेंटर्स आणि डिझास्टर सायकिॲट्रिक ॲसेसमेंट टीम सिस्टीम डेटाबेस स्थापन केले आहेत. ते विशिष्ट आपत्तींनंतर आणि प्रादेशिक स्तरावरील समुपदेशकांकडून डेटा एकत्रित करतात. अशा मॉडेल्सचा समावेश राष्ट्रीय स्तरावरील आणि जिल्हा स्तरावरील DMP मध्ये करून भारताला लाभ घेता येऊ शकतो.
त्याचप्रमाणे वाढत्या तापमानाचा सामान्य मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेण्यासाठी डेटाची आवश्यकता आहे. हे कमी करण्यासाठी NPCCMH जिल्हा पर्यावरण आरोग्य कक्षांच्या माध्यमातून दक्षता ठेवण्यासाठी कार्यक्रमांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांना सरकारी आरोग्य सेवा सुविधांमधून ‘मानसिक आरोग्य समस्यां’बद्दल डेटा गोळा करणे आणि तो एकत्रित करणे, हे काम सोपवले जाते. या योजनेत कार्यक्षम अंमलबजावणीसाठी या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट करावी आणि IMD च्या ‘क्लायमेट हॅजार्ड अँड व्हल्नरेबिलिटी ॲटलास ऑफ इंडिया’चा वापर करून महत्त्वपूर्ण जिल्ह्यांची निवड करावी.
या प्रयत्नांचा वापर करून विशेषतः असुरक्षित समुदायांना अधिक चांगली मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायला हवी. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या टेली मानस कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी केंद्रे किंवा टेली-समुपदेशन सेवांच्या माध्यमातून स्थानिक समुपदेशन सेवा प्रदान करण्यासाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’ ही उपयुक्त साधने ठरू शकतात.
‘UHI इफेक्ट’शी सामना करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरी भागात सरासरी पृष्ठभागाचे तापमान 2.5 अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते. शहरांमधील हरितपट्ट्यांचा विस्तार, स्थानिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, जिल्हा शीतकरण प्रणाली, छतांना चुन्याचा थर देणे आणि स्थानिक हवामानास अनुकूल बांधकाम पद्धतींचा अवलंब करणे यांसारख्या धोरणांमुळे तापमान नियंत्रित राखण्यास मदत होऊ शकते. शहरांमधील उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी नगर वन योजना, अमृत सरोवर योजना आणि स्टेट कुल रूफ पॉलिसी यांसारख्या शहरी विकास योजनांचा वापर केला जाऊ शकतो.
उत्पन्न, संपत्ती आणि स्रोतांच्या उपलब्धतेतील असमानता वाढत असताना मानसिक आरोग्यावर आलेला भारही वाढलेला दिसून येतो. कारण हवामान बदलाच्या विषम परिणामांमुळे जागतिक स्तरावर असमानतेची दरी वाढणार आहे. याचा परिणाम म्हणजे, मानसिक आरोग्यासंबंधीच्या आव्हानांना तोंड देणे हे सामुदायिक आरोग्य आणि सामाजिक एकात्मतेसाठी औचित्यपूर्ण बनले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य राष्ट्रीय सरकारांना या आव्हानांची जाणीव असली, तरी धोरणात्मक पातळीवर केवळ मान्यता देणे पुरेसे ठरणार नाही. नियोजनबद्ध डेटा संकलन आणि मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवण्यासाठी बहु भागीदार आणि आंतरमंत्रालयीन दृष्टिकोन महत्त्वपूर्ण आहे. शहरी भागात उष्णतेच्या ताणाला आवर घालण्यासाठी अधिक गुंतवणूक आवश्यक आहे. भारताला भविष्यातील प्रतिकूल परिस्थितीला तोंड देताना लवचिक प्रतिसाद देण्यासाठी एक आंतरक्षेत्रीय व्यापक दृष्टिकोन गरजेचा आहे.
आद्या चतुर्वेदी या ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनमधील ‘सेंटर फॉर इकनॉमी अँड ग्रोथ’मध्ये रिसर्च असिस्टंट आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Aadya Chaturvedi is a Research Assistant with ORF’s Center for Economy and Growth. Her work focuses on Energy and Climate Change, specifically on critical minerals, renewables, ...
Read More +