Author : Ayjaz Wani

Expert Speak Raisina Debates
Published on Jul 22, 2025 Updated 0 Hours ago

वाढते मतभेद आणि राष्ट्रांचा सहभाग शांघाय सहकार्य संघटनेच्या दहशतवादविरोधी अजेंडाला बाधा आणत आहेत, ज्यामुळे तिच्या 'शांघाय स्पिरीट'च्या मर्यादा उघड होत आहेत.

दहशतवादविरोधाचं नाटक: SCO चा मुखवटा आणि वास्तव

Image Source: VCG/Getty Images

    26 जून 2025 रोजी चीनच्या छिंगदाओ शहरात 22 व्या शांघाय कोओपेरशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली, ज्यामध्ये नऊ सदस्य राष्ट्रे, तीन निरीक्षक राष्ट्रे आणि 14 संवाद भागीदार (dialogue partners) राष्ट्रांचा सहभाग होता. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला कारण त्यामध्ये पाकिस्तानने केलेल्या पहलगाममधील घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नव्हता. त्याऐवजी, घोषणापत्रात बलुचिस्तानमधील बंडखोर हालचालींचा उल्लेख करण्यात आला होता, ज्यामुळे SCO क्षेत्रातील दहशतवाद आणि प्रादेशिक सुरक्षेवरील नवी दिल्लीची भूमिका कमकुवत होऊ शकली असती. 1996 मध्ये शांघाय फाइव्हच्या स्थापनेपासून या प्रादेशिक गटाचा प्रमुख भर सुरक्षा आणि दहशतवादविरोधी लढ्यावर आहे, मात्र गेल्या काही वर्षांत या क्षेत्रांतील वाढत्या मतभेदांमुळे SCO च्या ‘शांघाय स्पिरीट’चे महत्त्व कमी झाले आहे. याशिवाय, काही सदस्य देशांनी गुपचूपपणे दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिला असून त्यामुळे ते प्रदेश दहशतवादाचे वाढते केंद्रबिंदू बनले आहेत.

    घोषणापत्रात बलुचिस्तानमधील बंडखोर हालचालींचा उल्लेख करण्यात आला होता, ज्यामुळे SCO क्षेत्रातील दहशतवाद आणि प्रादेशिक सुरक्षेवरील नवी दिल्लीची भूमिका कमकुवत होऊ शकली असती.

    दहशतवादविरोधी लढा आणि SCO

    1996 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लगेचच शांघाय फाइव्हने दहशतवाद, उग्रवाद आणि फुटीरतावादाविरोधात लढा देण्यावर लक्ष केंद्रित केले, आणि ही उद्दिष्टे नंतर SCO च्या स्थापनेच्या सनदेमधील कलम 1 मध्ये औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आली. 2001 मध्ये उझबेकिस्तानच्या सहभागामुळे शांघाय फाइव्हचा विस्तार होऊन शांघाय सहकार्य संघटनेचा (SCO) जन्म झाला. या बहुपक्षीय संघटनेच्या उद्घाटन समारंभात कझाकस्तानचे अध्यक्ष नुरसुल्तान नझारबायेव यांनी अफगाणिस्तानला 'दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवादाचे पाळणाघर' असे संबोधले, कारण त्या काळात या भागावर दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढलेला होता. SCO ची दहशतवादविरोधी धोरणे कार्यान्वित करून त्यांना अधिक संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी ‘प्रादेशिक दहशतवादविरोधी संरचना’ (रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर RATS) या कार्यकारी समितीच्या माध्यमातून ती मजबूत करण्यात आली, जी SCO च्या दोन कायमस्वरूपी संस्थांपैकी एक आहे. RATS केवळ दहशतवादाचा सामना करण्यासाठीच नव्हे, तर सदस्य देशांना दहशतवादविरोधी कारवायांची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी सुरक्षा कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण देणे आणि दहशतवादी गटांविषयी गुप्त माहिती गोळा करणे या कामांसाठी सहाय्य करते.

    SCO ने आपले सदस्यत्व वाढवण्यापूर्वी, RATS ने दहशतवादविरोधी लढ्यात प्रभावी कामगिरी बजावली होती. 2011 ते 2015 या कालावधीत, या संस्थेने 20 दहशतवादी हल्ले उधळून लावले, 440 प्रशिक्षण शिबिरे नष्ट केली, विविध गटांतील 2700 पेक्षा अधिक उग्रवाद्यांना अटक केली आणि 1700 जणांचा खात्मा केला. त्यांनी 4,50,000 गोळ्या व स्फोटक साहित्य, 50 टन स्फोटके जप्त केली आणि दहशतवाद, गुन्हेगारी आणि अमली पदार्थांविषयी माहिती शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले. RATS च्या माध्यमातून सदस्य देशांनी त्यांच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांचा विस्तार केला आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले, कारण अशा तस्करीतून राष्ट्रविरोधी कारवायांना आणि दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ मिळत होते.

    वाढते मतभेद, चीनचा वाढता प्रभाव आणि पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाला दिला जाणारा गुप्त पाठिंबा यामुळे, नवी दिल्लीने SCO ला सर्वसमावेशक आणि कोणत्याही एकाच देशाच्या वर्चस्वाविना चालणारी संघटना बनवण्याचा प्रयत्न करूनही, हा भाग दहशतवाद आणि हिंसाचारासाठी अधिक असुरक्षित बनला आहे.

    भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये अधिकृतपणे SCO चे पूर्ण सदस्य बनले, त्याआधी 2005 पासून ते निरीक्षक राष्ट्रे होती. नवी दिल्लीने या गटामध्ये दहशतवादविरोधी प्रयत्नांना नेहमीच सक्रियपणे पाठिंबा दिला असून, राष्ट्रप्रायोजित दहशतवादाचा प्रश्न आणि त्याचा प्रादेशिक शांतता व सुरक्षेवर होणारा परिणाम वारंवार अधोरेखित केला आहे. याउलट, पाकिस्तानने अफगाणिस्तान, भारत आणि इराण यांसारख्या शेजारी देशांविरुद्ध परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून राष्ट्रप्रायोजित दहशतवादाचा वापर केला आहे आणि अनेकदा दहशतवाद्यांना ‘चांगले’ आणि ‘वाईट’ अशा श्रेणींमध्ये विभागण्याचा प्रयत्न केला आहे. वाढते मतभेद, चीनचा वाढता प्रभाव आणि पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाला दिला जाणारा गुप्त पाठिंबा यामुळे, नवी दिल्लीने SCO ला सर्वसमावेशक आणि कोणत्याही एकाच देशाच्या वर्चस्वाविना चालणारी संघटना बनवण्याचा प्रयत्न करूनही, हा भाग दहशतवाद आणि हिंसाचारासाठी अधिक असुरक्षित बनला आहे. भारताने सदस्य देशांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, सध्या SCO च्या दहशतवादविरोधी डेटाबेससाठी केवळ रशियन आणि मँडरीन या भाषांचा वापर होत असल्याने, भारताने इंग्रजीला प्राथमिक भाषा म्हणून वापरण्याची जोरदार मागणी केली आहे.

    मतभेद आणि दहशतवाद

    विशिष्ट SCO देशांद्वारे राष्ट्रप्रायोजित दहशतवादाला दिल्या जाणाऱ्या गुप्त पाठिंब्यामुळे आणि वाढत्या मतभेदांमुळे हा संपूर्ण भाग वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचा आणि भू-राजकीय संघर्षांचा केंद्रबिंदू बनत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) या दहशतवादी संघटनेने SCO प्रदेशात आपला प्रभाव वाढवला आहे. त्यांनी विविध भरती पद्धती वापरून हल्ले केले असून, त्यांची अंदाजे लढाऊ ताकद सुमारे 1500 ते 4000 लढवय्यांची आहे. जानेवारी 2024 मध्ये ISKP च्या आत्मघातकी हल्ल्यात 92 जण ठार झाले आणि 102 जण जखमी झाले. याचप्रमाणे, मार्च 2024 मध्ये रशियात मागील अनेक दशकांतील एक भीषण दहशतवादी हल्ला झाला, जेव्हा बंदूकधाऱ्यांनी मॉस्कोच्या क्रोकस सिटी हॉलवर हल्ला केला आणि त्यात 115 हून अधिक जण ठार झाले व 187 पेक्षा जास्त लोक जखमी झाले.

    ISKP व्यतिरिक्त, पाकिस्तानप्रायोजित इतर दहशतवादी गटांनीही इराण आणि भारतावर अनेक हल्ले केले आहेत. जैश अल-अदल या पाकिस्तानच्या पाठबळावर चालणाऱ्या दहशतवादी संघटनेने गेल्या दशकभरात इराणमध्ये विविध दहशतवादी कारवाया केल्या आहेत. डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील रास्क शहरात पोलिस ठाण्यावर हल्ला करून 11 सुरक्षारक्षकांची हत्या केली. त्याचप्रमाणे, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या लष्कर-ए-तोयबाशी संबंधित प्रॉक्सी गटाने केलेल्या घृणास्पद दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

    अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) या दहशतवादी संघटनेने SCO प्रदेशात आपला प्रभाव वाढवला आहे.

    बीजिंगकडून पाकिस्तानच्या राष्ट्रप्रायोजित दहशतवादाला मिळणारा वाढता गुप्त पाठिंबा यामुळे केवळ SCO क्षेत्र अधिक दहशतवादी कारवायांसाठी असुरक्षित बनले नाही, तर यामुळे शेजारी देशांमध्ये दहशतवाद्यांविरोधात पूर्वसंधीवर आधारित कारवाया व छापे टाकण्यासही देश भाग पाडले गेले. परिणामी, हा संपूर्ण भाग अधिक संघर्षग्रस्त झाला आहे. रास्क येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने पाकिस्तानातील जैश अल-अदलच्या तळांवर आणि प्रक्षेपणस्थळांवर लक्ष्य करत हवाई हल्ले केले. त्याचवेळी, पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्यात पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये खोलवर दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई पाकिस्तानकडून युद्धविरामाची याचना झाल्यानंतरच थांबवण्यात आली.

    निष्कर्ष

    SCO ची अधिकृत भूमिका प्रादेशिक शांतता व दहशतवादविरोधी सुरक्षा सुनिश्चित करण्याची आहे. मात्र, चीनचा वाढता प्रभाव आणि रशियाची कमी होणारी भूमिका यामुळे ही संघटना आता बीजिंगच्या धोरणात्मक हितसंबंधांना पूरक ठरणारे एक साधन बनली आहे. या बदलामुळे भारताला लक्ष्य करणाऱ्या काही दहशतवादी संघटनांना गुप्त पाठिंबा मिळाल्याचेही दिसून आले आहे. SCO चे हे पालटलेले स्वरूप सदस्य देशांतील मतभेद उजेडात आणत असून, त्यामुळे संघटनेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. SCO च्या सनदेमध्ये नमूद केलेल्या दहशतवादविरोधी उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस अंमलबजावणी यंत्रणा व प्रभावी उपाययोजना यांचा अभाव आहे. या गटामधील प्रभुत्वासाठी चाललेली अंतर्गत चढाओढ ही संघटनेला दहशतवादमुक्त, सुरक्षित आणि शांततामय क्षेत्र बनवण्यास अयशस्वी ठरवत आहे.


    अझाज वानी (PhD) हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राममधील फेलो आहेत.

    ईरा कुलकर्णी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राममध्ये रिसर्च इंटर्न आहेत.     

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.