Expert Speak Raisina Debates
Published on Jul 18, 2025 Updated 0 Hours ago

जसजसे चीन आफ्रिकेमध्ये आपली थिंक टँक डिप्लोमसी अधिक बळकट करत आहे, तसतसे त्यांच्या एकतर्फी संवादावर, सौम्य शक्तीच्या प्रभावावर आणि चिनी मूल्ये व आदर्शांच्या बिनधास्त प्रचारावर चिंता व्यक्त केली जात आहे.

चीनची आफ्रिकेतील थिंक टॅंक डिप्लोमसी

Image Source: Per-Anders Pettersson/ via Getty Images

    चायना क्रॉनिकल्स या लेख मालिकेतील हा 177 वा लेख आहे. 


    जसे चीन स्वतःला ग्लोबल साउथचा प्रमुख म्हणून मांडत आहे, विशेषतः वाढत्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेत, तसे त्याला हे उमजले आहे की केवळ लष्करी ताकद आणि आर्थिक डिप्लोमसी पुरेशी नाही. लोकांची मने जिंकण्यासाठी रणनीतीपूर्वक डिप्लोमसी आणि सॉफ्ट पॉवर यांचा समन्वय आवश्यक आहे. जागतिक पातळीवर आपल्याच बाजूने विचारप्रवाह घडवून आणण्यासाठी आणि आपला प्रभाव वाढवण्यासाठी बीजिंगने आपल्या थिंक टँक डिप्लोमसीला वेग दिला आहे. यामध्ये ‘चिनी वैशिष्ट्यांसह नवे 'थिंक टँक्स’ स्थापन करणे व त्यांना प्रोत्साहन देणे याचा समावेश असून, ग्लोबल साउथमधील आफ्रिकेला यामध्ये विशेष महत्त्व दिले जात आहे.
    थिंक टँक डिप्लोमसी म्हणजे चीनने आपल्या संशोधन संस्थांचा आणि धोरण मंचांचा परराष्ट्र संबंधांमध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी केलेला धोरणात्मक वापर. 2022 मध्ये, चिनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘शिस्तशीर, शैक्षणिक आणि संवाद प्रणाली’ जी चिनी संस्कृती व परंपरांवर आधारित असेल अशी विकसित करण्याची गरज ठामपणे मांडली. या उपक्रमाचा उद्देश केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची प्रतिमा खुलवणे एवढाच मर्यादित नाही. यामागे व्यापक हेतू असा आहे की चीनच्या जागतिक दृष्टीकोनाला, शासकीय मॉडेलला आणि विकासाच्या संकल्पनांना पाश्चात्य उदारमतवादी मूल्यव्यवस्थेचा पर्याय म्हणून विश्वसनीय आणि आकर्षक स्वरूपात सादर करता यावे.

    चायना-अफ्रिका थिंक टँक फोरम: एक धोरणात्मक उपक्रम

    चीनने अधिकृतपणे ऑक्टोबर 2011 मध्ये चायना-अफ्रिका थिंक टँक फोरम (CATTF) सुरू केला, ज्यामध्ये 27 आफ्रिकन देशांमधील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. CATTF हा चिनी आणि आफ्रिकन थिंक टँक्समधील संवाद आणि देवाणघेवाणीसाठी एक कायमस्वरूपी मंच म्हणून कार्य करतो. या मंचाचे उद्दिष्ट सैद्धांतिक दृष्टिकोनातून परस्पर समज वाढवणे, नागरी सहभागाला प्रोत्साहन देणे, मुक्त संवादाला चालना देणे आणि चीन-अफ्रिका सहकार्य अधिक परिणामकारक होण्यासाठी धोरणात्मक शिफारसी निर्माण करणे हे आहे. शांती आणि सुरक्षा, वित्त व गुंतवणूक, तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून CATTF शैक्षणिक सहकार्य वाढवण्याचा, शाश्वत विकासाला समर्थन देण्याचा आणि चीन-अफ्रिका दीर्घकालीन भागीदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करतो.
    2013 मध्ये सत्तेवर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या या उपक्रमांचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यावर भर दिला आहे. CATTF व्यतिरिक्त चीनने आणखी अनेक थिंक टँक नेटवर्क्सच्या स्थापना केल्या आहेत. जसे की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) आणि ग्लोबल कम्युनिटी ऑफ शेअर्ड फ्युचर. हे नेटवर्क्स मुख्यतः चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न संस्थांमार्फत चालवले जातात, जसे की चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस (CASS), पीपल्स डेली, CGTN, आणि शिन्हुआ न्यूज एजन्सी, तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय भागीदार.

    'कुनमिंग संमेलन' आणि 'चीनी आधुनिकीकरणा'चा प्रचार

    या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर, 20 मे 2025 रोजी चीनच्या कुनमिंग शहरात 14 वा चायना-अफ्रिका थिंक टँक फोरम आयोजित करण्यात आला. या फोरममध्ये चीन व आफ्रिकेतील 100 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यंदाचे मुख्य सूत्र होते: ‘चायना-अफ्रिका शासकीय अनुभव आणि देवाणघेवाण व चीनी आधुनिकीकरण’.
    या फोरममध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी ‘कुनमिंग संमेलन’ (Kunming Consensus)ला पाठिंबा दिला. त्यांनी शासन आणि विकासाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे, तसेच चीनी आधुनिकीकरण आणि आफ्रिकेच्या स्वायत्त विकास धोरणांमधील समन्वय मजबूत करण्याचे ठरवले. फोरमनंतर प्रतिनिधींनी युनान प्रांतात तीन दिवसांची क्षेत्रभेट घेतली. यात त्यांनी चीनमधील ग्रामीण पुनरुत्थान, पर्यावरणीय शाश्वतता, नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशन आधारित विकास आणि समुदाय-आधारित प्रशासन यांसारख्या बहुआयामी आधुनिकीकरण प्रयत्नांचा अनुभव घेतला.
    14 वा CATTF हा 2024 च्या फोरम ऑन चायना-अफ्रिका कोऑपरेशन (FOCAC) चा थेट पुढील टप्पा होता. FOCAC हे आफ्रिकेसाठी चीनचे सर्वात महत्त्वाचे बहुपक्षीय व्यासपीठ मानले जाते. 2024 मधील बीजिंग FOCAC शिखर परिषदेमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चायना-अफ्रिका भागीदारीसाठी सहा मूलभूत स्तंभ सादर केले होते आणि 'ऑल वेदर चायना-अफ्रिका कम्युनिटी’ च्या सामायिक भविष्यासाठी एक व्यापक आराखडा मांडला होता.
    चीनने शी जिनपिंग यांच्या तीन प्रमुख जागतिक उपक्रमांच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले आहे – ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (GDI), ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह (GSI), आणि ग्लोबल सिव्हिलायझेशन इनिशिएटिव्ह (GCI).
    चीन आफ्रिकेकडून संयुक्त राष्ट्रसंघ (UN) आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर राजनैतिक पाठिंबा अपेक्षित ठेवतो. यासाठी, चीनने शी जिनपिंग यांच्या तीन प्रमुख जागतिक उपक्रमांच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले आहे – ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (GDI), ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह (GSI), आणि ग्लोबल सिव्हिलायझेशन इनिशिएटिव्ह (GCI). ही तीन धोरणे मिळून चीनच्या जागतिक मूल्यप्रणाली आणि शासकीय मॉडेलचा पर्यायी दृष्टिकोन मांडतात.

    एकतर्फी विचारांचा प्रसार: आफ्रिकेत चीनची थिंक टँक डिप्लोमसी 

    माध्यमे, थिंक टँक संस्था, शिक्षण क्षेत्र आणि व्यवसाय जगताशी सहभाग हा चीनच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. एकमेकांशी केलेल्या लोकसंवादाच्या माध्यमातून चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली उपस्थिती वाढवतो, जागतिक जनमतात आपली प्रतिमा सुधारतो आणि बहुपक्षीयता व मुक्त व्यापारासाठी स्वतःला समर्थक म्हणून सादर करतो.
    जरी चीनची थिंक टँक डिप्लोमसी आफ्रिकन देशांना पर्यायी विकास मॉडेल्स आणि संशोधन सहकार्य देत असली, तरी ती काही गंभीर प्रश्न निर्माण करते. प्रत्येक देशाचा विकास त्याच्या इतिहास व सामाजिक-आर्थिक परिस्थितीनुसार ठरायला हवा. मात्र, आफ्रिकेच्या विकासासाठी ‘चीनी उपाय’ हे मार्गदर्शक मॉडेल म्हणून पुढे रेटणे अनेकदा व्यवहार्यतेबाबत शंका निर्माण करते. जरी परस्परांपासून शिकण्याचा विचार मांडला जातो, तरी बहुतेक मंच चीन सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. त्यामुळे मुक्त चर्चा किंवा चीनच्या विकास मॉडेलचे स्वतंत्र मूल्यमापन करायला फारसा वाव राहत नाही. अशा एकतर्फी विचारांच्या देवाणघेवाणीतून खरा बौद्धिक संवाद मर्यादित होतो आणि नव्या धोरण कल्पनांना अडथळा निर्माण होतो. म्हणूनच, मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आणि गुंतवणूक करूनही हे मंच अनेकदा मुक्त संवाद किंवा स्वतंत्र देवाणघेवाण घडवून आणण्यात अपयशी ठरतात. त्याऐवजी, हे मंच बहुतांश वेळा चिनी संस्कृतीचे आदर्श रूप मांडतात आणि विशेषतः एकपक्षीय शासकीय मॉडेलला व्यवहार्य विकासपर्याय म्हणून पुढे नेतात, हे त्या जाहीरनाम्यात स्पष्ट दिसते.
    त्यामुळे आफ्रिकेसमोरील मुख्य आव्हान म्हणजे चीनशी संबंध तोडणे नव्हे, तर या सतत बदलणाऱ्या परिस्थितीकडे चातुर्य आणि दूरदृष्टीने पाहणे. आफ्रिकेचा शाश्वत विकास कोणत्याही पाश्चात्य किंवा चीनी बाह्य मॉडेलच्या संपूर्ण स्वीकृतीतून होणार नाही, तर तो आफ्रिकेच्या विविध ऐतिहासिक अनुभवांवर, सांस्कृतिक संदर्भांवर आणि सामूहिक आकांक्षांवर आधारित स्वतःच्या उपायांमधूनच निर्माण होईल.
    समीर भट्टाचार्य हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे असोसिएट फेलो आहेत.
    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.