चीनचे सैन्य आता दीर्घकाळ तयारी करण्याऐवजी आदेश मिळताच तात्काळ हल्ला करण्याची क्षमता विकसित करत आहे. 'कोल्ड स्टार्ट' सारखी ही लष्करी विचारसरणी आता तैवानच्या पलीकडे जाऊन भारताला लागून असलेल्या सीमांवरही लागू होताना दिसत आहे, जे एका नव्या चिंतेचे संकेत आहेत.
चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) हळूहळू एका नव्या “कोल्ड स्टार्ट”-सदृश लष्करी कार्यकारी भूमिकेकडे वाटचाल करत आहे. या भूमिकेअंतर्गत शत्रूला हालचाल करण्याची किंवा हस्तक्षेप करण्याची संधी मिळण्यापूर्वीच जलद आणि उच्च तीव्रतेच्या आक्रमक कारवाया करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. हा बदल PLA च्या व्यापक सैन्य-संचलन सुधारणा प्रक्रियेचा भाग आहे, ज्याची सुरुवात चीनने 2017-18 मध्ये केली होती. मात्र 2022 पर्यंत PLA ने प्रत्यक्षात कोल्ड स्टार्ट कार्यकारी भूमिकेच्या दिशेने हालचाल सुरू केली नव्हती. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या (हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटीव) माजी अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीने चिनी सशस्त्र दलांना तैवानच्या भोवती झालेल्या लष्करी सराव आणि कवायतींमधून या सुधारणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे निमित्त मिळाले.
चिनी सशस्त्र दलांनी हे बदल तुलनेने मर्यादित प्रमाणात तिबेट आणि झिनजियांग लष्करी जिल्ह्यांमध्येही अंमलात आणले आहेत. मात्र इतर उपक्रमांप्रमाणे हे बदल प्रथम ईस्टर्न (पूर्व) थिएटर कमांड (ETC) मध्ये राबवले गेले नाहीत; ETC ला सामान्यतः लष्करी सुधारणांची चाचणी करण्याची भूमी मानले जाते. त्याऐवजी PLA ने तिबेट, झिनजियांग आणि संभाव्यतः संपूर्ण वेस्टर्न (पश्चिम) थिएटर कमांड (WTC) मध्ये कोल्ड स्टार्टसदृश कार्यकारी भूमिका अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात आणली आहे. हे सर्व क्षेत्र एकत्रितपणे भारताशी संबंधित संभाव्य परिस्थितींना तोंड देण्याची जबाबदारी सांभाळतात.
या भूमिकेअंतर्गत शत्रूला हालचाल करण्याची किंवा हस्तक्षेप करण्याची संधी मिळण्यापूर्वीच जलद आणि उच्च तीव्रतेच्या आक्रमक कारवाया करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
PLA च्या कार्यकारी चर्चेत “कोल्ड स्टार्ट” ही संकल्पना शांततेतील नियमित स्थितीतून कोणतीही पूर्वसूचना न देता झपाट्याने लढाऊ सज्जतेकडे वळण्याच्या क्षमतेस संदर्भित करते. आश्चर्याचा घटक कायम ठेवत आक्रमण करणे, हा अशा भूमिकेचा सर्वात महत्त्वाचा निकष मानला जातो. चिनी लष्करी लेखनात युनिट्सना “आदेश मिळताच तात्काळ हालचाल करण्याची” क्षमता (वेन लिंग जी डाँग) सर्वोच्च महत्त्वाची मानली जाते. ही संकल्पना PLA च्या महत्त्वाच्या संदर्भग्रंथांमध्येही आढळते, जसे की सायन्स ऑफ मिलिटरी स्ट्रॅटेजी. उदाहरणार्थ, 2020 मधील ताज्या आवृत्तीत 24-48 तासांची “गोल्डन विंडो” (जिन्से चांगकोऊ) अधोरेखित करण्यात आली आहे, ज्यामध्ये युद्धक्षेत्र मुख्यालयाने सैन्यनिर्मिती पूर्ण करून पुढाकार हस्तगत करणे अपेक्षित असते.
मात्र ही कल्पना केवळ लष्करी ग्रंथांपुरती मर्यादित नाही. चीनचे सर्वोच्च नागरी आणि लष्करी नेतृत्व सातत्याने “स्टार्ट फास्ट, एंड फास्ट” म्हणजेच जलद सुरवात करा आणि जलद संपवा (xunji kaizhan, sujue zhisheng) या विचारावर भर देत आले आहे. या विचारधारेत सततची सज्जता, जलद आणि एकात्मिक संयुक्त कारवाया, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाह्य शक्ती हस्तक्षेप करण्यापूर्वीच उद्दिष्ट साध्य करणे यावर भर दिला जातो.
चिनी कम्युनिस्ट पक्षाचे (CCP) जनरल सेक्रेटरी शी जिनपिंग यांनी 11 एप्रिल 2023 रोजी झानजियांग येथे साउदर्न थिएटर नेव्हीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या गोपनीय भाषणात नव्या युनिट्स आणि क्षमतांची जलद तैनाती करण्याचे आदेश दिले. यामुळे 2012 पासून ते सातत्याने देत असलेला संदेश अधिक ठळक झाला आहे, म्हणजेच “युद्धासाठी नेहमी सज्ज रहा” (suishi zhunbei). PLA मधील इतर अनेक वरिष्ठ आवाजांनीही या विचाराला दुजोरा दिला आहे. यात CMC चे उपाध्यक्ष, माजी ETC कमांडर, PLA आर्मी कमांडर, तसेच तिबेट लष्करी जिल्ह्यासह विविध थिएटर्समधील बटालियन कमांडर्स यांचा समावेश होतो.
लष्करी पुस्तके आणि नेतृत्वाच्या निर्देशांव्यतिरिक्त, अलीकडील PLA सुधारणा, विशेषतः 2022 च्या उत्तरार्धानंतर, चिनी लष्करी नेतृत्वात संचलनावर (मोबिलायझेशन) मोठा भर देताना दिसतात. CMC ने कोल्ड स्टार्ट साध्य करण्यासाठी तीन पातळ्यांवर सुधारणा केल्या आहेत: संस्थात्मक रचना बदलणे, शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम वाढवणे आणि त्यात सुधारणा करणे, तसेच प्रशिक्षण सराव आणि मर्यादित प्रत्यक्ष परिस्थितींमध्ये अंमलबजावणीचा सराव करणे.
चिनी लष्करी लेखनात युनिट्सना “आदेश मिळताच तात्काळ हालचाल करण्याची” क्षमता (वेन लिंग जी डाँग) सर्वोच्च महत्त्वाची मानली जाते.
प्रथम, चिनी नेतृत्वाने संस्थात्मक सुधारणांवर भर दिला आहे. यामध्ये संपूर्ण चीनभर, तिबेट आणि झिनजियांगसारख्या अतिदुर्गम प्रदेशांमध्येही नॅशनल डिफेन्स मोबिलायझेशन ऑफिसेस (NDMOs) स्थापन करण्याचा समावेश आहे. या सुधारणांचा उद्देश PLA ला प्रशासकीय जबाबदाऱ्यांपासून मुक्त करणे हा होता, कारण या नागरी संचलन कार्यालयांनी प्रमुख प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. यासोबतच, निर्णय घेण्यापासून प्रत्यक्ष कृतीपर्यंतचा कालावधी कमी करण्यासाठी PLA ने कमांड संरचना सुलभ करण्यावरही काम केले आहे. यामुळे प्रादेशिक कमांडर्सना पारंपरिक पद्धतीतील तासांऐवजी काही मिनिटांत निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची क्षमता मिळाली आहे.
दुसरे म्हणजे, शी जिनपिंग यांच्या लष्करी सुधारणांमध्ये सातत्याने मनुष्यबळ प्रशिक्षण आणि शिक्षणावर भर देण्यात आला आहे. 2022 च्या मध्यापासून बीजिंगने PLA कर्मचाऱ्यांना संचलन-केंद्रित विचारसरणीने प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. 2023–24 दरम्यान राबवण्यात आलेल्या “शी जिनपिंग यांचे विचार” या संपूर्ण दलव्यापी शिक्षण मोहिमेत बटालियन कमांडर्सना वैचारिक वर्गांबरोबरच संचलनावर आधारित टेबलटॉप ड्रिल्स घेणे बंधनकारक करण्यात आले. याशिवाय, व्यावसायिक लष्करी शिक्षण व्यवस्थेअंतर्गत, अत्यंत खालच्या म्हणजे बटालियन पातळीपर्यंत कर्मचाऱ्यांना युद्धसज्जतेचे प्रशिक्षण देण्यात येत असून, त्यात आश्चर्याचा घटक जपण्यावर विशेष भर दिला जात आहे.
शेवटी, प्रत्यक्ष मैदानावर 2022 पासून PLA तिबेट, झिनजियांग आणि तैवान परिसरात अत्यल्प पूर्वसूचनेवर लष्करी सराव करत आहे. उदाहरणार्थ, गेल्या 4 वर्षांत तैवान सामुद्रधुनीत अत्यंत संवेदनशील भागांमध्ये अनेक सराव झाले आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर PLA ने तैवानभोवती सात थेट गोळीबार निषिद्ध क्षेत्रे जाहीर केली, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आणि अण्वस्त्र पाणबुडी, विमानवाहू नौका तसेच इतर पृष्ठभागीय जहाजांची तैनाती केली. 1995–96 च्या संकटानंतर प्रथमच तैवानला असा पूर्ण वेढा घालण्यात आला. यानंतर जलद गतीने होणाऱ्या नव्या लष्करी सरावांची मालिका सुरू झाली, ज्यामुळे कोल्ड स्टार्ट भूमिकेकडे PLA ने लक्षणीय प्रगती केली.
त्याचप्रमाणे, एप्रिल 2023 मध्ये तैवानभोवती झालेल्या जॉइंट स्वॉर्ड म्हणजेच संयुक्त लष्करी सरावादरम्यान PLA ने त्याच सकाळी सराव जाहीर करून तात्काळ अंमलात आणले. या सरावात PLA रॉकेट फोर्स, नेव्ही आणि एअर फोर्स सहभागी झाले होते. पुढे, मे 2024 मधील जॉइंट स्वॉर्ड-2024A सरावाने PLA चा ऑपरेशनल आराखडा अधिक विस्तृत केला. या सरावांत राजकीय संकेत मिळताच स्टँडबाय अवस्थेतून पूर्ण नाकाबंदीच्या रिहर्सलपर्यंत एकात्मिक, बहुआयामी कारवाया करण्याची PLA ची क्षमता दिसून आली.
अखेर, ऑक्टोबर 2024 मधील जॉइंटस्वॉर्ड-2024B सरावाने कालमर्यादा आणखी संकुचित केली. बीजिंगचे पहिले अधिकृत निवेदन सकाळी 05:01 am ला जारी झाले आणि काही तासांतच लिओनिंग (Liaoning) विमानवाहू (कॅरिअर) गट तैवानच्या पूर्वेला कार्यरत झाला. त्याच वेळी ETC ने समुद्र-हवाई सज्जता गस्त, बंदर नाकाबंदी, क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सराव आणि विक्रमी 153 PLAAF मोहिमा पार पाडल्या. याचप्रमाणे, एप्रिल 2025 मधील अलीकडील स्ट्रेट थंडर-2025A सरावातही 48 तासांच्या आत बहुदिशात्मक नाकाबंदी आणि अचूक हल्ल्यांसाठी सशस्त्र दलांचे जलद संचलन करण्याची PLA ची क्षमता स्पष्टपणे दिसून आली.
या सरावांत राजकीय संकेत मिळताच स्टँडबाय अवस्थेतून पूर्ण नाकाबंदीच्या रिहर्सलपर्यंत एकात्मिक, बहुआयामी कारवाया करण्याची PLA ची क्षमता दिसून आली.
साधारणपणे PLA साठी पूर्वेकडील क्षेत्र ही प्रयोगशाळा मानली जाते. 1993 पासून तैवानशी संबंधित परिस्थिती ही PLA ची प्राथमिक धोरणात्मक दिशा असल्याने, हे थिएटर कमांड इतरांमध्ये पहिले मानले जाते. लष्करी आधुनिकीकरणाचा सर्वाधिक लाभ याच क्षेत्राला मिळतो, कारण बहुतांश महत्त्वाचे धोरणात्मक बदल आणि सुधारणा सर्वप्रथम येथेच चाचणीसाठी राबवल्या जातात. याच्या उलट, झिनजियांग आणि तिबेट हे कोणत्याही प्रकारच्या सुधारणा, उन्नती किंवा आधुनिकीकरणाचे शेवटचे लाभार्थी मानले जातात. मात्र, आश्चर्यकारकरित्या, भारताकडे तोंड करून असलेले हे दोन लष्करी जिल्हे (मिलिटरी डिस्ट्रिक्टस-MDs) आणि संपूर्ण वेस्टर्न थिएटर कमांड (WTC) हे विकसित होत असलेल्या कोल्ड स्टार्ट कार्यकारी लष्करी भूमिकेचे सर्वात मोठे लाभार्थी ठरत आहेत.
उदाहरणार्थ, सप्टेंबर 2021मध्ये पश्चिमेकडील भागात एका वाहतूक आणि वितरण केंद्राने 1,000 किलोमीटर सीमावर्ती क्षेत्रात एका दिवसात अत्यावश्यक उपकरणे आणि सेवा पोहोचवण्यासाठी 23 लष्करी-नागरी हवाई मार्ग सुरू केले. त्यानंतर मार्च 2022 मध्ये 77व्या ग्रुप आर्मी च्या एका युनिटने चेंगदू ते शिगात्से हा प्रवास विक्रमी वेळेत पूर्ण केला. अखेरीस 2025 मध्ये दोन घटना विशेष लक्षवेधी ठरल्या: जानेवारी महिन्यात दक्षिण झिनजियांगमध्ये भारतीय सीमेजवळ झालेल्या PLA च्या वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमात जलद तैनातीवर दिलेला ठळक भर, आणि जुलै 2025 मध्ये झिनजियांग लष्करी जिल्ह्यांतर्गत रेजिमेंट पातळीवरील थेट गोळीबार सरावात जलद तैनातीची प्रत्यक्ष अंमलबजावणी.
ही उदाहरणे गेल्या काही वर्षांत या प्रदेशांमध्ये सातत्याने घडत असलेल्या घटनांपैकी केवळ काही निवडक प्रसंग आहेत. एकत्रितपणे पाहता, ती कालमर्यादा सतत संकुचित होत जाणे, वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, आणि आठवड्यांच्या तयारीऐवजी अल्पसूचनेवर हिमालयीन सीमेवर जोरदार आघात करण्याची क्षमता विकसित होत असल्याचे स्पष्ट संकेत देतात.
एकूणच, नेतृत्वाचे निर्देश, संस्थात्मक सुधारणा आणि लष्करी सराव हे सर्व मिळून जलद, एकात्मिक आणि बहुआयामी संयुक्त कारवायांकडे स्पष्ट कल दर्शवतात. थोडक्यात सांगायचे तर, बाह्य शक्ती हस्तक्षेप करण्यापूर्वीच जलद संचलन करून कार्यकारी उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने चिनी सशस्त्र दलांचे प्रयत्न या बदलांमधून स्पष्टपणे दिसून येतात.
सुयश देसाई हे चीनच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांचा अभ्यास करणारे रिसर्च स्कॉलर आहेत.
हा लेख 24 नोव्हेंबर 2025 रोजी CSIS चायना पॉवर वर प्रकाशित झालेल्या दीर्घ लेखावर आधारित आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Suyash Desai is a research scholar studying China’s defence and foreign policies. His research areas include Chinese security and foreign policy, Chinese military affairs, Chinese ...
Read More +