Expert Speak Raisina Debates
Published on May 30, 2025 Updated 0 Hours ago

ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले की पाकिस्तानपेक्षा भारताची गुप्तचर यंत्रणा सक्षम आहे. ही आघाडी टिकवण्यासाठी भारताने आता अधिक सखोल प्रादेशिक भागीदारी, प्रचारविरोधी डावपेच रणनीती आणि गुप्त कारवायांची गरज आहे.

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानला धूळ चारणारी भारताची गुप्तचर यंत्रणा

Image Source: Getty

    १२ मे २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला संबोधित केले. या भाषणात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, पाकिस्तानने दहशतवादाला पुन्हा एकदा प्रायोजित केल्यास ते भारताविरुद्ध युद्ध घोषित केल्यासारखे मानले जाईल. पंतप्रधानांनी फक्त ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय जनतेने दाखवलेली एकजूट आणि चिकाटी यांचे कौतुक केले नाही, तर पहलगाम येथे पाकिस्तानच्या मदतीने झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने केलेल्या नियोजित कारवाईचेही समर्थन केले. यासोबतच त्यांनी देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी बजावलेल्या भूमिकेचेही खुलेपणाने कौतुक केले.

    सध्या परिस्थिती स्थिर होत असताना, भारताच्या गुप्तचर सेवांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधिकाधिक स्पष्ट होत आहे. या यशस्वी कारवायांमुळे भारताला पाकिस्तानवर धोरणात्मक आघाडी मिळाली असून, देशाच्या सुरक्षायंत्रणांना पाकिस्तानवर दीर्घकालीन दबाव ठेवण्याचा आणि अलीकडील यशांच्या आधारावर अधिक मजबूत पाऊल उचलण्याचा मार्ग मिळाला आहे.

    आकाशतीर आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांचे यश

    ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताच्या आकाशतीर हवाई संरक्षण प्रणालीने मिळवलेले यश हे भारताच्या तांत्रिक गुप्तचर क्षमतेतील (TECHINT) वाढती प्रगती दर्शवणारे ठोस उदाहरण आहे. भारताच्या कॅर्टोसॅट उपग्रहांच्या नेटवर्ककडून प्रत्यक्ष वेळेत (रिअल टाइम) मिळालेल्या माहितीनुसार, आकाशतीर प्रणालींनी पाकिस्तानकडून आलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या लाटांवर—ज्यांचे लक्ष्य सीमेलगत व आंतर्गत भागातील नागरी पायाभूत सुविधा होते—कार्यक्षमतेने उत्तर दिले आणि जवळपास परिपूर्ण यशाची नोंद केली. हे यश केवळ भारताच्या वाढत्या तांत्रिक क्षमतेचा पुरावा नाही, तर संघर्षाच्या परिस्थितीत आकाशतीर प्रणालीची अभियांत्रिकी आणि कार्यक्षमतेची कामगिरी हे दर्शवते की उच्चस्तरीय धोरणात्मक गुप्तचर (जसे की प्रत्यक्ष वेळेतील उपग्रह प्रतिमांचे संकलन व विश्लेषण) आणि तत्काळ लढाऊ प्रतिकार यांच्यात किती उत्कृष्ट समन्वय साधला गेला आहे. यामुळे अपेक्षेपेक्षा खूपच कमी नागरी हानी झाली आणि पाकिस्तानी लष्कराला कोणतेही यश मिळाल्याचा दावा करण्यास थोडेफारही आधार राहिलेले नाहीत.

    भारताची एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण गुप्तचर शक्ती म्हणून होत असलेली उभारणी अधोरेखित झाली. 1999 च्या कारगिल युद्धाच्या तुलनेत हा बदल लक्षणीय आहे. त्या काळात अमेरिकेने 'सिलेक्टिव्ह अव्हेलेबिलिटी' या धोरणाअंतर्गत भारताच्या नॉन मिलिट्री GPS रिसीव्हर्सची अचूकता कमी करून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.

    परंतु याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे, आकाशतीर हवाई संरक्षण प्रणालीच्या यशामुळे भारताची एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण गुप्तचर शक्ती म्हणून होत असलेली उभारणी अधोरेखित झाली. 1999 च्या कारगिल युद्धाच्या तुलनेत हा बदल लक्षणीय आहे. त्या काळात अमेरिकेने 'सिलेक्टिव्ह अव्हेलेबिलिटी' या धोरणाअंतर्गत भारताच्या नॉन मिलिट्री GPS रिसीव्हर्सची अचूकता कमी करून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण ऑपरेशन सिंदूरमध्ये आकाशतीर प्रणालीने देशातच विकसित करण्यात आलेल्या NAVIC या दिशानिर्देश प्रणालीचा वापर केला, ज्यामुळे अमेरिकेसारख्या बाह्य शक्तींना या संघर्षात प्रत्यक्ष भूमिकेसाठी कोणतीही संधी उरली नाही. १० मेच्या पहाटेपर्यंत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील PAF बेस नूर खान वर हल्ला केला — जो पाकिस्तानच्या न्युक्लिअर कमांड अथॉरिटी मुख्यालय, स्ट्रॅटेजिक प्लॅन्स डिव्हिजन पासून फार दूर नव्हता. या कारवाईमुळे ऑपरेशन सिंदूरच्या मुख्य उद्दिष्ट असलेल्या प्रतिरोधक शक्तीच्या सिद्धतेला यश मिळाले.

    काउंटरइंटेलिजन्स: अनोळखी वाटचाल

    ११ मे पासून, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांनी देशभरात अनेक व्यक्तींना अटक केली आहे, ज्यांच्यावर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) ला मदत करत असल्याच्या संशय होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या पार्श्वभूमीवरून पाकिस्तानच्या भारतातील बदलत्या गुप्तचर प्राधान्यक्रमांवर प्रकाश पडतो, तसेच भारताच्या काउंटरइंटेलिजन्स सेवांना या नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत, हेही स्पष्ट होते.

    सामाजिक माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्ती (इन्फ्लुएंसर) ज्योती मल्होत्रा हिच्या अटकेतून हे दिसून येते की ISI कडून "एजंट्स ऑफ इन्फ्लुएन्स" भरती करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले गेले आहे, ज्यामध्ये हे इन्फ्लुएंसर शांततेच्या काळात तसेच युद्धकाळातही चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरले जातात, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. अशा प्रकारचे प्रयत्न ISI च्या पारंपरिक धोरणाबरोबरच चालू राहण्याची शक्यता आहे – जसे की धोरणात्मक महत्त्वाच्या माहितीपर्यंत पोहोच असलेल्या मध्यम स्तरावरील व्यवस्थापकांची म्हणजेच व्यक्तींची ISI मध्ये भरती, तसेच देशातील संवेदनशील भागांतील कमी वेतनधारक नागरीकांची भरती. याआधीची काही उदाहरणे म्हणजे, ब्रह्मोस प्रकल्पातील माजी अभियंता निशांत अग्रवाल आणि मुजीब रहमान – जे ऑपरेशन सिंदूर दरम्यान INS विक्रांतच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळवण्यासाठी सरकारी अधिकारी असल्याचे भासवत होते व त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली.

    भारतीय अधिकाऱ्यांकडून संघर्षाच्या काळात ISI-संलग्न विचारसरणीला चालना देणाऱ्या चिनी व तुर्की राष्ट्र-नियंत्रित माध्यमांच्या सोशल मीडिया प्रोफाइल्सवर बंदी घालण्यात आली आहे.

    प्रारंभिक संकेत असे सूचित करतात की भारताच्या काउंटरइंटेलिजन्स सेवा या नव्या आव्हानांची जाणीव ठेवून त्यांचा सामना करण्यासाठी पावले उचलत आहेत. या प्रयत्नांना काही अंशी यशही मिळताना दिसत आहे — उदाहरणार्थ, गुजरातमधील एका १८ वर्षीय तरुणाला अलीकडे ‘सायबर दहशतवाद’ व पाकिस्तानी सायबरहल्ल्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, जेव्हा ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत सरकारच्या वेबसाइट्सवर हल्ले करण्यात आले होते. त्याचबरोबर, भारतीय अधिकाऱ्यांनी थर्ड पार्टी देशांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या खोट्या माहितीविरुद्धही कारवाई केली आहे, आणि याकडे अत्यंत गंभीर काउंटरइंटेलिजन्स मुद्दा म्हणून पाहिले जात आहे. संघर्षाच्या काळात ISI-संलग्न विचारसरणीला चालना देणाऱ्या चिनी व तुर्की राष्ट्र-नियंत्रित माध्यमांच्या सोशल मीडिया प्रोफाइल्सवर बंदी घालण्यात आली आहे.

    गुप्तचर सहकार्य: विस्तारासाठी संधी

    भारताने सध्या सुरू असलेल्या प्रत्यक्ष संघर्षाच्या स्थगितीचा फायदा घेऊन भागीदार देशांशी गुप्तचर सहकार्याच्या माध्यमातून अधिकाधिक धोरणात्मक लाभ मिळवणे तितकेच महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाण परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांच्याशी संवाद साधला – काबूलवर तालिबानने २०२१ मध्ये ताबा मिळवल्यानंतर दोघांमध्ये झालेला हा पहिलाच अधिकृत संवाद आहे. तसेच, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी इराणचे समकक्ष अली अकबर अहमदियन यांच्याशीही चर्चा केली आहे.या दोन्ही देशांना पाकिस्तान आणि त्याच्या अस्थिरता निर्माण करणाऱ्या भूमिकेबाबत सामायिक अविश्वास आहे – अफगाण तालिबान आणि पाकिस्तानमधील संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण आहेत, तर इराणला पाकिस्तानसोबत सीमावाद आणि हेरगिरीचा इतिहास आहे. या सामायिक चिंतेची परस्पर जाणीव विद्यमान गुप्तचर सहकार्याच्या चौकटीचा विस्तार करण्यास पूरक ठरू शकते, ज्यामुळे भारताला पाकिस्तानवर अधिक दबाव आणता येईल आणि त्याच्या दहशतवादाला धोरणात्मक साधन म्हणून वापरण्याच्या क्षमतेवर मर्यादा घालता येतील. तथापि, अफगाणिस्तान आणि इराण यांनी अलीकडच्या काळात चीनकडे झुकण्याची भूमिका घेतल्याने, चीनमार्फत पाकिस्तानला गुप्त माहिती मिळण्याचा धोका लक्षात घेऊन अशा कोणत्याही गुप्तचर सामायिकरण करारात अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

    खरेतर, ऑपरेशन सिंदूरने भारताला एक अल्पकालीन संधी उपलब्ध करून दिली आहे, जिचा उपयोग महत्त्वाच्या मित्रदेशांशी गुप्तचर सहकार्य भागीदार म्हणून आपला प्रभाव विस्तारण्यासाठी करता येऊ शकतो. ही एक अशी संधी आहे, जी त्वरित राजनैतिक किंवा आर्थिक फायद्यासाठी वापरता येऊ शकते. पाकिस्तानने वापरलेले चिनी PL-15E क्षेपणास्त्रांचे अवशेष आणि तुर्की ड्रोन यांचे अवशेष भारताला मिळाल्याने, भारताला चिनी व तुर्की शस्त्रप्रणालींची अंतर्गत रचना समजून घेण्याची संधी मिळाली आहे — ही माहिती भारत स्वतः वापरू शकतो किंवा जागतिक पातळीवरील इच्छुक भागीदारांसोबत वाटाघाटीसाठी वापरू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, फ्रान्स आणि फाइव्ह आयज् युतीमधील देश (ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यू झीलंड, युनायटेड किंगडम, आणि अमेरिका) यांना अशा गुप्त माहितीत रस असल्याचे आधीच दर्शवले आहे.

    आव्हाने आणि पुढील मार्ग

    तथापि, ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला रोखण्यात मिळवलेले यश टिकवून ठेवायचे असेल, तर गुप्तचर क्षेत्रात अजून बरीच कामे करणे आवश्यक आहे. प्रत्येक रणनीतीची विशिष्ट माहिती ही तिच्या संदर्भ आणि उद्दिष्टांनुसार वेगळी असेल, पण एक आक्रमक भूमिका — ज्यामध्ये मानवी व तांत्रिक स्रोतांद्वारे गुप्त माहिती गोळा करणे, तसेच दिशाभूल आणि प्रत्यक्ष कारवाया (कायनेटिक ऑपरेशन्स) यांचा समावेश असेल — हे पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध नुकतेच प्रस्थापित केलेले रोखण्याचे धोरण टिकवून ठेवण्यासाठी अधिक परिणामकारक ठरू शकते.

    प्रादेशिक भागीदारांसोबत गुप्तचर सहकार्य या रणनीतीला चालना देऊ शकते, पण अनेक प्रादेशिक सरकारांची अंतर्गत सुरक्षा कमजोर असल्यामुळे आणि तुर्की व चीनकडे त्यांचा वाढता झुकाव पाहता, गुप्तचर माहिती संकलनाच्या प्राधान्यक्रमांमध्ये स्वतंत्र कारवायांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.

    पाकिस्तानला भविष्यातील अविचारी कारवायांपासून रोखण्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणजे तुर्की आणि चीन यांच्यासोबत त्याचे दीर्घकालीन धोरणात्मक संधन अधिक स्पष्टपणे समजून घेणे — ज्यावर ऑपरेशन सिंदूरमुळे सार्वजनिक लक्ष अधिक तीव्रतेने केंद्रित झाले. त्यामुळे भारताने अशा गुप्तचर माहिती संकलन प्रयत्नांचा विस्तार करणे आवश्यक आहे, जे या तीन देशांच्या हितसंबंधांची एकत्रितता किंवा मतभेद कुठे आणि कसे आहेत, विशेषतः पाकिस्तानच्या दहशतवादाला दिल्या जाणाऱ्या पाठिंब्याच्या संदर्भात, हे स्पष्टपणे समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी तिसऱ्या देशांतील अशा भौगोलिक भागांमध्ये गुप्तचर माहिती संकलनासाठी अधिक संसाधने झोकून देणे आवश्यक ठरू शकते — जिथे इस्लामाबाद, बीजिंग आणि अंकारा यांचे हितसंबंध व हालचाली सर्वाधिक ठळकपणे एकत्र येतात. विशेषतः मध्य आशिया आणि कॉकस प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचे भाग ठरतात, कारण तुर्की आणि चीन या दोन्ही देशांनी या भागांमध्ये आपला आर्थिक व राजकीय प्रभाव वाढवला आहे आणि पाकिस्तानने अलीकडच्या काळात येथे भारतविरोधी दहशतवाद्यांची भरती व प्रशिक्षण दिले आहे. पाकिस्तानचे हितसंबंध आणि धोरणे त्याचे दोन सर्वात जवळचे धोरणात्मक भागीदार तुर्की आणि चीन यांच्या हितसंबंधांशी कुठे जुळतात किंवा वेगळे होतात हे ओळखल्यास, भारतीय धोरणकर्त्यांना पाकिस्तानच्या धोरणातील महत्त्वाच्या कमजोर मुद्द्यांची अधिक सखोल कल्पना मिळू शकते. याचा वापर उघड आणि गुप्त अशा विविध माध्यमांतून दीर्घकालीन रोखण्याची रणनीती मजबूत करण्यासाठी केला जाऊ शकतो, जी ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीपासूनच अपेक्षित होती. अगोदर नमूद केल्याप्रमाणे, प्रादेशिक भागीदारांसोबत गुप्तचर सहकार्य या रणनीतीला चालना देऊ शकते, पण अनेक प्रादेशिक सरकारांची अंतर्गत सुरक्षा कमजोर असल्यामुळे आणि तुर्की व चीनकडे त्यांचा वाढता झुकाव पाहता, गुप्तचर माहिती संकलनाच्या प्राधान्यक्रमांमध्ये स्वतंत्र (एकतर्फी) कारवायांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.

    पाकिस्तानी खोट्या माहितीमुळे निर्माण होणाऱ्या विघातक परिणामांचा विचार करता, आणि त्यास तुर्की व चिनप्रिय मीडिया संस्थांकडून मिळणाऱ्या बळकटीमुळे, काउंटर-OSINT (ओपन-सोर्स इंटेलिजन्सविरोधी) क्षमतांना प्राधान्य देणेही तितकेच शिफारसयोग्य आहे. जसे 26/11 हल्ल्यांनंतर दोन वर्षांनी NIA ची स्थापना करण्यात आली, जेणेकरून दहशतवादविरोधी कार्यवाहीसाठी आणि विविध सुरक्षा संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक विशेष संस्था उभारन्यात आली, तसेच खोट्या माहितीविरुद्ध लढण्यासाठी एक समर्पित काउंटर-OSINT संस्था उभारणे उपयुक्त ठरू शकते.

    या संदर्भात स्वीडनच्या सायकोलॉजिकल डिफेन्स एजन्सीकडून शिकण्यासारखे आहे, ज्याची स्थापना 2022 मध्ये रशियन व चिनी खोट्या माहितीच्या मोहिमांपासून संरक्षण करण्यासाठी करण्यात आली. भारतात अशीच एखादी संस्था स्थापन झाल्यास, ती नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) सारख्या प्रमुख गुप्तचर संस्थांसोबत जवळून काम करू शकेल. NTRO ही भारताची मुख्य सिग्नल इंटेलिजन्स संस्था असून, ऑपरेशन सिंदूरदरम्यान तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती. तसेच ही संस्था खासगी क्षेत्रातील उपक्रमांशीही सहकार्य करू शकते. उदाहरणार्थ, डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया (DSCI) ने स्थापन केलेली टास्क फोर्स, जिला पाकिस्तानकडून चालवण्यात आलेल्या डिजिटल हल्ल्यांच्या स्वरूपाचा अभ्यास करायचा व कोणत्या कमकुवत बाबींना लक्ष्य करण्यात आले हे शोधायचे काम दिले गेले आहे. अशा समन्वित प्रयत्नांद्वारे खोट्या माहितीविरोधातील भारताची लढाई अधिक परिणामकारक बनू शकते.

    तितकेच महत्त्वाचे म्हणजे, भारतीय गुप्तचर संस्थांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान मिळवलेले यश टिकवून ठेवण्यासाठी गोपनीय कारवाया म्हणजेच दिशाभूलविरोधी (counter-deception) आणि प्रत्यक्ष कारवाया (kinetic operations) यांचा सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरवून केलेले निर्मूलन केवळ अशा संघटनांच्या नेतृत्वाचा खात्मा करण्यासच उपयोगी ठरणार नाही, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी अपयशी ठरलेल्या देशाच्या दयेवर विसंबून राहण्याच्या व्यर्थतेचाही स्पष्ट संदेश देईल. पाकिस्तानकडून "एजंट्स ऑफ इन्फ्लुएन्स" भरती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दिशाभूल व हेरगिरीविरोधातील प्रयत्नांना उत्तर देण्यासाठी भारतीय काउंटरइंटेलिजन्स संस्थांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे — विशेषतः वरील काल्पनिक काउंटर-OSINT संस्थेशी समन्वय साधून, जर ही अस्तित्वात आली, तर अशा प्रयत्नांचा प्रभाव अधिक वाढवता येईल. अशा रणनीतीमुळे पाकिस्तानच्या धोरणात्मक मंडळांमध्ये संभ्रम व गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांची गुप्तचर कार्यासाठी भरती करून मिळणारे लाभ मोठ्या प्रमाणात मर्यादित होतील.

    भारताच्या गुप्तचर सेवांनी ऑपरेशन सिंदूरची अंतर्गत धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यात निःसंशयपणे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र हे यश कायम राहावे यासाठी, अलीकडे मिळालेल्या गतीवर आधारित प्रोॲक्टिव्ह (सक्रिय) रणनीतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. संयम, आत्मविश्वास, धोरणात्मक स्पष्टता आणि आवश्यक ती शंका (scepticism) यांचे संतुलित मिश्रण भारताला अलीकडच्या आठवड्यांत प्रस्थापित केलेले रोखण्याचे (deterrence) सामर्थ्य कायम ठेवण्यास निश्चितच मदत करू शकते.


    आर्चिष्मान गोस्वामी हे ऑक्सफोर्ड विद्यापीठातील एम.फिल. आंतरराष्ट्रीय संबंधातील (International Relations) पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.