दक्षिण आशियातील सर्वांत गरीब देश अशी ओळख असलेल्या बांगलादेशाने स्वातंत्र्याच्या केवळ पन्नास वर्षांहून थोड्या अधिक काळात आपली वाटचाल ‘आशियाचा वाघ’ (एशियन टायगर) या बिरुदावलीकडे केली आहे. सन १९७१ मधील मुक्तिसंग्राम आणि तत्पूर्वी १९७० मधील विनाशकारी चक्रीवादळ अशी अशांत सुरुवात झाली असली, तरी बांगलादेशाने आर्थिक विकासात विशेषतः तयार कपड्यांच्या क्षेत्रात आज लक्षणीय प्रगती केलेली दिसून येते. बांगलादेशात २००० च्या सुरुवातीसच आर्थिक परिवर्तनाला सुरुवात झाली. २०२० हे कोविडचे वर्ष वगळता २०११ पासून जीडीपीचा दर सातत्याने सहा टक्क्यांपेक्षा अधिक राहिला.
बांगलादेशाचे अर्थकारण नाट्यमयरीत्या आपल्या कृषिआधारित पायापासून बाजूला गेले आहे. १९७० च्या दशकाच्या प्रारंभी देशाच्या ‘जीडीपी’मध्ये शेतीचा वाटा ६० टक्के होता; परंतु हे प्रमाण घसरून आता १२ टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. जीडीपीतील उद्योगाचा वाटा ३३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर सेवा क्षेत्राचा वाटा ५५ टक्क्यांवर गेला आहे. यामध्ये व्यापाराचे उदारीकरण व औद्योगिक वाढ यांच्यामुळे झालेल्या व्यापक रचनात्मक परिवर्तनाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. आयातीची पद्धती कृषी क्षेत्राकडून कच्च्या मालाच्या उत्पादनाकडे वळली असली, तरी निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी बांगलादेश मोठ्या प्रमाणात तयार कपड्यांच्या उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे स्टील, रसायने आणि वाहतुकीची साधने यांसारख्या अधिक गुंतागुंतीच्या उत्पादन क्षेत्रांसारख्या वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये पाय न रोवल्याने देशाची भविष्यातील वाढ धोक्यात आली आहे.
आकृती १ : निर्यातीचा कल आणि एकूण निर्यातीतील तयार कपड्यांच्या उत्पादनाचा वाटा (१९८३-२०१८)
स्रोत : एस. रेहान आणि एस. एस. खान (२०२०), बांगलादेशातील रचनात्मक परिवर्तन, असमानतेचे चित्र आणि सर्वसमावेशक वाढ.
बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या तयार कपड्यांच्या उत्पादन क्षेत्राचा देशाच्या निर्यातीतून मिळालेल्या उत्पन्नात तब्बल ८४ टक्के वाटा आहे. या क्षेत्राची भरघोस वाढ झाली असून २०११ मधील १४.६ अब्ज डॉलरवरून २०१९ मध्ये निर्यातीतील वाढ सात टक्के वार्षिक वृद्धीदराने ३३.१ अब्ज डॉलरवर येऊन पोहोचली आहे. मात्र, तयार कपड्यांच्या उत्पादनाचे लक्ष्य कमी किंमतीच्या कपड्यांचे उत्पादन हे असल्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता आली, तर निर्यातीवरही संकट येते. हे कोव्हिड-१९ साथरोगामुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या अनागोंदीच्या वातावरणात ठळकपणे दिसून आले.
तयार कपड्यांच्या उत्पादनक्षेत्राची वाढ भरघोस असूनही या क्षेत्राला अनेक गंभीर आव्हानांशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे या क्षेत्राची दीर्घकालीन शाश्वतता धोक्यात आहे.
तयार कपड्यांच्या उत्पादनक्षेत्राची वाढ भरघोस असूनही या क्षेत्राला अनेक गंभीर आव्हानांशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे या क्षेत्राची दीर्घकालीन शाश्वतता धोक्यात आहे. उत्पादन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचा खर्च आणि पायाभूत सुविधांमधील कमतरता हे या उद्योगासमोरचे अडथळे आहेत. त्यातच व्हिएतनामसारख्या देशांकडून होणाऱ्या स्पर्धेची भर पडली आहे. त्याचप्रमाणे, कमी वेतनात उपलब्ध होणाऱ्या कामगारांवर अतीअवलंबित्व आणि निर्यातीसाठी पाश्चात्य देशांच्या बाजारपेठांवरील अवलंबित्व या घटकांमुळे निर्यातीत विविधता आणण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे.
आकृती २: बांगलादेश व व्हिएतनाममधून अमेरिका व युरोपात होणाऱ्या कपड्यांच्या आयातमूल्यात वाढ
स्रोत : युरोस्टाट; यूएसआयटीसी; मॅककिन्सी ॲनालिसिस
राजकीय अनागोंदीचे आंतरराष्ट्रीय पडसाद
अलीकडेच, न्यायालयाने पंतप्रधान शेख हसीना सरकारने २०१८ मध्ये घेतलेला आरक्षण पद्धत बंद करण्याचा निर्णय रद्द करून चालू वर्षीच्या जुलै महिन्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पद्धत पूर्वीप्रमाणेच पुन्हा सुरू करण्याचा निकाल दिल्याने बांगलादेशात आंदोलनाला सुरुवात झाली. या पद्धतीनुसार, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना व अन्य गटांना नोकऱ्यांमध्ये ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. या निकालामुळे गुणवत्तेवर आधारित संधींना मर्यादा येतील, असा दावा अनेक विद्यार्थ्यांनी केला. आधीच तरुणांमधील बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण आणि आर्थिक मंदी यांमुळे त्रस्त झालेल्या देशात या आंदोलनाने मूळ धरले आणि ते इतके वाढले, की पोलिस व सरकार समर्थकांविरोधात हिंसाचाराला सुरुवात झाली. या आंदोलनात अनेक बळी गेले आणि हसीना सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.
न्यायालयाने पंतप्रधान शेख हसीना सरकारने २०१८ मध्ये घेतलेला आरक्षण पद्धत बंद करण्याचा निर्णय रद्द करून चालू वर्षीच्या जुलै महिन्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पद्धत पूर्वीप्रमाणेच पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दिल्याने बांगलादेशात आंदोलनाला सुरुवात झाली.
बांगलादेशातील आंदोलनाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे, सरकारी नोकरीतील आरक्षण पद्धतीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शांततापूर्ण निषेधाचा अधिकार आपल्याकडे ठेवण्याचे आवाहन अमेरिकेने बांगलादेशाला केले. ही चिघळलेली परिस्थिती जानेवारी महिन्यात पुन्हा निवडून आलेल्या शेख हसीना सरकारसमोरील पहिले लक्षणीय आव्हान बनली. जानेवारी महिन्यात झालेली निवडणूक मुक्त वातावरणात झाली नव्हती आणि निःपक्षपातीही नव्हती, अशी टीका अमेरिकेकडून या आधीच करण्यात आली होती. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात गेल्या महिन्यात झालेल्या निदर्शनांमध्ये 200 पेक्षाही अधिक नागरिक मृत्युमुखी पडले होते. या नागरिकांना न्याय देण्याच्या मागणीसाठी ३ ऑगस्ट २०२४ रोजी आंदोलक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात आणखी आंदोलक मृत्युमुखी पडले. त्यामुळे आंदोलनाचे देशव्यापी चळवळीत रूपांतर होऊन पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
बांगलादेशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून शांततामय मार्गाने विरोध करणाऱ्या आंदोलकांवर हिंसक कारवाई होत असल्याची टीका मानवी अधिकार संघटना आणि अमेरिका व ब्रिटन यांच्यासहीत पाश्चात्य देशांनी केली. तत्पूर्वी, पंतप्रधान शेख हसीना यांनी अमेरिकेवर बांगलादेशातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी चिथावणी देत असल्याचा आरोप केला. अमेरिकेला बांगलादेशातील लोकशाही सरकार उलथवून टाकायचे आहे आणि बिगरलोकशाही पद्धतीने सरकार आणायचे आहे, असा आरोप हसीना यांनी केला. हसीना यांनी बांगलादेशाच्या संसदेत केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आवामी लीग पक्षाच्या संदर्भातील मानवी हक्कविषयक घडामोडींचा अभ्यास अमेरिकेकडून बारकाईने करण्यात आला.
चालू वर्षीच्या जुलै महिन्यात युरोपीय महासंघाने बांगलादेशाबरोबर होणाऱ्या नव्या भागीदारी व सहकार्य करारासंबंधीच्या वाटाघाटी पुढे ढकलल्या. या कराराअंतर्गत दोन्ही बाजूंचे व्यापारी संबंध दृढ करणे, बाजारपेठेची उपलब्धता सुलभ करणे आणि विकासात्मक मुद्द्यांना मदत करण्याचा समावेश आहे. युरोपीय महासंघ बांगलादेशाचा महत्त्वपूर्ण व्यापारी भागीदार असून २०२३ मध्ये या व्यापारी उलाढालीचा वाटा २०.७ टक्क्यांवर पोहोचला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतीत युरोपीय महासंघाने बांगलादेश सरकारवर केलेली टीका उभयतांमध्ये सप्टेंबरमध्ये होणारी चर्चा नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यास कारणीभूत ठरली. युरोपीय महासंघाने बांगलादेशातील मानवी हक्क आणि प्रशासनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती.
राजनैतिक संबंध व व्यापाराचे संतुलन
बांगलादेशाच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये पाश्चात्यांकडून ढवळाढवळ सुरू असतानाही कोणत्याही बाजूने टोकाचे पाऊल उचलण्यात आले, तर बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. बांगलादेशाची निर्यातकेंद्रित वाढ ही पाश्चात्य देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निर्बंध अथवा व्यापारी निर्बंध देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी करू शकतात. त्यामुळे संभाव्य निर्बंध टाळण्यासाठी व आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी पाश्चात्य देशांशी राजनैतिक संतुलन राखणे बांगलादेशासाठी महत्त्वूर्ण गोष्ट आहे.
बांगलादेशाच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये पाश्चात्यांकडून ढवळाढवळ सुरू असतानाही कोणत्याही बाजूने टोकाचे पाऊल उचलण्यात आले, तर बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
बांगलादेशाच्या तयार कपड्यांच्या क्षेत्रातील आयातीवर असलेले पाश्चात्य वर्चस्व हे पाश्चात्य देशांच्या प्रामुख्याने अमेरिका व युरोपीय महासंघाच्या प्रबळ नियंत्रणातून स्पष्ट दिसते. याचे कारण प्रामुख्याने बांगलादेशाचे बाजारपेठेवरील अवलंबित्व हे आहे. बांगलादेशातील ८० टक्क्यांपेक्षाही अधिक तयार कपड्यांची निर्यात पाश्चात्य बाजारपेठांमध्ये केली जाते. तयार कपड्यांच्या किफायतशीर किंमती आणि कारखान्यांची उत्पादन क्षमता यांमुळे पाश्चात्य कपड्यांच्या प्रमुख ब्रँड्सशी धोरणात्मक पुरवठादाराच्या संबंधांना चालना मिळाली आहे. तयार कपड्यांचे क्षेत्र बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असून निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात आणि रोजगारामध्ये त्याचा वाटा लक्षणीय आहे. तरीही त्यातून बांगलादेशाचे पाश्चात्यांच्या मागणीवरील, बाजारपेठांच्या स्थितीवरील आणि त्यांच्या बांगलादेशाविषयी असलेल्या राजकीय दृष्टिकोनावरही आर्थिक अवलंबित्व अधोरेखित होते.
एकीकडे बांगलादेशाचा तयार कपड्यांचा उद्योग टिकवण्यासाठी पाश्चात्य देश महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असताना हा उद्योग बाह्य आर्थिक दबाव आणि नैतिक परीक्षा या घटकांमुळे असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखेरीस, बांगलादेशाने भविष्यकाळातील मॅक्रो आर्थिक स्थैर्यासाठी आपल्या आयात व निर्यात क्षेत्रात धोरणात्मक वैविध्य आणि लवचिकता आणण्यावर भर द्यायला हवा.
सौम्य भौमिक हे ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनमधील ‘सेंटर फॉर न्यू इकनॉमिक डिप्लोमसी’चे असोसिएट फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.