Author : Kabir Taneja

Expert Speak Raisina Debates
Published on Jun 23, 2025 Updated 1 Hours ago

इस्रायलचे नेते नेतन्याहू आणि इराणचे नेते खामेनी यांच्यातले गुप्त शत्रुत्व आता चांगलेच उघड झाले आहे. या दोन्ही नेत्यांच्या धोरणात्मक गणितांमुळे युद्ध आणि आण्विक चिंतेने आधीच तणावग्रस्त असलेल्या पश्चिम आशियामध्ये आणखीनच अस्थिरता निर्माण झाली आहे.  

नेतान्याहू विरुद्ध खामेनी: अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर जग?

Image Source: Getty

    इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे आधीच गोंधळलेल्या या प्रदेशाला आणखी तणावाच्या परिस्थितीत ढकलले आहे. यावेळी इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) आणि मोसादने इराणमधल्या लष्करी आणि आण्विक तळांना लक्ष्य केले. यामागे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला धक्का देण्याचा हेतू आहे.  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, इराण हा त्यांच्या देशासाठी अस्तित्वाचा धोका असल्याचे सांगत आपला हल्ल्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. दुसरीकडे इराणने या हल्ल्याकडे युद्धाची घोषणा म्हणून पाहिले आहे.

    इस्रायल आणि इराण गेल्या अनेक दशकांपासून एका युद्धसदृश तणावात गुंतलेले आहेत. या प्रदेशातील भू-राजकीय तणावाचा ते मुख्य घटक आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या प्रदेशाच्या धोरणात्मक रणनीतीमध्ये काय भूमिका बजावतात यावर बरेच काही अवलंबून असेल. इस्रायली नेतृत्वाला गतिमान कृती करण्यास प्रवृत्त केले जाईल. तसेच अमेरिका-इराण अणुकरारावर अजूनही टांगती तलवार असताना येणारे आठवडे आणि महिने पश्चिम आशियासाठी निर्णायक ठरणार आहेत. इस्रायलचे सर्वेसर्वा बेंजामिन नेतन्याहू आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली होसेनी खामेनी हे दोन नेते काय निर्णय घेतात यावर या प्रदेशाचे भविष्य अवलंबून आहे. 

    अयातुल्लांची माणसे 

    इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी हे देशातील सर्व सत्तेचे सूत्रधार आहेत. हे 86 वर्षांचे धर्मगुरू देशाच्या सर्वात शक्तिशाली लष्करी यंत्रणेचे म्हणजे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे पर्यवेक्षण करतात. 1980 ते 1988 च्या इराण-इराक युद्धानंतर आता ते सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. त्यावेळी इराणला युद्धबंदीमध्ये हार मानावी लागली होती. इराणवरचा हा घाव अजूनही ताजा आहे.  

    इस्रायली हल्ल्यांमुळे तेहरान असुरक्षित बनलं आहे. आयआरजीसी, गुप्तचर यंत्रणा आणि सैन्यातील अधिकाऱ्यांसह डझनभर वरिष्ठ इराणी लष्करी नेत्यांना इस्रायलने ठार केलं आहे. इस्रायलला नेमक्या कोणत्या इमारती आणि संकुले लक्ष्य करायची हे माहीत असल्याने गेल्या काही वर्षांत इराणच्या लष्करी आणि आण्विकतळांना गंभीर धोका निर्माण झाला होता. इराणी आकाशात इस्रायली विमानांना रोखण्यासाठी आणि आव्हान देण्यासाठी इराणकडे हवाई साधनांचा पूर्ण अभाव आहे. इराणच्या मूळ तळांपासून ते हजारो मैल दूर आणि म्हणूनच संवेदनशील स्थितीत कार्यरत आहेत. इराणी सैन्य कागदावर दिसत होते त्याहीपेक्षा प्रत्यक्षात अधिक शक्तिशाली होते हेच यातून दिसून येते. पण इस्रायलचे हल्ले इराणी जनतेसाठी मोठा धक्का ठरू शकतात.

    इराणकडे त्यांच्या आण्विक पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी लष्करी क्षमता नाही ही बाब त्यांच्या धोरणात्मक नियोजनातली मोठी त्रुटी दर्शवते. इराणी सरकार आपल्या जनतेच्या मनात राष्ट्रवादाची भावना जागृत करू शकते. अयातुल्लांच्या नेतृत्वाखालील राजवटीला कट्टर विरोध करणाऱ्यांमध्येही ही भावना जागी होण्यास आता वाव आहे. गाझामधील इस्रायली कारवायांबद्दल जनतेचा राग आधीच तेहरानच्या बाजूने झुकला आहे. त्याचा वापर करून इराणचे सरकार जनतेचा एकत्रित पाठिंबा मिळवू शकते. अयातुल्ला खामेनी यांच्यानंतर देशाचे नेतृत्व कोण करेल याची अधिकृत योजना इराणकडे नाही. त्यामुळे इराणच्या भविष्याबद्दल मोठे प्रश्न निर्माण होतात. इराणची धर्मशाही कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. अशा वेळी तिथे अधिक कट्टर, वैचारिकदृष्ट्या प्रेरित आणि कमी वास्तववादी सरकार उदयाला येऊ शकते.

    नेतन्याहू यांचे हल्लेखोर धोरण 

    नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलने इराणवर हल्ला करणे हे अनेकांना वाटले तेवढे आश्चर्यकारक अजिबातच नाही. इस्रायलच्या या नेत्यांनी 2000 सालच्या सुरुवातीपासूनच इराणच्या अणुकार्यक्रमाला लक्ष्य करण्याच्या कल्पनेचे दीर्घकाळ समर्थन केले आहे. आपली सत्तेवरची पकड टिकवून ठेवण्यासाठी ते हे करत असले तरी नेतन्याहू यांनी नेहमीच इराण हा इस्रायली लोकांसाठी धोकादायक देश असल्याची मांडणी केली आहे.  

    1979 पासून इस्रायलच्या विनाशाचे आवाहन करणाऱ्या अण्वस्त्रधारी इराणमुळे प्रादेशिक शक्ती संतुलन बिघडेल आणि इस्रायलच्या धोरणांना बाधा निर्माण होईल, असे नेतन्याहू सांगत आले आहेत. इराणमुळे इस्रायलचे अत्यंत प्रगत लष्कर आणि संरक्षण औद्योगिक तळ नष्ट होतील, असेही त्यांचे म्हणणे आहे. तेल अवीव हे एक अघोषित अण्वस्त्रशक्ती असल्याचे व्यापकपणे मानले जाते. पण त्यालाही इराणमुळे आव्हान निर्माण होईल, असे नेतन्याहू यांना वाटते. इराणच्या अण्वस्त्र हेतूंबद्दल इस्रायल आत्ता उपस्थित करत असलेले अनेक प्रश्न 1960 च्या सुमाराला अमेरिकेच्याही मनात होते. अण्वस्त्रविषयक कार्यक्रमात अडचणी असल्या तरी प्रतिबंधक क्षमता निर्माण करणे आणि शत्रूचे आव्हान पेलण्याची तयारी ठेवणे या गोष्टी यात समाविष्ट आहेत.  

    नेतन्याहू यांनी अनेक कारणांमुळे इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प तेहरानशी अणु करार करतील या भीतीने हा हल्ला अंशतः प्रेरित होता. अशा करारामुळे इस्रायल बाजूला पडेल आणि इराणला युरेनियम समृद्ध करण्यासाठी अधिक जागा मिळेल, असे इस्रायलला वाटते आहे. दुसरे म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे नेतन्याहूंना इराणवर हल्ला करण्यासाठी राजकीय निमित्त मिळाले. इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात हमास आणि हिजबुल्लाहसह इराणचा पाठिंबा असलेल्या संघटनांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.  इराणवरील आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला करणार नसल्याचे संकेत दिले आहेत हे महत्त्वाचे आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह हा इराणी प्रभावाचा एक महत्त्वाचा वैचारिक, राजकीय आणि लष्करी विस्तार आहे हे लक्षात घेतले तर नेतन्याहू यांच्यासाठी ही एक महत्त्वाची कामगिरी आहे.

    इस्रायलने सामरिक विजय मिळवल्याचा दावा केला असला तरी याची दीर्घकालीन धोरणात्मक उद्दिष्टे अद्याप अस्पष्ट आहेत. इराणशी दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवल्याने इस्रायलच्या उच्च दर्जाच्या परंतु तुलनेने लहान सैन्यावर परिणाम होईल. देशाचे सैन्य अजूनही गाझामध्ये गुंतलेले आहे, सीरियामधील नवीन व्यवस्थांबद्दल सतर्क आहे आणि हिजबुल्लाह, हमास आणि इराणी पाठिंबा असलेल्या संघटना कालांतराने पुन्हा एकत्र येऊ नयेत याची खात्री इस्रायलला करावी लागेल. आतापर्यंत इराकमधील कताईब हिजबुल्लाह हा एकमेव गट इराणच्या समर्थनार्थ सार्वजनिकरित्या बाहेर पडला आहे. नेतन्याहू यांची स्वतःची देशांतर्गत लोकप्रियता आणि राजकीय अस्तित्व हे सध्या तरी दुर्लक्षित राहिले असले तरी सध्या त्यांच्याकडे युद्धकाळातील नेते म्हणूनच पाहिले जात आहे.  

    पुढे काय?

    या संघर्षाच्या निकालावर लक्षणीय परिणाम करणारी एकमेव शक्ती म्हणजे अमेरिका. धोरणांपेक्षा व्यक्तिमत्त्वाला प्राधान्य देण्याच्या ट्रम्प यांच्या प्रवृत्तीमुळे आणि रणनीतीवर दीर्घकालीन विश्वास नसल्यामुळे हे घटक अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतरही हा संघर्ष जितका क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्र प्रणालींचा आहे तितकाच तो विश्वास आणि कल्पनांचाही आहे. या प्रदेशातील सर्वात खोलवर रुजलेल्या संकटाचा अभूतपूर्व पद्धतीने उलगडा होतो आहे. यामुळे पश्चिम आशियातील प्रगती, समृद्धी आणि भागिदारीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.  


    कबीर तनेजा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रॅमचे उपसंचालक आणि फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.