मानसिक आरोग्यविषयक संकटाशी प्रभावीपणे सामना करण्यासाठी भारताने नव्या औषधांच्या निर्मितीला प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी आपल्या जैवतंत्रज्ञान आणि औषध क्षेत्रांचा लाभ घ्यायला हवा.
Image Source: Getty
हा लेख "जागतिक मानसिक आरोग्य दिन 2024" या निबंध मालिकेचा भाग आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या तणावांना सामोरे जाणे, परिस्थितीशी जुळवून घेणे, वाढ होणे आणि समाजासाठी योगदान देणे या क्षमता मानसिक आरोग्याची गुणवत्ता दर्शवतात. जगभरातील सुमारे ९७ कोटी लोक मानसिक आरोग्याच्या विकाराने ग्रस्त आहेत आणि ही संख्या कमी होणे अद्याप दृष्टिपथात नाही. कोव्हिड-१९ साथरोगामुळे चिंता, नैराश्य आणि मनोवस्थेसंबंधीचे विकार (मूड डिसऑर्डर) वाढले आहेत. त्याचप्रमाणे एकाकीपणाची जणू साथच आली आहे. वैद्यकीय (क्लिनिकल) दृष्टिकोनातून पाहिले, तर मानसिक विकाराचे निदान करण्याचे प्रमाण वाढले आहे आणि बरेचदा वर्तनविषयक आरोग्य व्यवस्थापनात औषधांची भूमिका महत्त्वाची ठरते. भारतासह जगभरात मानसिक आरोग्याचे संकट ओढवले असून उपचार व संशोधन यामध्ये विकास करण्यास तातडीने प्राधान्य देण्याची अत्यंत गरज असल्याचे यावरून लक्षात येत आहे. सुधारित परिणामकारकता आणि नेमकी उपाययोजना या माध्यमातून उत्तम परिणामकारकता दाखवणाऱ्या नव्या औषधांची निर्मिती ही काळाची गरज बनली आहे.
भारतासह जगभरात मानसिक आरोग्याचे संकट ओढवले असून उपचार व संशोधन यामध्ये विकास करण्यास तातडीने प्राधान्य देण्याची अत्यंत गरज असल्याचे यावरून लक्षात येत आहे.
विविध भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारत २०३० पर्यंत SG३ गाठू शकेल. देशात उपचारांचा तब्बल ८० टक्के अभाव आहे, असे देशाच्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्व्हेतून दिसून आले आहे. याचे कारण म्हणजे ‘नागरिकांमध्ये जागरूकता फारच कमी आहे आणि स्रोतांची उपलब्धताही मर्यादित आहे.’ केंद्र सरकारने राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण आणि मानसिक आरोग्य सेवा कायदा यासह अनेक उपक्रम राबवले आहेत; परंतु नव्या औषधांच्या निर्मितीच्या माध्यमातून प्रभावी औषधांची उपलब्धता वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे.
अनेक प्रकारचे आजार, या आजाराची अनेक लक्षणे आणि आजारांचे अत्यंत व्यक्तिनिष्ठ स्वरूप या गोष्टींमुळे मानसिक आरोग्य विकारांवर उपचार करणे आव्हानात्मक बनले आहे. त्याचप्रमाणे मानसिक आजारांवर उपचार करताना सध्या वापरण्यात येत असलेली बहुतेक औषधे ५० पेक्षाही अधिक वर्षांपासून वापरली जात आहेत, ही गंभीर वस्तुस्थिती आहे. अहवालानुसार, अनेक आजारांवर उपलब्ध औषधांचाच एकत्रित वापर करून उपचार केले जातात. या औषधांची वैशिष्ट्येही मर्यादित स्वरूपाची असतात. यातून हे स्पष्ट होते, की गेल्या काही दशकांमध्ये औषधांमधील विकास हा परिणामकारकता वाढवण्याऐवजी केवळ स्वीकारार्हता वाढवणे आणि दुष्परिणाम कमी करण्यावर भर देऊन करण्यात आला आहे. आत्यंतिक नैराश्याच्या विकारासारखे काही विकार उपचारांना दाद देत नाहीत किंवा या पारंपरिक औषधांना प्रतिसाद देत देत नाहीत. यातून नव्या औषधांच्या शोधांची गरज दिसून येते.
मानसिक आजारांवर उपचार करताना सध्या वापरण्यात येत असलेली बहुतेक औषधे ५० पेक्षाही अधिक वर्षांपासून वापरली जात आहेत, ही गंभीर वस्तुस्थिती आहे.
मानसिक आजारांवरील १७ औषधांना देशाच्या अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत स्थान देण्यात आले असले, तरी मानसिक आरोग्य विकारांसाठी वापरण्यात येणारी एकूणच औषधे आधीपासूनच दुय्यम स्थानावर आहेत. कारण वैद्यकीय क्षेत्रात ती जोखमीची असून महागडीही आहेत, असे मानले जाते. मानसोपचारांमध्ये वापरण्यात येणारे नवे औषधोपचार क्लिनिकल चाचण्यांमध्ये बरेचदा अपयशी ठरतात. कारण ती वैद्यकीयदृष्ट्या प्रतिसाद देत नाहीत, त्यांच्या मूल्यांकनाचे स्वरूप अत्यंत व्यक्तिनिष्ठ असते आणि सुधारणा करण्यासाठी बायोमार्कर्सची कमतरता असते. मॉलिक्युलर बायोलॉजीला फर्माकॉलॉजी आणि औद्योगिक औषधांच्या विकासाला जोडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना नवी, प्रभावी औषधे निर्माण होतील, अशी आशा होती; परंतु नव्या उपचारांमध्ये सातत्याचा अभाव असल्याने ही आशा फळाला गेली नाही. त्याचप्रमाणे औषधांच्या विकासामध्ये जीनोमिक्समधील प्रगतीचे योगदान लाभले नाही. कारण बहुतेक विकार एकापेक्षा अधिक जनुकांमुळे झालेले आहेत. त्यामुळे लक्ष्यीत उपचारांचा विकास करणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे. या शिवाय प्राण्यांच्या मॉडेल्समधील क्लिनिकलपूर्व अभ्यास विश्वासार्ह मानले जात नाहीत. कारण परिणामकारकतेचे मूल्यांकन प्रमुख्याने वर्तनामधील बदलांवरून केले जाते. हे माणसांच्या बाबतीत करणे अवघड असते. उदाहरणार्थ, प्राण्यांचे नमुने चिंता आणि मूड डिसऑर्डरनुसार विकसित केले गेले असतील, तर औषधांचा अवलंब करून मानवाच्या संदर्भाने मानसिक लक्षणांची नक्कल केली जाते. मात्र, प्राण्यांमध्ये होणारे ठळक बदल हे मानवाच्या भावनिक स्थितीत होणारे बदल असल्याचे संशोधक म्हणत असतील, तर या नमुन्यांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे, असे म्हटले जाते. एकूणात, औषधांच्या विकासामध्ये मर्यादा आहेत, असे दिसून येते.
सर्वच प्रकारच्या मानसिक आजारांवर औषधांचा वापर करायला हवा, हा दृष्टिकोन बदलायला हवा. कारण या दृष्टिकोनामुळे परिणामकारकता आणि रुग्णाच्या आरोग्यास बाधा येते. केमोथेरपीच्या घटकांच्या विकासाच्या मार्गात अशाच प्रकारचे अडथळे आले. ही औषधे प्रारंभी विशिष्ट नव्हती किंवा त्यांचा पाया विस्तृत होता; परंतु सेल्युलर व मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये झालेल्या समग्र संशोधनामुळे कर्करोगाचे अधिक चांगले आकलन झाले आणि तेव्हापासून लक्ष्यीत उपचारांचा विकास सुरू झाला.
प्राण्यांचे नमुने चिंता आणि मूड डिसऑर्डरनुसार विकसित केले गेले असतील, तर औषधांचा अवलंब करून मानवाच्या संदर्भाने मानसिक लक्षणांची नक्कल केली जाते.
अल्झायमर, स्किझोफ्रेनिया, पोस्ट-ट्रॉमॅटिक डिसऑर्डर (पीटीएसडी) आणि चिंता यांसारख्या आजारांवर औषधे विकसित करण्यासाठी याच प्रकारचे काम केले जाऊ शकते. कारण त्यातील पॅथाफिझिऑलॉजीचे आकलन करून घेण्याचा अभाव आहे. याप्रमाणे ज्ञानाचा अभाव असल्याने अचूक किंवा लक्ष्यीत उपचारात्मक पद्धतींमध्ये अडथळे येतात. मूलभूत संशोधन कार्याला उद्योग-शैक्षणिक भागीदारीच्या माध्यमातून अर्थपूर्ण संशोधन मार्गाला जोडून घेतले, तर हे अडथळे बाजूला सारता येतील.
देशाच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्राची भरभराट होत असून आरोग्याच्या विविध शाखांमध्ये या क्षेत्राचे योगदान वाढत आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात कल्पक औषधांच्या विकासासाठी जैवतंत्रज्ञान कंपन्या औषध उद्योगासमवेत काम करण्यास उत्सुक आहेत. भारतीय स्टार्टअप्सनी मलेरिया, लेशमॅनियासिस, मधुमेह आणि कर्करोगावरील औषधांसह अन्य क्षेत्रांमध्ये औषधांचा शोध आणि विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संभाव्य बौद्धिक संपदा हक्काचा प्रश्न येऊ शकतो. देशाच्या जेनेरिक औषध उत्पादन क्षमतेचा जागतिक निर्यातीमध्ये २० टक्के वाटा आहे. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात २७ अब्ज डॉलरपेक्षाही अधिक प्राप्ती झाली आहे. २०२४-२०३३ या कालावधीसाठी ११.०९ टक्के ‘सीएजीआर’सह देशाच्या जैवतंत्रज्ञान बाजाराचे मूल्य १०० अब्ज डॉलर आहे. जैवतंत्रज्ञान व औषध उद्योगांमधील सहकार्यामुळे औषधांमधील शोधास दिशा मिळू शकते. त्याचप्रमाणे बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी भारताला स्पर्धात्मक राहण्याची गरज आहे. कारण चीनने नव्या औषधांच्या निर्मितीसाठी संशोधन व विकासावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. त्या देशाने २०२३ मध्ये तीस नव्या औषधांना मंजुरीही दिली आहे. देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही स्तरांवरील मागण्या पूर्ण करण्यासाठी औषध विकसनाच्या जोखमीच्या आणि अधिक कल्पक क्षेत्रात भारतही सहभागी होऊ शकतो, हे यावरून दिसून येते.
संशोधन आणि कल्पकता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या माध्यमातून वाढवता येऊ शकतात. भारताची बायोई३ (अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार यांसाठी जैवतंत्रज्ञान) आणि बायो-राईड (बायोटेक्नॉलॉजी रीसर्च इनोव्हेशन अँड डिव्हेलपमेंट आंत्रप्रेन्योरशिप) धोरणे आजारांतील पॅथॉलॉजी समजावून घेण्यासाठी एकत्रित अभ्यासाच्या माध्यमातून कल्पकता वाढवू शकतात. बीआयआरएसी (बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रीसर्च असिस्टन्स कौन्सिल) च्या माध्यमातून स्टार्टअप अनुदाने औषध क्षेत्रासाठी योजनांच्या माध्यमातून म्हणजे, पीआरआयपी (फार्मा मेडटेक क्षेत्रातील संशोधन आणि कल्पकतेचा पुरस्कार) प्रक्रियेचा वेगवान मागोवा घेऊ शकतात. हे उपक्रम जैव अर्थव्यवस्थेत योगदान देणारे एक मजबूत आणि कुशल कामगार विकसित करण्यासाठीचा एक मार्ग म्हणून कार्य करतील. त्याचप्रमाणे या क्षेत्रांनी जेन एआय (जनरेटिव्ह एआय), कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि मशिन लर्निंग (एमएल) यांसारखे डिसरप्टिव्ह तंत्रज्ञान वापरण्याची गरज व्यक्त केली आहे. ही तंत्रज्ञाने अखेरीस अनुक्रमे मोठ्या क्लिनिकल डेटासेटच्या व्यवस्थापनात जलद औषध विकासासाठी आणि मदत करण्यासाठी योगदान देऊ शकतात.
मानसिक आरोग्य क्षेत्रात कल्पक औषधांच्या विकासासाठी जैवतंत्रज्ञान कंपन्या औषध उद्योगासमवेत काम करण्यास उत्सुक आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सहकार्याचा विस्तार करता येऊ शकतो. कर्करोगाशी लढा देण्यासाठी क्वाड (अमेरिका, भारत, जपान व ऑस्ट्रेलिया) देशांच्या एकत्रित कॅन्सर मूनशॉट या उपक्रमाचा विचार करता येतो. यांसारख्या उपक्रमाच्या आधाराने भारत मानसिक आजारांवरील औषध विकासात सुव्यवस्थितपणा आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानविषयक सहकार्य करू शकतो. भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) विज्ञान व तंत्रज्ञान विकासासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांशी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय संबंध प्रस्थापित केले आहेत. ही औषध शोधाच्या संशोधनासाठी प्रमुख संधी आहे. उदाहरणार्थ, जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी) आणि अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशन (यूएस-एएसएफ) किंवा इंडो-यूएस सायन्स अँड टेक्नॉलॉजी फोरम (आययूएसएसटीएफ) यांच्यातील भागीदारी अंतर्गत जैवतंत्रज्ञानामधील अमेरिका-भारत सहकार्यातून मानसिक आजारांसाठी वापरता येतील अशा औद्योगिकदृष्ट्या लाभदायक हाय व्हॅल्यू स्मॉल मॉलिक्युलचा शोध घेता येऊ शकतो.
जैवतंत्रज्ञान आणि डिसरप्टिव्ह तंत्रज्ञानात वेगाने होणारी प्रगती आणि वाढत्या औषध क्षेत्राचा विचार करता शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, स्टार्टअप्स आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) यांच्यातील सहकार्याचा दृष्टिकोन मानसिक आरोग्यासाठीच्या नव्या प्रभावी औषधांच्या जलद उत्पादनाचा मार्ग मोकळा करू शकतो. मानवाच्या कल्याणामध्ये मानसिक आरोग्य महत्त्वाची भूमिका निभावते. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य विकारांच्या विस्तृत क्षेत्राचा विचार करण्यासाठी सर्वांसाठी समान उपचार असा दृष्टिकोन ठेवणे यापुढे योग्य ठरणार नाही. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रभावी औषधांची निर्मिती करण्यासाठी नावीन्यपूर्ण आणि बहुशास्त्रीय युगात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ आहे.
लक्ष्मी रामकृष्णन या ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनमध्ये असोसिएट फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Lakshmy is an Associate Fellow with ORF’s Centre for New Economic Diplomacy. Her work focuses on the intersection of biotechnology, health, and international relations, with a ...
Read More +