Author : Nimisha Chadha

Expert Speak Health Express
Published on Sep 17, 2025 Updated 0 Hours ago

भारतात ई-सिगारेटवरील बंदीमुळे त्याच्या वापराचे प्रमाण कमी झाले असले तरी, तरुणांमधील वाढत्या बेकायदेशीर वापराबाबत तातडीने धोरण आणून सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

ई-सिगारेटचा वाढता सापळा : भारतातील बंदी, तरुणाई आणि काळा बाजार

Image Source: Pexels

    इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट किंवा व्हेप्स), ज्याला औपचारिकरित्या इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम (ईएनडीएस) म्हणून ओळखले जाते, ही अशी उपकरणे आहेत जी रासायनिक संयुगांसह निकोटीन असलेले द्रव गरम करून इनहेलेबल वाष्प तयार करतात - ही प्रक्रिया व्हेपिंग म्हणून ओळखली जाते. 2003 मध्ये चीनमध्ये धूम्रपानाचा पर्याय म्हणून शोध लावण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम (ईएनडीएस) हे 2007 पर्यंत जागतिक बाजारपेठेत दिसू लागले आणि तेव्हापासून अल्पावधीतच त्यांचा वापर वाढला आहे.

    2021 पर्यंत, जगभरात एकूण 82 दशलक्ष व्हेपर वापरकर्ते असल्याचा अंदाज आहे. सध्या, जागतिक व्हेपिंग उद्योगाचे मूल्य अंदाजे 38 अब्ज डॉलर इतके आहे आणि 2032 पर्यंत ते अंदाजे 199 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यांच्या वाढत्या वापराचे श्रेय आक्रमक मार्केटिंगला जाते, ज्यामध्ये व्हेपिंगला धूम्रपानाचा एक आरोग्यदायी पर्याय म्हणून चित्रित केले जाते. या मार्केटिंगमध्ये अनेक चवी, आकर्षक उपकरणांचे डिझाइन, निकोटीनचे वेगवेगळे स्तर, डिस्पोजेबल/रिफिल करण्यायोग्य ई-लिक्विड सिस्टम आणि रिचार्जेबल बॅटरी यांचा समावेश केलेला आहे.

    पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) च्या 2018 च्या अभ्यासातून असे आढळून आले की ई-सिगारेट हे धूम्रपानापेक्षा किमान 95 टक्के कमी हानिकारक आहेत.

    या वाढत्या लोकप्रियतेसोबत या उद्योगाभोवती वादाचे वलय सुद्धा वाढत आहे. एकीकडे, धूम्रपान करणाऱ्यांसाठी हानी कमी करण्याचे साधन म्हणून त्यांचा प्रचार केला जातो. तर दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) विशेषतः धूम्रपान न करणाऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी संभाव्य हानींबद्दल इशारा दिला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक राष्ट्रांमध्ये मुले आणि तरुणांचे व्हेपिंगचे प्रमाण प्रौढांपेक्षा जास्त आहे.

    व्हेपिंग विरूद्ध स्मोकिंग

    सध्याच्या धूम्रपान करणाऱ्यांनी व्हेपिंगकडे स्विच केल्यास आरोग्याशी निगडीत धोके कमी होऊ शकतात. पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) च्या 2018 च्या अभ्यासातून असे आढळून आले की ई-सिगारेट हे धूम्रपानापेक्षा किमान 95 टक्के कमी हानिकारक आहेत. यासोबतच, पीएचईच्या निष्कर्षांमध्ये असे आढळून आले आहे की वेपिंगचे व्यसन हा काळजीचा विषय असला तरी ईएनडीएस हा तरूणांना धुम्रपानाकडे नेण्याचा मार्ग नाही. याव्यतिरिक्त, असे आढळून आले की सर्व निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीज (एनआरटीज) मध्ये लोकांना किमान सहा महिने धूम्रपान सोडण्यास भाग पाडण्यासाठी ईएनडीएस आणि वर्तणुकीय समर्थन यांचे संयोजन सर्वात प्रभावी  आहे.  

    धूम्रपान सोडून पूर्णपणे किंवा अंशतः व्हेपिंगकडे वळणाऱ्या व्यक्तींच्या शारीरिक आणि फुफ्फुसांच्या कार्यात सुधारणा झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. धुम्रपानातून बाहेर पडणाऱ्या धुरातून दृश्यमान टार साठा दिसून आला आहे, परंतु ई-सिगारेटच्या वाफेतून असा काही टार दिसून न आल्याचे, एका प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे. एका संशोधनातून असे दिसून आले आहे की ई सिगरेटमुळे सेकंड हँड इनहेलेशन रिस्क्स आणि हवेतील कणांचेही प्रमाण कमी आहे. यात व्हेपरच्या वापरामुळे घराच्या पृष्ठभागावरील निकोटीनचे प्रमाण 200 पट कमी आढळले आहे. अर्थात या व्हेपर्समुळे कॅन्सरचा धोका कायम आहे.

    परंतू, यात धूम्रपान आणि व्हेपिंग वर्तनातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये निकोटीन सेवनातील अंतर सहसा जास्त असते, परंतु वेपरमधील पफमुळे निकोटीनचे व्यसन वाढू शकते आणि ते सतत वापरल्याने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

    वेपिंगचे आरोग्यावरील परिणाम

    निकोटीन हे मज्जासंस्थेवर परिणाम करते, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढवते आणि तरुणांमध्ये मेंदूच्या विकासावर परिणाम करते. यासोबतच इएनडीएसच्या दीर्घकालीन परिणामांच्या विस्तृत श्रेणीचा अजूनही अभ्यास केला जात आहे.

    अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासना (युएस फुड अँड ड्रग अडमिनिस्ट्रेशन - एफडीए) च्या मानकांनुसार बहुतेक इएनडीएस हे फ्लेवरिंग तोंडी सेवनासाठी सुरक्षित आहेत. असे असले तरी, इनहेलेशनमधील विषारीपणाचे मोठे प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. द्रवपदार्थांना गरम केल्यावर त्यांची रचना बदलते आणि ते हानिकारक संयुगे बाहेर टाकतात. 180 व्हेप फ्लेवर्सचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की हे व्हेप 127 तीव्र विषारी, 153 धोकादायक आणि 225 त्रासदायक रसायने तयार करतात. ई-सिगारेटच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यातील एक संशोधन अडचण अशी आहे की या संशोधनात सहभागी असलेले बहुतेक व्हेपर हे पूर्वी धूम्रपान करणारे होते किंवा इएनडीएस आणि तंबाखूचे दुहेरी वापरकर्ते होते, ज्यामुळे इएनडीएसचा परिणाम स्पष्ट करणे कठीण होते.

    तरीसुद्धा, अशा संशोधनातून समोर आलेल्या पुराव्यांमधून इएनडीएस मधील रसायनांचा ऑक्सिडेटिव्ह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी ताण, फुफ्फुसांना दुखापत, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), दमा आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाशी संबंध स्पष्ट झाला आहे.

    तरीसुद्धा, अशा संशोधनातून समोर आलेल्या पुराव्यांमधून इएनडीएस मधील रसायनांचा ऑक्सिडेटिव्ह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी ताण, फुफ्फुसांना दुखापत, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), दमा आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाशी संबंध स्पष्ट झाला आहे. इएनडीएसमधील एरोसोलमध्ये धातू असतात. हे धातू कदाचित कॉइलमधून येतात. या कॉइलमध्ये ई-लिक्विड आणि उपकरणाच्या इतर घटकांना गरम केले जाते. त्यामुळे या धातूंच्या दीर्घकालीन संपर्कात आल्यास मूत्रपिंडाचा आजार होतो.

    इएनडीएस मधील रसायनांमुळे 'पॉपकॉर्न फुफ्फुसे' (ब्रॉन्कियोलायटिस ऑब्लिटेरन्स), लिपॉइड न्यूमोनिया आणि कोलॅप्स्ड लंग होऊ शकतात. व्हिटॅमिन ई एसीटेट हे इएनडीएस मधील एक ॲडिटीव्ह आहे. यात अनौपचारिक किंवा बेकायदेशीर स्त्रोतांकडून मिळवलेला गांजा समाविष्ट असतो. ई-सिगारेट किंवा व्हेपिंग वापराशी संबंधित फुफ्फुसांच्या दुखापतीशीही हा ॲडिटीव्ह जोडलेला आहे. याच्याशी संबंधित, अमेरिकेत रुग्णालयात दाखल होण्याच्या किंवा मृत्यूच्या 2,807 घटना घडल्या आहेत. यामुळे अनियंत्रित बाजारपेठांचे धोके अधोरेखित झाले आहेत.

    याशिवाय, अमेरिकेत 2015-17 या दोन वर्षांमध्ये ई-सिगारेट स्फोटांच्या तब्बल 2,035 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनांमध्ये मोठी दुखापत झाल्याची चर्चा आहे. ई-लिक्विडच्या संपर्कात आल्याने आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम झाले आहेत. इएनडीएसची विल्हेवाट लावणे ही आणखी एक मोठी समस्या आहे. एका अंदाजानुसार 2023 मध्ये, अमेरिकन लोकांनी प्रति सेकंद 5.7 डिस्पोजेबल व्हेप टाकून दिले आहेत. जड धातूंचे मिश्रण असलेल्या या व्हेपला रिसायकल करणे आव्हानात्मक आहेच पण त्यासोबत पर्यावरणीय आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित चिंताही अधिक आहेत.

    अमेरिकेत रुग्णालयात दाखल होण्याच्या किंवा मृत्यूच्या 2.807 घटना घडल्या आहेत. यामुळे अनियंत्रित बाजारपेठांचे धोके अधोरेखित झाले आहेत.

    हा विषय चर्चेत असतानाच, व्हेपिंगच्या हानिकारक परिणामांचे पुरावे अजूनही समोर येत आहेत. परंतू बऱ्याच दाव्यांमधून संशोधन निष्कर्षांचे चुकीचे अर्थ लावण्यात आले आहेत. तसेच हे निष्कर्ष उपकरणाच्या वैशिष्ट्यांवर आणि वापरावर अवलंबून असतात, असे पीएचइने नोंदवले आहे.  

    भारतातील स्थिती

    2014 मध्ये, फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन टोबॅको कंट्रोल (एफसीटीसी) अंतर्गत, डब्ल्यूएचओने सर्व देशांना इएनडीएसला प्रतिबंधित करण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. स्वाक्षरी करणारा देश म्हणून, भारताने भविष्यातील व्हेपिंगशी संबंधित सार्वजनिक-आरोग्य संकटे टाळण्यासाठी सावधगिरीचा दृष्टिकोन स्वीकारला आहे. तसेच, 2019 मध्ये लादली इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेवर आधारित देशव्यापी बंदीही लादली आहे.  

    अशी बंदी असूनही, शहरी भागांमध्ये बेकायदेशीर मार्गांनी सेवन सुरूच आहे. 2024 मध्ये, भारतीय ई-सिगारेट बाजारपेठ अंदाजे 2.20 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती आणि 2033 पर्यंत ती 3.40 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 2022 च्या सर्वेक्षणानुसार, 18-30 वयोगटातील उच्च शिक्षण घेतलेल्या भारतीयांमध्ये, 23 टक्के लोकांनी ई-सिगारेट वापरल्याचे नोंदवले आहे. भारतीय महानगरांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्हेपरच्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले की सर्वेक्षण केलेल्या 71.4 टक्के लोकांमध्ये निकोटीनचा पहिला संपर्क धूम्रपानामधून आला आहे. यातील बहुतेक जण दुहेरी वापर करणारे होते. तसेच व्हेपिंगमुळे धूम्रपानाचे प्रमाण 78.3 वरून 58.4 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, तर 30 टक्के लोकांनी तंबाखूचे सेवन पूर्णपणे सोडले आहे.

    बंदी असूनही, शहरी भागांमध्ये बेकायदेशीर मार्गांनी सेवन सुरूच आहे. 2024 मध्ये, भारतीय ई-सिगारेट बाजारपेठ अंदाजे 2.20 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती आणि 2033 पर्यंत ती 3.40 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

    या बंदीची प्रभावीता आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारे परिणाम अद्याप पूर्णपणे समजलेले नसले तरी, सुरुवातीच्या विश्लेषणातून असे दिसून येते की यामुळे जागतिक स्तरावर दिसणारा जलद वापर टाळता आला आहे.  एका नमुना अभ्यासात 33 टक्के लोकसंख्येला इएनडीएसबद्दल माहिती नसल्याचे समोर आले आहे.

    पुढील वाटचाल

    भारत तंबाखूच्या वापराचे व्यवस्थापन करत असताना, तरुणांमध्ये आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये इएनडीएसच्या वापरातील ट्रेंडमुळे विशेष चिंता निर्माण झाली आहे. यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहे.

    तंबाखूमुळे होणारी हानी समजून घेताना

    2022 पर्यंत, भारतात 267 दशलक्षाहून अधिक प्रौढ (15+ वयोगटातील) तंबाखूचे सेवन करत होते. तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी 1.35 दशलक्षाहून अधिक मृत्यू होतात. यामुळे 2017-18 मध्येच देशाला आरोग्य खर्चात 27.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा फटका बसला आहे, जो एकूण आरोग्य खर्चाच्या 5.3 टक्के आहे. दरम्यान, तंबाखूवरील एक्साईज टॅक्स त्याच्या आर्थिक खर्चाच्या फक्त 12.2 टक्के आहे. त्यामुळे तंबाखूचा वापर कमी करणे ही राष्ट्रीय गरज आहे. सर्व प्रकारचे तंबाखू आणि निकोटीनचे व्यसन सोडणे ही बाब आदर्श असली तरी आजही अनेक जण या व्यसनाधीनतेशी झूंजत आहेत. ज्या प्रकरणांमध्ये इतर एनआरटी अयशस्वी ठरतात, तेथे धूम्रपान सोडण्यास मदत करण्यासाठी वर्तणुकीतील बदलांसोबत तुलनेने सुरक्षित पर्यायांचा शोध घेतला जाऊ शकतो.

    व्हेपिंग बंदीस समर्थन

    तंबाखू, धूम्रपान आणि ई-सिगारेट यांच्यातील परस्परसंबंध पाहिल्यास राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण प्रयत्नांमध्ये व्हेपिंग बंदीचा समावेश करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, 2024 च्या अभ्यासानुसार, नॅशनल टोबॅको क्विटलाइन सर्व्हिसेस या टोल-फ्री हेल्पलाइनमध्ये एका वर्षाच्या मद्यपान वर्ज्यतेचा दर 21.62 टक्के होता. विद्यमान हस्तक्षेपांना बळकटी देण्यासाठी गॅप अनॅलिसीस समजून घेणे, तसेच इएनडीएस सोडण्यासाठी समर्थन समाविष्ट करणे, असे उपाय केल्यास त्यांची प्रभावीता वाढवू शकते.

    बेकायदेशीर इएनडीएस पासून होणारे धोके कमी करणे

    बाजारपेठेतील बेकायदेशीर इएनडीएसमुळे भारतासमोर उभी राहिलेली आव्हाने लक्षात घेता, हानिकारक पदार्थांसह निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी धोरण विकसित करण्याची गरज स्पष्ट झाली आहे. यासाठी अंमलबजावणी कडक करणे किंवा नियंत्रित चौकटीचा विचार करणे गरजेचे आहे.

    संशोधनातील गुंतवणूक

    ज्वलनशील तंबाखूच्या तुलनेत, ई-सिगारेट एरोसोलमध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण कमी असते. परंतू, सुव्यवस्थित रणनीतीशिवाय, ते धूम्रपान विरोधी लढ्यात दशकांपासून सुरू असलेल्या प्रगतीला बाधा आणू शकतात. बेकायदेशीर मार्गांनी धोकादायक इएनडीएसच्या पुरवठ्याविरुद्ध तंबाखूचा वापर कमी करण्याची क्षमता, तरुणांना होणारा धोका आणि दीर्घकालीन इएनडीएसवरील अवलंबित्व कमी करणे, या बाबींना डोळ्यासमोर ठेवत खर्च-लाभ विश्लेषणामुळे परस्पर परिणामांचे मूल्यांकन करण्यास मदत होऊ शकते.

    भारतामध्ये विद्यार्थ्यांमधील इएनडीएसच्या वापराबाबतच्या पुरेसे संशोधन उपलब्ध नाही. शिवाय, धूम्रपानाभोवती असलेली सांस्कृतिक संवेदनशीलता, तसेत व्हेप डिझाइनचा विचार करता त्याच्या वापरास प्रोत्साहन मिळू शकते. तंबाखूच्या स्वस्त पर्यायांसह, इएनडीएसचा वापर परवडण्यावर देखील अवलंबून असतो, ज्यामुळे व्हेपिंग वर्तन, व्यसन पद्धती आणि धोरणाची माहिती देण्यासाठी सामाजिक-आर्थिक चालकांवर संशोधनात गुंतवणूकीची आवश्यकता अधोरेखित होते.

    जागतिक संशोधन आणि प्रतिसाद

    जागतिक स्तरावर पुरावे समोर येत असताना, भारताने देशांतर्गत वास्तवाशी सुसंगत राहून आपला प्रतिसाद बदलला पाहिजे. अमेरिका आणि युके सारख्या देशांमध्ये, व्हेपिंग कायदेशीर आहे, परंतु अनेक ठिकाणी ते कठोरपणे नियंत्रितही करण्यात आले आहे. युकेमध्ये इएनडीएसला मेडिसीनल क्विट एड म्हणून नियमन आणि परवाना देण्याच्या दिशेने काम केले जात आहे. तर युएसमध्ये एफडीए टॉक्सिकोलॉजीवरील कठोर अभ्यासांवर आधारित इएनडीएसला अधिकृतता प्रदान करण्याच्या प्रयत्नात आहे. व्हेपिंग 100 टक्के सुरक्षित नाही हे मान्य असूनही, प्रभावी नियमन आणि गुणवत्ता मानकांसह, जोखीम कमी करता येतात असे मानले जाते. याउलट, डब्ल्यूएचओ इएनडीएसच्या विरोधात ठामपणे उभा आहे. तर 34 देशांनी इएनडीएस वर बंदी घातली आहे.  

    भारतीय संदर्भात विचार करता, इएनडीएस वर बंदी घालण्याच्या वेळी, व्हेपिंगशी संबंधित संभाव्य फायदे किंवा हानींची संपूर्ण व्याप्ती नीट समजली नव्हती किंवा पुरावाही नव्हता. ही बाब आयसीएमआर श्वेतपत्रिकेत मान्य करण्यात आली आहे. सध्याच्या भारतीय परिस्थितीत वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा अभ्यास करून अधिक मूल्यांकनाची आवश्यकता स्पष्ट झाली आहे.

    निष्कर्ष

    इएनडीएसचे परिणाम कमी अधिक असले तरी ते पुर्णपणे निरुपद्रवी नाहीत. याचा दुहेरी आणि सतत वापर हा गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या निर्माण करणारा आहे. धूम्रपान न करणाऱ्या लोकांना धूम्रपान कमी करण्याचा फायदा न होता आरोग्य धोक्यांचा सामना करावा लागतो यासाठी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. बेकायदेशीर आणि अनियंत्रित उत्पादनांमुळे हा धोका अधिक वाढतो. त्याचबरोबर, भारताने धूम्रपान करणाऱ्यांसाठी मार्ग तुलनेने पर्यायी पण सुरक्षित मार्ग शोधले पाहिजेत. निकोटीन सेवनाच्या बदलत्या परिस्थितीत लोकसंख्येच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सखोल धोरण आवश्यक आहे.


    निमिषा चड्ढा ह्या ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या हेल्थ इनिशिएटिव्हमध्ये रिसर्च असिस्टंट आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.